हलगा-मच्छे बायपासबाबत पुढील सुनावणी 30 रोजी
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामामध्ये झिरो पॉईंट चुकीच्या पद्धतीने निश्चित करण्यात आला होता. या विरोधात शेतकरी न्यायालयात गेले आहेत. गुऊवारी बेळगावच्या दिवाणी न्यायालयात शेतकऱ्यांच्यावतीने अॅड. रविकुमार गोकाककर यांनी बाजू मांडली. सातवे अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश कृष्णकुमार यांच्या उपस्थितीत सुनावणी करण्यात आली. उच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन आठवड्यांपूर्वी कामाला सुऊवात केली. बायपास विरोधात उच्च न्यायालयात जाणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाल्याने बेळगावच्या दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे. हलगा-मच्छे बायपाससाठी झिरो पॉईंट फिश मार्केट इथून निश्चित करण्यात आला, हे अजून प्राधिकरणाकडून स्पष्ट झालेले नाही. शेतकऱ्यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या अर्जानुसार जरी बायपास रस्त्याचे काम झाले तरी जोवर झिरो पॉईंट मुद्द्याचा निकाल लागणार नाही तोवर रस्त्याचा वापर करता येणार नाही, अशी माहिती रवीकुमार गोकाककर यांनी दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे.