वृत्तपत्र विक्रेत्याने रक्तदान केल्याने महिला रुग्णाला जीवदान
बेळगाव : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानमुळे एखाद्या रुग्णाचा जीव वाचविणे शक्य होते. अशीच प्रचिती ऐन लक्ष्मीपूजनादिवशी आली. केएलई रुग्णालयात न्यूरोच्या अतिदक्षता विभागात असलेल्या एका महिलेला वृत्तपत्र विव्रेते राजू भोसले यांच्यासह इतर दोन रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामुळे सदर महिला रुग्णाची प्रकृती स्थिर होण्यास मदत झाली. महिला रुग्णाला A रक्ताची आवश्यकता होती. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. इंदुमती मास्ते असे रुग्णाचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी केएलई हॉस्पिटलमधील न्यूरो विभागात शस्त्रक्रियेसाठी मास्ते दाखल झाल्या होत्या. भाऊबिजदिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र A रक्त नसल्याने समस्या उद्भवत होत्या. यानंतर डॉ. विनय अखिल यांनी संतोष दरेकर यांच्याशी संपर्क साधून रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी आपल्या सोशल मीडियावर मॅसेजद्वारे रक्तदान करण्यासाठी आवाहन केले. याला प्रतिसाद देत राजू भोसले यांच्या पुढाकाराने त्यांच्यासह इतर दोघा जणांनी रक्तदान केले. यामुळे मास्ते यांच्या शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा होऊन तेही स्थिर झाले. या कार्याबद्दल त्यांचे शहर परिसरातून कौतुक होत आहे.