विरियातोंच्या विधानाचा पंतप्रधानांकडून समाचार
छत्तीसगढ येथील जाहीर सभेतून काँग्रेसवर हल्लाबोल : काँग्रेसकडून बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचा अपमान,दक्षिण भारताला तोडण्याचीही काँग्रेसने केली घोषणा
पणजी : वेळकाळाचे भान आणि सौजन्य न ठेवता केलेल्या विधानाचा सध्या काँग्रेसला जबर दणका बसला असून ‘आधीच मर्कट त्यात मद्य प्याला’, अशी त्यांची गत झाली आहे. दक्षिण गोवा उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी प्रचारसभेत केलेले संविधानाविषयीचे विधान भाजपसाठी मात्र ‘कच्चे शोधणाऱ्यास शिजवलेले मिळावे’ तसे ठरले आहे. त्यांनी ते प्रकरण थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचविले असून पंतप्रधानांनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. विरियातो यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ‘आम्ही तसे बोललोच नव्हतो’ किंवा ‘आमच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला’ यासारख्या काँग्रेसच्या सारवासारवीला काहीच अर्थ राहिलेला नाही. काँग्रेसचे दक्षिण गोवा मतदारसंघाचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सदर विधान सोमवारी प्रचारादरम्यान केले होते. त्याबाबत राज्यातील भाजपचा जवळजवळ प्रत्येक नेता आणि पक्षपदाधिकाऱ्यांनी विरियातो यांचा कठोर शब्दांनी निषेध तर केलाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल मंगळवारी छत्तीसगढ येथील जाहीर सभेत विरियातो यांच्यावर कठोर टीका केली.
विरियातो यांचा बोलविता धनी ‘शहजादा’
विरियातो यांनी केलेल्या विधानाचा बोलविता धनी त्यांचा ‘शहजादा’ असल्याचे ते म्हणाले. अन्यथा असे विधान करण्यास काँग्रेसने त्यांना मूकसंमती दिली नसती, असेही मोदी म्हणाले.
दक्षिण भारताला वेगळे करण्याची घोषणा
पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसने आता मोठा खेळ खेळण्यास प्रारंभ केला आहे. यापूर्वी कर्नाटकमध्ये काँग्रेस खासदाराने दक्षिण भारताला देशापासून वेगळे करण्यात येईल, अशी घोषणा केली.
आता बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचा अपमान
आता गोव्यात काँग्रेसच्या उमेदवाराने प्रचारसभेत बोलताना, भारताने गोव्यावर संविधान लादले असून त्यासंबंधी आपण राहूल गांधी यांच्याशी बोललो असल्याची मुक्ताफळे उधळली आहेत. त्यांचे हे विधान म्हणजे संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचाही अपमान आहे, असा आरोप पंतप्रधानांनी केला आहे.
माझ्या वक्तव्यावर खुल्या चर्चेस तयार : विरियातो
पंतप्रधानांचे सदर टीकास्त्र झेलल्यानंतर त्यावर भाष्य करताना कॅ. विरियातो यांनी, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातील काही भाग बदलून शब्दांचा विपर्यास केला असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्यांनी राजकीय फायदा मिळवण्यासाठी आणि जनतेच्या मनात विष पसरवण्यासाठी माझ्या भाषणातील निवडक शब्द फिरवण्याचा प्रयत्न करू नये. आपण जे बोललो त्यावर खुल्या चर्चेसाठी तयार आहे, असे पॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.
राहुल गांधी सहमत आहेत काय? : मुख्यमंत्री
विरियातो फर्नांडिस यांचे भारतीय राज्यघटना गोव्यावर लादलेली आहे, हे जाहीर विधान गोमंतकीय जनतेचा व संविधानाचा अवमान करणारे आहे. त्यांच्या या विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी हे सहमत आहेत काय ? याचे स्पष्टीकरण द्यावे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. विरियातो फर्नांडिस यांच्या या विधानाचा निषेध कऊन त्यांच्याविऊद्ध निवडणूक आयोगाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. भारतीय राज्यघटना ही गोव्यावर जबरदस्तीने लादलेली नसून या उलट देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहऊ यांच्या चुकीच्या धोरणामुळे गोव्याला चौदा वर्षे उशिरा स्वातंत्र्य मिळाले, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
विरियातो यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे : भाजपकडून मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
काँग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी संविधानाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांना संविधानानुसार चालणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही. संविधानविरोधी विधान केल्याप्रकरणी त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी भाजपने केली आहे. याबाबत आम्ही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती आमदार दिगंबर कामत यांनी दिली. मंगळवारी पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी माजी आमदार दामू नाईक, ग्लेन टिकलो तसेच माजी मंत्री दिलीप पऊळेकर यांची उपस्थिती होती.
विरियातोंचे विधान गंभीर
कॅ. विरियातो यांनी संविधानासंबंधी केलेले विधान खरोखरच गंभीर आहे. उमेदवारी सादर करताना उमेदवाराला शपथ देण्यात येते, तेव्हा त्यांना आपण भारतीय संविधानाचा सदैव सन्मान करेन तसेच त्याचे रक्षण करेन, असे सांगावे लागते. असे असतानाही विरियातो यांनी, गोवा मुक्तीनंतर गोमंतकीयांवर संविधान लादण्यात आले, असे विधान केले. त्यांचे हे विधान धक्कादायक तेवढेच निषेधार्ह आहे, असे कामत म्हणाले. यासंबंधी आता काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.
तेव्हा पंतप्रधान कोण होते?
गोव्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते? तेही काँग्रेसने सांगावे. भारतीय संविधान हे जगात भारी असून असे हे आदर्श संविधान लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही कॅ. विरियातो यांनी अपमान केला आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद तानावडे यांनी दिल्लीत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे, अशी माहिती कामत यांनी दिली.