शाहूनगरातील नवश्या माऊती चांदीच्या मुलाम्याने सजणार
कोल्हापूर / संग्राम काटकर :
तीन वर्षापूर्वी राजारामपुरी-शाहूनगरातील नुतनीकरण केलेल्या नवश्या मारुती मंदिरातील मारुतीच्या मूर्तीला चांदीचे मुलामा करण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प दुसरे-तिसरे कोणी नसून मंदिर व्यवस्थापन व मंदिराजवळील छत्रपती शाहूराजे तरुण मंडळानेच केला आहे. संकल्पाला सत्यात आणण्यासाठी अकरा किलो चांदी अपेक्षित धरली असून ती लोकसहभागातून जमवली जाणार आहे. मंडळाने चांदी दान करण्याचे आवाहनही केले. अनेकांनी प्रतिसाद देत सव्वातीन किलो चांदी दान दिली आहे. अद्यापही 8 किलो चांदी मिळणे बाकी असून कोल्हापुरातील भाविकांनी चांदी देण्यासाठी पुढे यावे ऐवढीच मंडळाची अपेक्षा आहे. चांदी अथवा रक्कम स्वरुपात दान स्वीकारले जाईल, असेही मंडळाचे सांगणे आहे.
शाहूनगरात 1996 साली स्थापलेल्या नवश्या माऊती मंदिराच्या उभारण्यामागे शाहूनगरातील लोकांची दानत व श्रद्धा दिसून येत आहे. सध्या ज्या चौकोणी जागी मारुतीचे आकर्षक मंदिर उभे आहे ती जागा (कै.) संतूबाई बाळासाहेब साळुंखे यांची होती. पूर्वीच्या काळी याच जागेतील पिंपळाच्या झाडाखाली माऊतीचे छोटे मंदिर होते. मंदिराचा जिर्णोद्धार करुन मोठे मंदिर बांधण्यासाठी छत्रपती शाहूराजे तरुण मंडळाने ठरवले. त्यानुसार ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजीराव गायकवाड यांनी 50 जणांची टिम बनवली. या टिमने साळुंखे यांना भेटून मंदिरासाठी जागा देण्याची विनंती केली. त्यांनीही खुल्या मनाने जागा दिली. त्यानंतर मंडळाने वर्षभर लोकसहभागातून पैसे उभा करुन साळुंखे यांच्या जागेत मंदिर उभारले. शिवाजी गायकवाड यांनी दिलेली दक्षिण मूखी मारुतीच्या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना केली. मूर्तीचे नवश्या मारुती असे नामकरणही केले.
जसे दिवस सरकू लागले तसे शाहूनगरपरिसर मारुती भक्त झाला. अनेकांची कामाची सुरुवात मारुतीच्या दर्शनाने होऊ लागली. मंडळाकडून साजरी केल्या जाणाऱ्या हनुमान जयंती सोहळ्यात तर शाहूनगरासह नजिकच्या भागातील लोक एकवटू लागले. 2021 साली मंदिराचे नुतनीकरण करण्याचा विचार पुढे आला. दरम्यानच्या काळातील कोरोनासारख्या महामारीचा धोकाही कमी झाला होता. त्यामुळे लोकसहभागातून पैसे उभा कऊन मंदिराचे नुतनीकरण केले. पिवळसर-तांबूस रंगांच्या आकर्षक दगडांनी मंदिर सुशोभित केले. पुढे हनुमान जयंतीचे औचित्य साधून शाहूराजे तरुण मंडळाने महाप्रसाद, सोंगी भजनाला सुरुवात केली. तेव्हापासून प्रत्येक जयंतीला महाप्रसाद व सोंगी भजन आयोजित केले जात आहे.
अलीकडेच नवश्या मारुतीच्या मूर्तीला चांदीच्या मुलामाने सजवण्यासाठी मंदिर व्यवस्थापन व मंडळाने संकल्प सोडला आहे. एप्रिल महिन्यातील हनुमान जयंतीदिनापर्यंत मारुतीला चांदीचे मुलामा करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यामुळे चांदी जमवण्यासाठी कार्यकर्ते दानशूरांशी संपर्क साधत आहे. जमणाऱ्या चांदीने तीन फुट ऊंद तीन फुट उंच इतक्या आकारात असलेल्या माऊतीच्या मूर्तीला मुलामा करण्यात येणार आहे. मागणीपेक्षा जास्ती चांदी जमली तर दागिने करुन ते मारुतीलाच अर्पण केले जाणार आहे. चांदीची चौकटही केली जाईल. तेव्हा ज्यांना चांदी अथवा रक्कम स्वरुपात दान द्यायचे आहे, त्यांनी मारुती मंदिराशी थेट संपर्क साधावा, असे मंडळाचे आवाहन आहे.
- मंडळाचे कार्यकर्ते रोज करतात आरती
मंदिरातील नवश्या मारुतीची चांगली पूजा-अर्चा, सेवा व्हावी म्हणून शाहूराजे मंडळाने मंदिरात आधीपासूनच पगारी पुजारी नेमला आहे. हे पुजारी रोज नित्य पूजा व आरती करतात. सायंकाळीच्या आरतीची जबाबदारी मंडळाने स्वीकारली. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाकडून केल्या जाणाऱ्या आरतीला अनेक कार्यकर्ते न चुकता हजर राहतात, असे मंडळाकडून येत आहे.