For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अपघातात नवविवाहित तरुणाचा मृत्यू

12:59 PM Jun 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
अपघातात नवविवाहित तरुणाचा मृत्यू
Advertisement

अगसगाजवळ अपघात : टिप्परची दुचाकीला धडक, पत्नीही जखमी

Advertisement

बेळगाव : आठ दिवसांपूर्वीच विवाहबद्ध झालेल्या एक नवविवाहित तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. बेळगाव-राजगोळी रोडवरील अगसगानजीक गुरुवारी दुपारी ही घटना घडली असून काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. बिराप्पा लक्ष्मण सैबण्णवर (वय 25, रा. काळम्मानगर, कुरबरहट्टी, धामणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी नवविवाहित तरुणाचे नाव आहे. त्याची पत्नी श्रीदेवी (वय 22) ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती समजताच काकती पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

केए 22 एचके 5614 अॅक्सिस दुचाकीवरून बिराप्पा व श्रीदेवी राजगोळीकडे गेले होते. राजगोळीहून बेळगावकडे परतताना केए 22 सी 223 क्रमांकाच्या भरधाव टिप्परची दुचाकीला धडक बसली. या अपघातात नवदाम्पत्य गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना उपचारासाठी खासगी इस्पितळात हलविण्यात आले. उपचाराचा उपयोग न झाल्याने गुरुवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास बिराप्पाचा मृत्यू झाला. केवळ आठ दिवसांपूर्वीच विवाहबद्ध झालेल्या तरुणावर टिप्पररुपी काळाने घाला घातला. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.