नवख्या ओमानने टीम इंडियाला विजयासाठी झुंजवले
संजू सॅमसनचे अर्धशतक, अभिषेक, तिलकची फटकेबाजी : रविवारी पुन्हा भारत-पाक आमनेसामने
वृत्तसंस्था/ अबुधाबी
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात ओमानचा पराभव केला. ओमानकडून कडवी टक्कर पाहायला मिळाली. ओमानवरील विजय हा भारतीय संघाचा स्पर्धेतील सलग तिसरा विजय ठरला. प्रथम फलंदाजी करताना ओमानने भारताला 188 धावांत रोखले. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना ओमानला 167 धावा करता आल्या. भारताने हा सामना 21 धावांनी जिंकला. आता, सुपर 4 च्या लढतीत टीम इंडिया आणि पाकिस्ताना पुन्हा आमनेसामने येतील.
प्रारंभी, सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल या लढतीत फ्लॉप ठरला. पाच धावा करून माघारी परतावे लागले. शाह फैसलच्या अप्रतिम इनस्वींगवर त्याचा ऑफ स्टम्प उडाला. गिल बाद झाल्यानंत अभिषेक शर्मा व संजू सॅमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. ही जोडी जमलेली असताना आठव्या षटकांत भारताला दोन धक्के बसले. अभिषेक शर्मा बाहेरचा चेंडू मारायला गेला अन् यष्टिरक्षकाच्या हाती झेल देऊन परतला. त्याने 15 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 38 धावांची वेगवान खेळी साकारली. यानंतर हार्दिक पंड्या (1) रन आऊट झाला.
सॅमसनचे शानदार अर्धशतक
दरम्यान, या लढतीत टीम इंडियाच्या फलंदाजी क्रमात बदल पाहायला मिळत होते. अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर आला, त्याने 13 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह 26 धावांची खेळी साकारली. संजूसह त्याने चौथ्या विकेटसाठी 23 चेंडूंत 45 धावा जोडल्या. भारताने पहिल्या 10 षटकांत शंभर धावा फलकावर लावल्या. अक्षर बाद झाल्यानंतर डावखुरा फलंदाज शिवम दुबेही फार काळ मैदानावर टिकला नाही. 5 धावांवर तो माघारी परतला. दरम्यान, संघाच्या 5 विकेट गेल्यानंतरही सूर्यकुमार फलंदाजीला आला नाही आणि त्याने तिलक वर्माला पाठवले. संजू संयमाने विकेट टिकवून खेळत होता आणि त्याला नशीबाचीही साथ मिळाली. संजूने 45 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकारांसह 56 धावांची खेळी साकारली. तिलकने त्याला चांगली साथ देताना 29 धावा केल्या. संजू व तिलक लागोपाठ बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला अर्शदीप सिंग (1) रन काढून तंबूत परतला. हर्षित राणाने नाबाद 13 धावा फटकावल्या. या जोरावर टीम इंडियाला 20 षटकांत 8 गडी गमावत 188 धावापर्यंत मजल मारता आली.
ओमानने टीम इंडियाला विजयासाठी झुंजवले
भारताने विजयासाठी दिलेल्या 189 धावांचे टार्गेटचा पाठलाग करताना ओमानला 4 बाद 167 धावापर्यंत मजल मारता आली. ओमानच्या डावाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर जितेंदर सिंग आणि आमीर कालेम यांनी 56 धावांची सलामी दिली. कर्णधार जितेंदर सिंगला 32 धावांवर कुलदीप यादवने बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर आमीर कालेम आणि हमिद मिर्झा यांनी 93 धावांची महत्वपूर्ण भागीदारी साकारली. ही जोडी मैदानात असेपर्यंत एकवेळ ओमान विजय मिळवेल, अशी शक्यता होती. पण, मोक्याच्या क्षणी आमीरला हर्षित राणाने केले. त्याने 46 चेंडूत सर्वाधिक 7 चौकार आणि 2 षटकारासह 64 धावा केल्या. याशिवाय, हमिद मिर्झाने 51 धावांचे योगदान दिले. ही जोडी बाद झाल्यानंतर ओमानचा संघ विजयापासून दूर गेला. त्यांना 167 धावापर्यंत मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकांत 8 बाद 188 (अभिषेक शर्मा 38, संजू सॅमसन 56, अक्षर पटेल 26, तिलक वर्मा 29, हर्षित राणा नाबाद 13, शाह फैसल, जितेन रामनंदी आणि अमीर कालेम प्रत्येकी दोन बळी)
ओमान 20 षटकांत 4 बाद 167 (जितेंदर सिंग 32, आमीर कालेम 64, हमिद मिर्झा 51, विनायक शुक्ला 1, हार्दिक, अर्शदीप, हर्षित राणा आणि कुलदीप यादव प्रत्येकी 1 बळी).
टीम इंडियाचा विक्रमी कारनामा
आशिया चषक स्पर्धेत ओमानविरुद्ध हा भारतीय संघाचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 250 वा सामना ठरला. यासह भारतीय संघ टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 250 सामने खेळणारा दुसरा संघ ठरला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 275 सामने खेळणारा पाकिस्तानचा संघ या यादीत अव्वल स्थानी आहे. या क्लबमध्ये आता भारतीय संघाने एन्ट्री केली आहे. 235 सामन्यांसह न्यूझीलंडचा संघ या यादीत तिसऱ्या स्थानी असून 228 सामने खेळणारा वेस्ट इंडिजचा संघ या यादीत चौथ्या स्थानी आहे.