चिकोडी माता-बाल रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू
डॉक्टरांमध्ये समन्वयाचा अभाव : नागरिक संतप्त
प्रतिनिधी/ चिकोडी
येथील माता-बाल रुग्णालयात प्रसूतीनंतर एका नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. बाळाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तालुक्यातील वडागोल गावच्या श्रुती यड्रावे या दुसऱ्या प्रसुतीसाठी शुक्रवारी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. स्त्राrरोग तज्ञ डॉ. कमला गडेद यांनी केलेल्या एकूण चार शस्त्रक्रियांपैकी एका नवजात बाळाचा मृत्यू झाला. शहरात कोट्यावधी रुपये खर्चून माता-बाल रुग्णालय उभे करण्यात आले आहे. परंतु रुग्णालयात बालरोग तज्ञ उपलब्ध नसल्यामुळेच नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रुग्णालय सुरू झाल्यापासून येथे अशा घटना वारंवार घडत असूनही, याकडे लक्ष देणारे कोणी नाही, असे जनतेचे म्हणणे आहे.
डॉक्टरांमधील समन्वयाचा अभाव
या रुग्णालयात दोन डॉक्टर कार्यरत आहेत, मात्र त्यांच्यात समन्वयाचा मोठा अभाव आहे. गेल्या आठवड्यात एका गर्भवती महिलेला सिझेरियन करताना भूलतज्ञाने योग्य प्रमाणात औषध (भूल) न दिल्याने त्या महिलेला प्रचंड त्रास सहन करावा लागला. एकंदरीत, माता-बाल रुग्णालयात डॉक्टरांमधील अंतर्गत भांडणांमुळे गरीब रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याचे चित्र आहे.
नागरिकांची मागणी
भविष्यात तरी या रुग्णालयात गरीब लोकांना योग्य उपचार मिळावेत आणि नवजात बाळाच्या मृत्यूचे नेमके कारण शोधून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच, रुग्णालयात तातडीने बालरोग तज्ञाची नेमणूक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचे मागील प्रकरण
यापूर्वीही माता-बाल रुग्णालयात असाच निष्काळजीपणा झाल्याचा प्रकार समोर आला होता. तालुक्यातील मुगळी गावच्या श्रुती राजू बडिगेर या गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्त्राrरोग तज्ञ डॉ. जयलक्ष्मी मुसाळे यांनी शस्त्रक्रिया (सिझेरियन) केल्यानंतर योनीमार्गात कापसाचा गोळा आतमध्येच ठेवला होता. त्यामुळे प्रसूतीनंतर महिलेला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर तिला हुक्केरी येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्कॅनिंग केल्यानंतर योनीमार्गात कापसाचा गोळा राहिल्याचे उघड झाले. या प्रकरणाची योग्य ती चौकशी सुरू आहे.