न्यूझीलंडची विजयी सलामी, पाकचा दारुण पराभव
सामनावीर टॉम लॅथम, विल यंगची शानदार शतके : ओरुके, सँटेनरचे प्रत्येकी तीन बळी
वृत्तसंस्था/ कराची
आपल्याच देशात सुरु झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानवर नामुष्कीची वेळ ओढवली. बुधवारी झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध लढतीत पाकिस्तानला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने धडाकेबाज फटकेबाजी करत 320 धावांचा डोंगर उभारला होता. पाकिस्तानचा संघ 321 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला खरा, पण त्यांच्या फलंदाजांनी घात केला. फलंदाजांच्या हाराकिरीमुळेच पाकिस्तानला हसामना गमवावा लागला. शतकी खेळी साकारणाऱ्या टॉम लॅथमला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. दरम्यान, पाकची पुढील लढत दि. 23 रोजी भारताविरुद्ध हेणार आहे.
पाकिस्तानचा संघ 321 धावांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला खरा, पण त्यांना न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज विल ओरुकेने एकामागून एक दोन धक्के दिले. यामुळे पाकची अवस्था 2 बाद 22 अशी झाली होती. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानचा भन्नाट झेल यावेळी न्यूझीलंडच्या ग्लेन फिलीपने पकडला आणि सर्वांची मनं जिंकली. त्यानंतर पाकिस्तानला एकामागून एक धक्के बसत गेले. पण बाबर आझम मात्र एकटा खिंड लढवत होता. बाबरने दमदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले आणि संघाचे आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण बाबरचा हा प्रयत्न अपयशी ठरला. त्याने 64 धावांची खेळी साकारली. याशिवाय सलमान आगाने 42 तर खुशदिल शाहने 69 धावांचे योगदान दिले. इतर पाक फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केल्याने त्यांचा डाव 47.2 षटकांत 260 धावांत आटोपला. किवीज संघाकडून ओरुके व सँटेनरने प्रत्येकी तीन बळी घेतले.
कराचीतील नॅशनल स्टेडियमयवर यजमान पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चांगलाच चुकीचा ठरला. अर्थात, किवीज गोलंदाजांची पाकच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करताना 50 षटकांत 5 गडी गमावत 320 धावा केल्या. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या किवीज संघाची सुरुवात खराब झाली. डेव्हॉन कॉनवेला 10 धावा करत माघारी परतावे लागले. पाकचा फिरकीपटू अबरार अहमदने कॉनवेला क्लीन बोल्ड करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. तर पुढच्याच नवव्या षटकात न्यूझीलंडचा सर्वात अनुभवी फलंदाज केन विल्यम्सन 1 धावा करत स्वस्तात बाद झाला. डॅरिल मिचेलदेखील 10 धावा करत बाद झाला.
विल यंग, टॉम लॅथमची शतके
सलामीचे तीन फलंदाज लागोपाठ बाद झाल्याने किवीज संघाची 3 बाद 73 अशी स्थिती झाली होती. अशा कठीण स्थितीत विल यंग व टॉम लॅथम यांनी दर्जेदार खेळाचा नजराणा पेश केला. या जोडीने पाक गोलंदाजांचा समाचार घेताना 118 धावांची भागीदारी करत संघाला सावरले. यादरम्यान, विल यंगने संयमी खेळी साकारताना 12 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 113 चेंडूत 107 धावांची खेळी केली व यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिले तर वनडेतील चौथे शतक साजरे केले. शतकानंतर मात्र तो लगेचच नसीम शाहच्या गोलंदाजीवर बाद झाला.
यंग बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या ग्लेन फिलिप्सने लॅथमला चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी रचली. सुरुवातील संथ खेळणाऱ्या लॅथमने नंतर आक्रमक फलंदाजी करत वनडे कारकिर्दीतील आठवे शतक ठोकले. त्याने 104 चेंडूत 10 चौकार व 3 षटकारासह नाबाद 118 धावांची खेळी केली. फिलिप्सने धमाकेदार खेळी करताना अवघ्या 39 चेंडूत 3 चौकार व 4 षटकारासह 61 धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकांत फिलिप्स बाद झाला. यामुळेच किवीज संघाला निर्धारित 50 षटकांत 5 बाद 320 धावा करता आल्या. पाकिस्तानकडून हॅरिस रौफ व नसीम शाह यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 50 षटकांत 5 बाद 320 (विल यंग 107 धावा, डेव्हॉन कॉनवे 10, केन विल्यम्सन 1, डॅरिल मिचेल 10, टॉम लॅथम 118, ग्लेन फिलिप्स 61, नसीम शाह व हॅरिस रौफ प्रत्येकी दोन बळी)
पाकिस्तान 47.2 षटकांत सर्वबाद 260 (सौद शकील 6, बाबर आझम 64, मोहम्मद रिझवान 3, सलमान आगा 42, खुशदिल शाह 69, हॅरिस रौफ 19, सँटेनर व ओरुके प्रत्येकी तीन बळी).
चॅम्पियन्स ट्रॉफीत पहिल्याच दिवशी दोन शतके
पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या विल यंग व टॉम लॅथम यांनी शानदार शतके झळकावली. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीत शतक झळकावणारा विल यंग चौथा तर लॅथम पाचवा खेळाडू ठरला आहे. याआधी न्यूझीलंडसाठी केन विल्यम्सन, ख्रिस केर्न्स आणि नॅथन एस्टल या तिघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीत शतक झळकावले आहे.