वनडे मालिकेत न्यूझीलंडची विजयी सलामी
लंकेचा 9 गड्यांनी पराभव : मॅट हेन्री सामनावीर
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत रविवारी झालेल्या पहिल्या लढतीत यजमान न्यूझीलंडने लंकेचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. 19 धावांत 4 गडी बाद करणाऱ्या न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
लंकेच्या क्रिकेट संघाला न्यूझीलंड दौऱ्यामध्ये यापूर्वी वनडे मालिका गमवावी लागली होती. न्यूझीलंडने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती. या मालिकेनंतर उभय संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. मॅट हेन्री तसेच डफी आणि स्मिथ यांच्या अचूक गोलंदाजीसमोर लंकेचा डाव 43.4 षटकात 178 धावांत आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने 26.2 षटकात 1 बाद 180 धावा जमवित हा सामना 9 गड्यांनी एकतर्फी जिंकला.
लंकेच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. सलामीचा निशांका पाचव्या षटकात हेन्रीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 9 धावा जमविल्या. यानंतर लंकेने आणखी 3 गडी लवकरच गमाविले. 9.5 षटकात लंकेची स्थिती 4 बाद 23 अशी होती. डफीने कुशल मेंडीसचा 2 धावांवर त्रिफळा उडविला. त्यानंतर कमिंदू मेंडीस एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचीत झाला. त्यांने 3 धावा केल्या. कर्णधार आसालेंकाला स्मिथने खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. अविष्का फर्नांडो आणि लियानगे यांनी पाचव्या गड्यासाठी 87 धावांची भागिदारी केली. लियानगेने 54 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 36 धावा जमविल्या. सँटेनरने त्याला झेलबाद केले. स्मिथने आविष्का फर्नांडोला फिलिप्सकरवी झेलबाद केले. त्याने 123 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 56 धावा केल्या. फर्नांडोने 52 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह अर्धशतक झळकाविले. मॅट हेन्रीने लंकेचे तळाचे फलंदाज झटपट गुंडाळले. विक्रमसिंघेने 42 चेंडूत 2 चौकारांसह 22 तर हसरंगाने 35 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 35 धावा जमविल्या. 25 षटकाअखेर लंकेची स्थिती 4 बाद 108 अशी होती. विक्रमसिंघे आणि हसरंगा यांनी सातव्या गड्यासाठी 48 धावांची भागिदारी केली. या सामन्यात वनडे पदार्पण करणाऱ्या इशान मलिंगा हेन्रीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 4 धावा केल्या. लंकेच्या डावात 4 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. लंकेने पहिल्या पॉवर प्ले दरम्यानच्या 10 षटकात 23 धावा जमविताना 4 गडी गमाविले. तर शेवटच्या पॉवर प्लेमध्ये त्यांनी 3 धावांमध्ये 2 गडी गमाविले. न्यूझीलंडतर्फे हेन्रीने 4 तर डफी आणि स्मिथ यांनी प्रत्येकी 2 तसेच सँटेनरने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना यंग आणि रचिन रविंद्र या सलामीच्या जोडीने 12.3 षटकात 93 धावांची भागिदारी केली. विक्रमसिंघेने रचिन रविंद्रला हसरंगाकरवी झेलबाद केले. त्याने 36 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 45 धावा जमविल्या. यंग आणि चॅपमन यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य 87 धावांची भागिदारी केली. यंगने 132 चेंडूत 12 चौकारांसह नाबाद 90 तर चॅपमनने 36 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 29 धावा जमविल्या. लंकेतर्फे विक्रमसिंघेने 1 गडी बाद केला. न्यूझीलंडने पहिल्या पॉवर प्ले दरम्यानच्या 10 षटकात 70 धावा केल्या. यंगने 49 चेंडूत 6 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. न्यूझीलंडने 150 धावा 120 चेंडूत नोंदविल्या. न्यूझीलंडच्या डावात 1 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक - लंका 43.4 षटकात सर्वबाद 178 (अविष्का फर्नांडो 56, लियानगे 36, विक्रमसिंघे 22, हसरंगा 35, हेन्री 4-19, डफी 2-39, स्मिथ 2-43, सँटेनर 1-27), न्यूझीलंड 26.2 षटकात 1 बाद 180 (यंग नाबाद 90, रचिन रविंद्र 45, चॅपमन नाबाद 29, अवांतर 16, विक्रमसिंघे 1-28.