बांगलादेशच्या फिरकीसमोर न्यूझीलंडची सत्त्वपरीक्षा
वृत्तसंस्था/गुवाहाटी
आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी येथे होणाऱ्या सामन्यात माजी विजेत्या न्यूझीलंड संघाला पाठोपाठ दोन सामन्यांतील पराभवानंतर आता बांगलादेशच्या फिरकीला समर्थपणे तोंड द्यावे लागेल. या सामन्यात बांगलादेशच्या फिरकीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजीची सत्त्वपरीक्षा ठरेल. या स्पर्धेमध्ये न्यूझीलंड संघाला अद्याप गुणतक्त्यात आपले खाते उघडता आलेले नाही. 2000 साली या स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या न्यूझीलंड महिला संघातील फलंदाज अधिक धावा जमविण्यासाठी झगडत असल्याचे चित्र पहिल्या दोन सामन्यांत पहावयास मिळाले आहे. बांगलादेशचा संघ या स्पर्धेत आपला दुसरा विजय मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल. बांगलादेशने आतापर्यंत एक सामना जिंकला असून एक सामना गमविला आहे. शुक्रवारच्या सामन्यात न्यूझीलंड संघाला पराभव पत्करावा लागला तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान लवकरच समाप्त होईल.
बांगलादेश संघाची फिरकी गोलंदाजी प्रभावी असून ती गुवाहाटीच्या कोरड्या आणि संथ खेळपट्टीवर प्रभावी ठरू शकेल. या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी बांगलादेशच्या फिरकी गोलंदाज उपकर्णधार नाहीदा अख्तर तसेच फईमा खातुन आणि रबिया खान या सज्ज झाल्या आहेत. बांगलादेशतर्फे नाहीदा अख्तर ही सध्या क्रिकेटच्या विविध प्रकारात सर्वाधिक गडी बाद करणारी गोलंदाज म्हणून ओळखली जाते. शुक्रवारच्या सामन्यासाठी बांगलादेश गोलंदाजीच्या तंत्रामध्ये नवा डावपेच आखेल. कारण न्यूझीलंडचे फलंदाज प्रभावी कामगिरी करु शकत नसल्याने त्यांच्यावर दडपण आणण्यासाठी बांगलादेशची कर्णधार प्रयत्न करेल.
या स्पर्धेतील पाक बरोबरच्या सामन्यात बांगलादेश संघातील 18 वर्षीय फिरकी गोलंदाज शोरना अख्तरने केवळ 5 धावांत 3 गडी बाद केल्याने बांगलादेशने पाकवर थरारक विजय मिळविला होता. तर बांगलादेश संघातील वेगवान गोलंदाज मारुपा अख्तर हिची पाकविरुद्धच्या सामन्यातील कामगिरी समाधानकारक झाली असून तिने 31 धावांत 2 गडी बाद केले होते. न्यूझीलंडची सलामीची जोडी गेल्या दोन सामन्यात संघाच्या डावाला चांगली सुरूवात करुन दिलेली नाही. अनुभवी सुजी बेट्सला सलग दोन सामन्यात खातेही उघडता आले नाही. बांगलादेशने यापूर्वीच्या सामन्यात आपल्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानवर सणसणीत विजय मिळविला होता. तर इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात बांगलादेशचा डाव 178 धावांत आटोपला होता. पाक विरुद्धच्या सामन्यामध्ये बांगलादेश संघातील रुबीया हैदरने अर्धशतक झळकविले होते. तिला योग्यवेळी फलंदाजीचा सूर मिळाल्याने शुक्रवारच्या सामन्यात तिच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे.
न्यूझीलंड संघाच्या या स्पर्धेतील मोहीमेला चांगलाच धक्का बसला आहे. सलग दोन सामने त्यांना गमवावे लागले. दक्षिण आफ्रिकेच्या बरोबरच्या सामन्यात न्यूझीलंडची एकवेळ स्थिती 2 बाद 101 अशी भक्कम असताना त्यानंतर त्यांचे उर्वरित आठ गडी झटपट बाद झाल्याने त्यांचा डाव 231 धावांत आटोपला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मलाबाने 40 धावांत 4 गडी बाद केले होते. तर कर्णधार सोफी डिव्हाईन ही एकमेव फलंदाज एकाकी झगडत असल्याचे दिसून आले. तिने गेल्या दोन सामन्यात अनुक्रमे 112 आणि 85 धावा जमविल्या होत्या. मधल्या फळीतील हॅलीडे तसेच बेट्स, प्लिमेर सूर मिळविण्यासाठी झगडत आहेत. शुक्रवारच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली तर त्यांना 250 धावांचा टप्पा गाठून बांगलादेशला आव्हान द्यावे लागेल. गुवाहाटीच्या खेळपट्टीवर आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांत फलंदाजीची कसोटी लागत असल्याचे दिसून येते. या ठिकाणी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने 8 बाद 269 धावा जमवित लंकेला कठीण आव्हान दिले होते. पण त्यानंतरच्या येथे झालेल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध द. आफ्रिकेचा डाव केवळ 69 धावांत आटोपला होता. तर बांगलादेशलाही एका सामन्यात 178 धावांपर्यंत मजल मारता आली होती.
बांगलादेश संघ : निगर सुलताना जॉटी (कर्णधार), नाहीदा अख्तर, फरजाना हक, रुबिया हैदर, शर्मिल अख्तर, शोभना मोस्तरी, रितू मोनी, शोरना अख्तर, फईमा खातुन, रबीया खान, मारुफा अख्तर, फरिया इस्लाम त्रिष्णा, शानजिदा अख्तर मघेला, निशिता अख्तर निशी, सुमेया अख्तर,
न्यूझीलंड संघ : सोफी डिव्हाईन (कर्णधार), बेट्स, कार्सन, डिवोनशेरी, गॅझे, मॅडी ग्रीन, हॅलिडे, इलिंग, इंग्लीस, बेला जेम्स, अमेलीया केर, जेस केर, मेयर, प्लिमेर, आणि ताहुहू.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वाजता