For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यूझीलंडचा पाकवर सलग दुसरा विजय

06:45 AM Jan 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
न्यूझीलंडचा पाकवर सलग दुसरा विजय
Advertisement

टी-20 मालिकेत न्यूझीलंडची 2-0 आघाडी, पाकचा 21 धावांनी पराभव, अॅलन सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था/ हॅमिल्टन

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात अॅडॅम मिलेनीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने पाकिस्तानचा 21 धावांनी पराभव केला. या मालिकेतील न्यूझीलंडने आपला सलग दुसरा विजय नोंदवत पाकवर 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. न्यूझीलंडच्या फिन अॅलेनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकात 8 बाद 194 धावा जमवल्या. त्यानंतर पाकचा डाव 19.3 षटकात 173 धावात आटोपला. या मालिकेतील पहिल्या सामन्यातही न्यूझीलंडने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पाकवर मात केली होती. रविवारच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सला स्नायू दुखापतीमुळे फलंदाजी करताना निवृत्त व्हावे लागले.

रविवारच्या दुसऱ्या सामन्यात अॅलेन आणि कॉन्वे यांनी न्यूझीलंडच्या डावाला चांगली सुरुवात करून देताना 31 चेंडूत 59 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडने पॉवर प्ले दरम्यानच्या 6 षटकात 65 धावा जमवताना एक गडी गमवला. पाकच्या अमीर जमानने कॉन्वेला झमानकरवी झेलबाद केले. त्याने 15 चेंडूत 3 चौकारासह 20 धावा केल्या. कॉन्वे बाद झाल्यानंतर अॅलेन आणि कर्णधार विलियम्सन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 52 धावांची भागीदारी केली असताना विलियम्सनला स्नायू दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. विलियम्सनने 15 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 26 धावा जमवल्या. अॅलेनने 41 चेंडूत 5 षटकार आणि 7 चौकारासह 74 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडचे अर्धशतक 26 चेंडूत तर शतक 57 चेंडूत फलकावर लागले. अॅलेनने आपले अर्धशतक 24 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने झळकविले. उस्मा मीरच्या गोलंदाजीवर अॅलेनचा त्रिफळा उडाला. अब्बास आफ्रिदीने मिचेलला त्रिफळाचित केले. त्याने 10 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 17 धावा जमवल्या. अब्बास आफ्रिदीने न्यूझीलंडला आणखी एक धक्का देताना चॅपमनला 4 धावावर झेलबाद केले. ग्लेन फिलिप्सने 9 चेंडूत 2 चौकारांसह 13 धावा केल्या. सँटेनरने 13 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 25 धावा जमवल्या. एकेरी धाव घेण्याच्या नादात तो धावचित झाला. मिलेनी आणि सोधी यांना आपले खाते उघडता आले नाही. न्यूझीलंडच्या डावात 9 षटकार आणि 19 चौकार नोंदवले गेले. पाकतर्फे हॅरीस रौफने 38 धावात 3, अब्बास आफ्रिदीने 43 धावात 2 तसेच अमीर जमाल आणि उस्मा मीर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकने पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर सलामीचा फलंदाज रिझवान गमवला. मिलेनीने त्याला 7 धावावर झेलबाद केले. साऊदीने आयुबला एका धावेवर झेलबाद केले. त्यानंतर बाबर आझम आणि फक्र झमान यांनी तिसऱ्या गड्यासाठी 87 धावांची भागीदारी केली. मिलेनीने फक्र झमानचा त्रिफळा उडवला. त्याने 25 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारासह 50 धावा जमवल्या. इफ्तिकार अहमद, आझम खान आणि अमिर जमाल हे फलंदाज लवकर बाद झाले. बाबर आझमने 42 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारासह 66 धावा जमवल्या. तो सातव्या गड्याच्या रुपात बाद झाला. बाबर आझम बाद झाला त्यावेळी निर्णायक विजयासाठी 42 धावांची जरुरी होती. कर्णधार शाहीन आफ्रिदीने 13 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 22 धावा जमवल्या. अब्बास आफ्रिदीने 7 धावा केल्या. 19.3 षटकात पाकचा डाव 173 धावात आटोपला. पाकच्या डावामध्ये 12 षटकार आणि 11 चौकार नोंदवले गेले. न्यूझीलंडतर्फे मिलेनीने 33 धावात 4 तर साऊदी, सिरेस आणि सोधी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. पाकच्या डावात पहिले अर्धशतक 32 चेंडूत, शतक 64 चेंडूत तर दीडशतक 100 चेंडूत फलकावर लागले. पॉवर प्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात पाकने 61 धावा जमवताना 2 गडी गमवले. फखर झमानने आपले अर्धशतक 23 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह तर बाबर आझमने 36 चेंडूत 7 चौकारांसह आपले अर्धशतक नोंदवले.

संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 20 षटकात 8 बाद 194 (अॅलन 74, कॉन्वे 20, विलियम्सन दुखापतीमुळे निवृत्त 26, सँटनर 25, मिचेल 17, फिलिप्स 13, हॅरीस रौफ 3-38, अब्बास आफ्रिदी 2-43, उस्मा मीर, अमीर जमाल प्रत्येकी एक बळी), पाक 19.3 षटकात सर्वबाद 173 (बाबर आझम 66, फखर झमान 50, शाहीन आफ्रिदी 22, अॅडॅम मिल्ने 4-33, साऊदी, सीयर्स आणि सोधी प्रत्येकी दोन बळी).

Advertisement
Tags :

.