न्यूझीलंडचा इंग्लंडवर विक्रमी विजय
हॅरी ब्रुक ‘मालिकावीर’, मिचेल सॅन्टनर ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / हॅमिल्टन
यजमान न्यूझीलंडने मंगळवारी येथे खेळाच्या चौथ्या दिवशी तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडचा विक्रमी 423 धावांनी दणदणीत पराभव केला. मात्र इंग्लंडने ही मालिका 2-1 अशी फरकाने जिंकली. इंग्लंडच्या हॅरी ब्रुकला ‘मालिकावीर’ तर न्यूझीलंडच्या सॅन्टेनरला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार स्टोक्स दुखापतीमुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करु शकला नाही.
या मालिकेतील सलग पहिले दोन सामने इंग्लंडने जिंकले होते. तर तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडचे कामगिरी दर्जेदार आणि इंग्लंडच्या तुलनेत सरस झाल्याने इंग्लंडला या मालिकेत व्हाईटवॉशची संधी मिळू शकली नाही. हॅमिल्टनची शेवटची कसोटी न्यूझीलंडने मंगळवारी खेळाच्या चौथ्या दिवशी चहापानापूर्वीच जिंकली.
या शेवटच्या कसोटीत न्यूझीलंडने पहिल्या डावात 347 धावा जमविल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 143 धावांत आटोपल्याने न्यूझीलंडने 204 धावांची भक्कम आघाडी घेतली होती. त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 453 धावांचा डोंगर उभा करुन इंग्लंडला विक्रमी 658 धावांचे आव्हान दिले. मात्र इंग्लंडचा दुसरा डाव 47.2 षटकात 234 धावांत आटोपल्याने न्यूझीलंडने हा सामना मोठ्या फरकाने एकतर्फी जिंकला. इंग्लंडने 2 बाद 18 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. बेथेल आणि रुट या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 104 धावांची शतकी भागिदारी केली. बेथेलने 96 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांसह 76 तर रुटने 64 चेंडूत 10 चौकारांसह 54 धावा जमविल्या. अॅटकिनसनने 44 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 43 धावांचे आव्हान दिले. कर्णधार स्टोक्स दुखापतीमुळे फलंदाजी करु शकला नाही. उपाहारावेळी इंग्लंडने 39 षटकात 5 बाद 193 धावा जमविल्या होत्या. इंग्लंडचे शेवटचे पाच फलंदाज केवळ 41 धावांत तंबूत परतले. न्यूझीलंडतर्फे मिचेल सॅन्टेनरने 85 धावांत 4 तर मॅट हेन्री आणि साऊदी यांनी प्रत्येकी 2 तसेच ओरुरकेने एक गडी बाद केला. साऊदीची ही शेवटची कसोटी असून आता तो क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त होत आहे. न्यूझीलंडच्या केन विलियमसनने कसोटी क्रिकेटमधील आपले 33 वे शतक झळकविले. तर हॅमिल्टनच्या मैदानावर त्याचे हे सलग पाचवे असोटी शतक आहे. इंग्लंडच्या ब्रुकने या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात शतके झळकविल्याने त्याला मालिकावीर म्हणून घोषीत करण्यात आले. न्यूझीलंडच्या सॅन्टेनरने या सामन्यात फलंदाजीत पहिल्या डावात 76 तर दुसऱ्या डावात 49 धावा झळकविल्या तर गोलंदाजीत त्याने एकूण 7 गडी बाद केल्याने त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
न्यूझीलंडचा विक्रम
कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाने प्रतिस्पर्धी संघावर मिळविलेल्या सर्वात मोठ्या विजयाच्या विक्रमाशी बरोबरी केली. 2018 साली न्यूझीलंडने लंकेचा 423 धावांच्या फरकाने विक्रमी पराभव केला होता. या विक्रमाशी पुन्हा न्यूझीलंडने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात बरोबरी साधली.
हॅमिल्टनच्या तिसऱ्या कसोटीत दोन्ही संघांकडून अनेक विक्रम नोंदविले गेले. न्यूझीलंडच्या टीम साऊदीची ही निरोपाची कसोटी होती. कसोटी मालिकेत 300 धावांच्या फरकाने सामना गमविल्यानंतर पुढील सामन्यात 300 पेक्षा अधिक धावांनी विजय मिळविणारा न्यूझीलंड हा पहिला संघ आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा 323 धावांनी पराभव केला होता. हॅमिल्टनच्या मैदानावर न्यूझीलंडने आतापर्यंत 10 कसोटी सामने खेळले असून त्यापैकी 8 सामने जिंकले आहेत तर दोन सामने अनिर्णीत राहिले. एक वर्षांच्या क्रिकेट हंगामात दोनवेळा 400 पेक्षा अधिक धावांनी पराभूत होणारा इंग्लंड हा पहिला संघ आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात भारताने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला होता.
रुटचा आगळा विक्रम
इंग्लंडचा माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलु रुटने पाकच्या जावेद मियॉदादचा विक्रम मागे टाकला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक धावा आता रुटने नोंदविल्या आहेत. रुटने न्यूझीलंड विरुद्ध आतापर्यंत 1925 धावा जमविल्या आहेत. तर मियॉदादने यापूर्वी 1919 धावांचा विक्रम केला होता. त्याचप्रमाणे भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा इंग्लंडतर्फे नोंदविण्याचा बहुमान ब्रुकला मिळाला आहे. त्याने भारताविरुद्ध आतापर्यंत 2846 धावा केल्या आहेत. न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक अर्धशतके नोंदविण्याचा बहुमानही रुटने मिळविला आहे. त्याने आतापर्यंत 85 अर्धशतके झळकविली आहेत.
टिम साऊदीची ही शेवटची कसोटी असल्याने संघसहकाऱ्यांनी त्याला दणदणीत विजय मिळवित निरोपाची भेट दिली.
संक्षिप्त धावलफक: न्यूझीलंड प. डाव 97.1 षटकात सर्वबाद 347, इंग्लंड प. डाव 35.4 षटकात सर्वबाद 143, न्यूझीलंड दु. डाव 101.4 षटकात सर्वबाद 453, इंग्लंड दु. डाव 47.2 षटकात सर्वबाद 234 (बेथेल 76, रुट 54, अॅटकिनसन 43, कार्से 11, पॉप 17, अवांतर 21, सॅन्टनर 4-85, साऊदी 2-34, हेन्री 2-32,ओरुरके 1-37)