न्यूझीलंडचा द.आफ्रिकेवर पहिला मालिकाविजय
द.आफ्रिकेवर 7 गड्यांनी मात, ‘मालिकावीर’ केन विल्यम्सनचे दमदार शतक, ओरुरके सामनावीर
वृत्तसंस्था/ हॅमिल्टन
यजमान न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असा एकतर्फी पराभव करीत 92 वर्षात द.आफ्रिकेवर पहिला मालिकाविजय नोंदवण्याचा इतिहास घडविला. शुक्रवारी येथे खेळाच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा 7 गड्यांनी पराभव केला. केन विल्यम्सनने दमदार नाबाद शतक झळकवताना 32 शतकांचा टप्पा सर्वात कमी डावांत नोंदवण्याचा विक्रम केला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 242 धावा जमविल्यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव 211 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 31 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावात 235 धावा जमवित न्यूझीलंडला निर्णायक विजयासाठी 267 धावांचे आव्हान दिले. न्यूझीलंडने 1 बाद 40 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्यांनी 94.2 षटकात 3 बाद 269 धावा जमवित हा सामना 7 गड्यांनी जिंकला.
न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात केन विल्यम्सनने यंग समवेत चौथ्या गड्यासाठी अभेद्य 152 धावांची भागिदारी केली. विल्यम्सनने 260 चेंडूत 2 षटकार आणि 12 चौकारांसह नाबाद 133 तर यंगने 134 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 60 धावा झळकविल्या. खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडला विजयासाठी 227 धावांची गरज होती. तर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 9 गडी बाद करणे गरजेचे होते. या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघातील आघाडीच्या खेळाडूंनी आपल्या देशातील टी-20 लिग स्पर्धेत खेळण्याचे ठरविल्याने त्यांची उणीव या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला चांगलीच भासली. या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघामध्ये कर्णधार निल ब्रँडसह अन्य 6 खेळाडूंनी आपले कसोटी पदार्पण केले. दक्षिण आफ्रिकेच्या या नवोदित संघातील सर्व खेळाडूंनी एकूण 51 कसोटी सामने खेळले तर न्यूझीलंड संघातील सर्व खेळाडूंनी 436 कसोटी सामने खेळले आहेत.
या दुसऱ्या कसोटीत शुक्रवारी न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावातील 95 व्या षटकात विजयाची नोंद केली. चौथ्या दिवशीचा खेळ संपण्यास 20 मिनिटे बाकी असताना न्यूझीलंडने हा विजय हस्तगत केला. या मालिकेत केन विल्यम्सनने आपल्या दर्जेदार फलंदाजीचे दर्शन घडवित न्यूझीलंडला एकहाती मालिका जिंकून दिली. त्याने या सामन्यात आपले 32 वे कसोटी शतक 203 चेंडूत साजरे केले. विल्यम्सनने रचिन रवींद्र समवेत तिसऱ्या गड्यासाठी 64 धावांची भागिदारी केली. रचिन रवींद्रने 72 चेंडूत 20 धावा जमविल्या. मात्र रचिन रवींद्र बाद झाल्यानंतर विल्यम्सनला विल यंगने शेवटपर्यंत साथ दिली. रचिन रवींद्र बाद झाला त्यावेळी न्यूझीलंडवर बरेच दडपण आले होते. यावेळी न्यूझीलंडला विजयासाठी आणखी 150 धावांची गरज होती. विल्यम्सनने सावध फलंदाजी करत धावफलक हालता ठेवला. त्याने आपले अर्धशतक 118 चेंडूत पूर्ण केले. कसोटी क्रिकेटच्या फलंदाजांच्या मानांकनात केन विल्यम्सनने आपले अग्रस्थान सार्थ ठरविले. सध्या कसोटी क्रिकेटमध्ये केन विल्यम्सन आणि ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ यांनी 32 शतकांचा टप्पा गाठला आहे. विल्यम्सनने सर्वात कमी 172 डावांमध्ये 32 शतकांची नोंद केली असून त्याने स्मिथ, रिकी पाँटींग, सचिन तेंडुलकर, युनूस खान, सुनील गावसकर, कुमार संगकारा, कॅलिस तसेच ब्रायन लारा यांना मागे टाकले आहे.
हॅमिल्टनच्या दुसऱ्या कसोटीत शुक्रवारी खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला साथ देत होती. तर चेंडू अनपेक्षित उसळत असल्याने फलंदाजांना फलंदाजी करणे अवघड जात होते. 2 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत केन विल्यम्सनने 4 डावात 134 धावांच्या सरासरीने 3 शतकांसह 403 धावा जमविल्या आहेत. या संपूर्ण मालिकेत विल्यम्सनने सुमारे साडे अठरा तास फलंदाजी करण्याचा विक्रम केला आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिका संघामध्ये नवोदित खेळाडू अधिक असतानाही त्यांची कामगिरी निश्चितच दर्जेदार झाली. कर्णधार निल ब्रँडने कसोटी पदार्पणातील पहिल्या कसोटीत कमी अनुभवामुळे चांगली कामगिरी करू शकला नाही. पण दुसऱ्या कसोटीत त्याने न्यूझीलंडला कडवी लढत दिली. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत पहिल्यांदाच तेंगीवेई शिल्ड तसेच चषकही ठेवण्यात आला होता. न्यूझीलंडला हे शिल्ड आणि चषक मिळाले.
संक्षिप्त धावफलक - दक्षिण आफ्रिका प. डाव 97.2 षटकात सर्व बाद 242, न्यूझीलंड प. डाव 77.3 षटकात सर्व बाद 211, दक्षिण आफ्रिका दु. डाव 69.5 षटकात सर्व बाद 235, न्यूझीलंड दु. डाव 94.2 षटकात 3 बाद 269 (लेथम 30, कॉन्वे 17, विल्यम्सन नाबाद 133, यंग नाबाद 7, रचिन रवींद्र 20, अवांतर 9, पिडेट 3-93).