न्यूझीलंडचा मुन्रो क्रिकेटमधून निवृत्त
वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज कॉलिन मुन्रोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. येत्या जून महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघात स्थान न मिळाल्याने मुन्रोने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
कॉलिन मुन्रोने आपल्या अल्पशा क्रिकेट कारकीर्दीमध्ये 1 कसोटी, 57 वनडे आणि 65 टी-20 सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व करताना क्रिकेटच्या विविध प्रकारात एकूण 3010 धावा जमविल्या आहेत. टी-20 प्रकारामध्ये 37 वर्षीय मुन्रोने फलंदाजीत सातत्य राखले होते. डावखुऱ्या मुन्रोने 156.44 स्ट्राईकरेट राखला. तसेच त्याने विविध टी-20 स्पर्धांमध्ये त्याने 10 हजारपेक्षा अधिक धावा जमविल्या आहेत. मुनोरोचा जन्म दर्बानमध्ये झाला. त्याने 428 टी-20 सामन्यात एकूण 10,961 धावा जमविल्या आहेत. 2020 साली कॉलिन मुन्रोने आपला शेवटचा टी-20 सामना भारताविरुद्ध खेळला होता.
आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघात स्थान मिळेल अशी अपेक्षा मुन्रोने बळगली होती. या स्पर्धेसाठी न्यूझीलंडचा संघ निवडताना झालेल्या बैठकीमध्ये मुन्रोच्या नावाची चर्चा करण्यात आली होती. पण त्याला संघात स्थान देण्यात आले नाही, असे न्यूझीलंडचे प्रमुख प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी सांगितले. मुन्रोने 2016 साली लंकेविरुद्ध इडन पार्कमध्ये झालेल्या सामन्यात 14 चेंडूत अर्धशतक झळकवले होते. तसेच त्याने 2018 साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या विंडीज विरुद्धच्या सामन्यात 47 चेंडूत शतक झळकवले होते. टी-20 प्रकारात तीन शतके झळकवणारा मुन्रो हा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज आहे.