दुसऱ्या वनडेतही न्यूझीलंडची बाजी
बांगलादेशवर 7 गडी राखून विजय : किवीज संघाची मालिकेत 2-0 ने आघाडी :
वृत्तसंस्था/ नेल्सन
बांगलादेश क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघात 3 वनडे आणि 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (दि. 20 डिसेंबर) सेक्सटॉन ओव्हल, नेल्सन येथे पार पडला. या सामन्यात यजमान न्यूझीलंडने बांगलादेशवर 7 विकेट्सने विजय मिळवला. हा त्यांचा सलग दुसरा विजय ठरला. या विजयासह त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना दि.23 रोजी होईल.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेत बांगलादेशला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. यावेळी बांगलादेशने 49.5 षटकात सर्वबाद गमावत 291 धावा केल्या. बांगलादेशकडून डावाची सुरुवात करताना सौम्य सरकारने दीडशतकी खेळी करत इतिहास घडवला. सौम्य सरकारने सलामीला फलंदाजी करताना 151 चेंडूत 169 धावांची विस्फोटक खेळी केली. त्याच्या या खेळीत 2 षटकार आणि 22 चौकारांचा समावेश होता. ही खेळी करताच त्याने सचिनचा 14 वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त केला. न्यूझीलंडमध्ये कोणताही आशियाई सलामी फलंदाज म्हणून वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने 2009 मध्ये ख्राईस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या वनडेत 163 धावांची खेळी केली होती. सौम्याशिवाय, मुशफिकुर रहीमने 45 तर मेहंदी हसन मिराजने 19 धावा केल्या. इतर फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. न्यूझीलंडकडून जेकब डफी आणि विलियम ओरर्के यांनी प्रत्येकी 3 विकेट्स नावावर केल्या.
दरम्यान, बांगलादेशच्या 292 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 46.2 षटकात 3 विकेट्स गमावत 296 धावा केल्या. हेन्री निकोल्सने सर्वाधिक 95 धावांची खेळी केली. याशिवाय सलामीवीर विल यंगने 85, रचिन रवींद्रने 45, टॉम लॅथमने नाबाद 34 आणि टॉम ब्लंडेलने नाबाद 24 धावांची खेळी केली. या सामन्यात न्यूझीलंडने जरी विजय मिळवला असला तरी 169 धावांची धमाकेदार खेळी साकारणाऱ्या सौम्या सरकारला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.