न्यूझीलंडचा 60 धावांनी विजय
सामनावीर ईश सोधी : 12 धावांत 4 बळी
वृत्तसंस्था / हरारे
टी-20 तिरंगी मालिकेतील येथे खेळविण्यात आलेल्या सहाव्या सामन्यात न्यूझीलंडने यजमान झिम्बाब्वेचा 60 धावांनी पराभव केला. या तिरंगी मालिकेत न्यूझीलंड आणि द. आफ्रिका यांनी अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले असून हा अंतिम सामना शनिवारी खेळविला जाईल.
सहाव्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 190 धावा जमविल्या. त्यानंतर झिम्बाब्वेचा डाव 18.5 षटकात 130 धावांत आटोपला. न्यूझ्^ााrलंड संघातील ईश सोधीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने 12 धावांत 4 गडी बाद केले.
न्यूझीलंडच्या डावात सिफर्टने 45 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 75, रचिन रवींद्रने 39 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 63, रॉबिन्सनने 9 चेंडूत 1 षटकारासह 10 तर ब्रेसवेलने 16 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 26 धावा जमविल्या. न्यूझीलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 57 धावा जमविताना 1 गडी गमविला. सिफर्टने आपले अर्धशतक 33 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने तर रचिन रवींद्रने आपले अर्धशतक 32 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने झळकविले. झिम्बाब्वेतर्फे रिचर्ड निगरेव्हाने 34 धावांत 4 तर मापोसाने 33 धावांत 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना झिम्बाब्वेच्या डावात मुनयोंगाने 30 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 40, मेयर्सने 18 चेंडूत 4 चौकारांसह 22, मुसीकेवाने 21 चेंडूत 1 चौकारासह 21 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे सोधीने 12 धावांत 4 तर हेन्रीने 34 धावांत 2, फोकेस, ओरुरकी आणि ब्रेसवेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. झिम्बाब्वेच्या डावात झिम्बाब्वेने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 38 धावांच्या मोबदल्यात 4 गडी गमविले.
संक्षिप्त धावफलक: न्यूझीलंड 20 षटकात 6 बाद 190 (सिफर्ड 75, रॉबिनसन 10, रचिन रवींद्र 63, ब्रेसवेल नाबाद 26, निगरेव्हा 4-34, मापोसा 2-33), झिम्बाब्व 18.5 षटकात सर्वबाद 140 (मुनयोंगा 40, मेयर्स 22, मुसीकेवा 21, अवांतर 12, सोधी 4-12, हेन्री 2-34, फोकेश, ओरुरकी व ब्रेसवेल प्रत्येकी 1 बळी)