For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकला नमवत न्यूझीलंड महिला संघ सेमीफायनलमध्ये

06:58 AM Oct 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकला नमवत न्यूझीलंड महिला संघ सेमीफायनलमध्ये
Advertisement

भारत, पाकिस्तान टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर

Advertisement

वृत्तसंस्था/ शारजाह

आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने पाकिस्तानचा 54 धावांनी धुव्वा उडवला. पाकिस्तानच्या पराभवामुळे भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर पडला आहे. रविवारी (13 ऑक्टोबर) भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 9 धावांनी पराभव झाला होता. अशा परिस्थितीत न्यूझीलंड-पाकिस्तान सामन्याच्या निकालावर टीम इंडियाच्या सेमी फायनलचे भवितव्य अवलंबून होते. वास्तविक, सेमी फायनल गाठण्यासाठी पाकिस्तानला 111 धावांचे लक्ष्य 10.4 षटकात गाठायचे होते. पण 10.4 षटकानंतर पाकिस्तानने हे लक्ष्य गाठले असते, तर भारतीय संघ सेमी फायनलमध्ये गेला असता. कारण भारताचे नेट रनरेट चांगले होते. पण, न्यूझीलंडने पाकचा एकतर्फी धुव्वा उडवत हा सामना जिंकून सेमी फायनलमध्ये एन्ट्री केली.

Advertisement

टी-20 वर्ल्डकपची सेमी फायनल गाठण्यासाठी भारत, न्यूझीलंड व पाकिस्तान यांच्यात चुरस होती. रविवारी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे सोमवारी होणारा पाकिस्तान आणि न्यूझीलंड सामना या दोघांसाठी अतिशय महत्त्वाचा होता. दुबईच्या संथ खेळपट्टीवर प्रथम खेळताना किवी संघाने 20 षटकात 6 बाद 110 धावा केल्या. दुबईच्या खेळपट्टीची अवस्था अशी होती की, संपूर्ण पाकिस्तान संघ त्यातून केवळ अर्ध्या धावाच करू शकला. पाकिस्तानी संघ 11.4 षटकात 56 धावा करून गारद झाला. किवी संघाच्या विजयामुळे भारत व पाकिस्तानच्या सेमीफायनल गाठण्याच्या आशा संपुष्टात आल्या.

पाकचा अवघ्या 56 धावांत खुर्दा

न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर 111 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण पाकिस्तान संघाच्या विकेट पडण्याची मालिका दुसऱ्या षटकात सुरू झाली. यानंतर 28 धावा होईपर्यंत अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. अडचणीत आलेल्या पाकचा डाव निदा दार व कर्णधार फातिमा सना यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 24 धावांची भागीदारी केली. अमेलिया केरच्या फसव्या चेंडूवर दार फसली आणि विकेटकीपर गेझने क्षणार्धात बेल्स उडवल्या. तिने 9 धावा केल्या. कार्सनने स्वत:च्याच गोलंदाजीवर अफलातून झेल टिपत ओमायमा सोहेलला तंबूत परतावले. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात सायदा शाह धावचीत झाली. केरने पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाला बाद केलं आणि त्यांच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. फातिमाने 21 धावा करत एकाकी झुंज दिली. पाक संघ 11.4 षटकांत 56 धावावर ऑलआऊट झाला.

किवीज संघ थाटात सेमीफायनलमध्ये

प्रारंभी, किवीज कर्णधार सोफी डिव्हाईनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर सुझी बेट्स व जॉर्जिया यांनी 41 धावांची सलामी दिली. 17 धावांवर जॉर्जियाला नशरा संधूने बाद करत पाकला पहिले यश मिळवून दिले. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या बेट्सला संधूनेच बाद केलं. बेट्सने 29 चेंडूत 3 चौकारांसह 28 धावांची खेळी केली. ओमायमा सोहेलने अनुभवी केरला बाद करत पाकिस्तानला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिलं. तिला 9 धावाच करता आल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत न्यूझीलंडच्या धावगतीला वेसण घातली. कर्णधार सोफी डिव्हाईनने 19 तर हॅलिडेने 22 धावांचे योगदान दिले. यामुळे किवीज संघाला 6 बाद 110 धावापर्यंत मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड महिला संघ 20 षटकांत 6 बाद 110 (सुझी बेट्स 28, जॉर्जिया 17, हॅलिडे 22, सोफी डिव्हाईन 19, नशरा संधू 18 धावांत 3 बळी)

पाकिस्तान महिला संघ 11.4 षटकांत सर्वबाद 56 (मुनीबा अली 15, फातिमा सना 21, अमेलिया केर 14 धावांत 3 बळी, कार्सन 7 धावांत 2 बळी).

भारतीय महिलांचे स्वप्न भंगले

वर्ल्डकपच्या सलामीच्या लढतीत भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव झाला होता. या दारुण पराभवामुळे भारतीय संघाच्या नेट रनरेटवरही परिणाम झाला होता. भारतीय संघाने पाकिस्तान आणि श्रीलंकेला नमवत पुनरागमन केलं. मात्र रविवारी झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. या पराभवामुळे भारतीय संघाचे भवितव्य पाकिस्तानच्या हाती गेले. पण, सोमवारी झालेल्या सामन्यात किवीज संघाने पाकवर एकतर्फी विजय मिळवत सेमीफायनल गाठली. विशेष म्हणजे, भारताला आजपर्यंत महिला टी-20 विश्वचषक जिंकता आलेला नाही आणि आता पुन्हा एकदा विश्वचषक ट्रॉफी उंचावण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे.

Advertisement
Tags :

.