भारतातील वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड महिला संघ जाहीर,
पॉली इंग्लिस नवा चेहरा, लॉरेनचे पुनरागमन, उद्या पहिला सामना अहमदाबादमध्ये
वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
न्यूझीलंडने भारताविरुद्ध होणाऱ्या महिलांच्या वनडे मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली असून यष्टिरक्षक फलंदाज पॉली इंग्लिसला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. न्यूझीलंड महिला संघाने नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे पहिल्यांदाच जेतेपद पटकावले आहे.
भारताविरुद्धची ही मालिका उद्या गुरुवारपासून अहमदाबाद येथील सामन्याने सुरू होणार आहे. 28 वर्षीय इंग्लिसने महिलांच्या सुपर स्मॅश स्पर्धेत ओटॅगो स्पार्क्सकडून तसेच न्यूझीलंड अ संघातून खेळताना सातत्यपूर्ण कामगिरी केली, त्याचे बक्षीस तिला मिळाले आहे. या कामगिरीने तिच्याशी न्यूझीलंड क्रिकेटने गेल्या जूनमध्ये मध्यवर्ती करारही केला आहे. ‘पॉलीला पहिला दौरा करण्याची संधी आम्ही दिली आहे,’ असे मुख्य प्रशिक्षक बेन सॉयर म्हणाले. ‘गेल्या मोसमात तिने हॅलीबर्टअन जॉन्स्टन शील्ड वनडे स्पर्धेत तसेच इंग्लंडविरुद्ध झालेल्या अ संघांच्या मालिकेत तिने उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यामुळे तिला पुढचे पाऊल टाकण्याची संधी मिळाली आहे,’ असेही ते म्हणाले.
याशिवाय लॉरेन डाऊन हिचेही राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. प्रसूती रजेच्या ब्रेकनंतर तिने गेल्या जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. यावर्षीच पाठदुखीची गंभीर दुखापत झालेल्या रोजमेरी मायरला या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. टी-20 वर्ल्ड कप जिंकलेल्या संघातील आणखी एक खेळाडू ऑफस्पिनर लीह कास्पेरेक हिलाही या संघात स्थान देण्यात आलेले नाही. ‘भारताचा दौरा करणे हा जागतिक क्रिकेटमध्ये एक मोठा अनुभव मानला जातो. सर्वच खेळाडूंसाठी येथे खेळणे खास वाटते. त्यामुळे संघातील प्रत्येक जण या आव्हानाला सामोरे जाण्यास उत्सुक झाल्या आहेत, याची मला जाणीव आहे,’ असेही सॉयर म्हणाले.
पुढील वर्षी भारतात महिलांची वनडे वर्ल्ड कप स्पर्धा होणार असल्याने या मालिकेकडे न्यूझीलंड संघ तयारीच्या दृष्टिकोनातून पाहत आहे. टी-20 वर्ल्ड कप दुबईत जिंकलो असलो तरी भारतातील वातावरण, परिस्थिती वेगळी असेल, त्यामुळे ही मालिका जिंकण्याचे आव्हान पेलण्यासाठी आम्हाला त्यावर जास्त फोकस करावे लागेल, असेही प्रमुख प्रशिक्षक म्हणाले.
भारताविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी निवडलेला न्यूझीलंड महिला संघ : सोफी डिव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, लॉरेन डाऊन, इझी गेझ, मॅडी ग्रीन, ब्रूक हॅलीडे, पॉली इंग्लिस, फ्रान जोनास, जेस कर, मेली कर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हन्नाह रोव, लीआ ताहुहू.