न्यूझीलंड महिला अंतिम फेरीत प्रवेश
रोमांचक सामन्यात विंडीजचा 8 धावांनी पराभव, इडन कार्सन ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / शारजा
शुक्रवारी शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाने कडव्या विंडीजचा 8 धावांनी पराभव करत आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. रविवारी न्यूझीलंड आणि द. आफ्रिका यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. 29 धावांत 3 गडी बाद करणाऱ्या न्यूझीलंडच्या इडनि कार्सनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या
उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 128 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 20 षटकात 8 बाद 120 धावांपर्यंत मजल मारली.
न्यूझीलंडच्या डावामध्ये बेटस् आणि प्लिमेर या सलामीच्या जोडीने 50 चेंडूत 48 धावांची भागिदारी केली. बेटस्ने 28 चेंडूत 1 चौकारासह 26 तर प्लिमेरने 31 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 31 धावा जमविल्या. अॅमेलिया केर 7 धावांवर बाद झाली. कर्णधार डिव्हाईनने 12 चेंडूत 1 चौकारासह 12, हॅलीडेने 9 चेंडूत 2 चौकारांसह 18 तर गेझने 14 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 20 धावा केल्या. न्यूझीलंडच्या डावात 1 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. वेंडीजतर्फे डॉटीन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 22 धावांत 4 गडी बाद केले. फ्लेचरने 23 धावांत 2 तर करिश्मा रामहरक आणि अॅलीन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. न्यूझीलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 32 धावा जमविल्या. न्यूझीलंडचे अर्धशतक 53 चेंडूत तर शतक 94 चेंडूत फलकावर लागले. न्यूझीलंडने 10 षटकाअखेर 1 बाद 54 धावा जमविल्या होत्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावात कर्णधार मॅथ्युजने 21 चेंडूत 2 चौकारांसह 15, जोसेफने 12 चेंडूत 2 चौकारांसह 12, कॅम्पबेलने 3, स्टिफेनी टेलरने 20 चेंडूत 1 चौकारासह 13 धावा जमविल्या. डॉटीन मैदानात असेपर्यंत विंडीजला विजयाची आशा होती. पण डॉटीन बाद झाल्यानंतर विंडीजला पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडचे क्षेत्ररक्षण चांगले झाले नाही. त्यांच्याकडून अनेक जीवदाने मिळाली. पण विंडीजला त्याचा लाभ उठविता आला नाही. डॉटीनने 22 चेंडूत 3 षटकारासह 33 तर फ्लेचरने 15 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 17 तसेच जेम्सने 8 चेंडूत 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 3 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. विंडीजने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 25 धावा जमविताना दोन गडी गमविले. विंडीजचे अर्धशतक 62 चेंडूत तर शतक 106 चेंडूत फलकावर लागले. न्यूझीलंडतर्फे कार्सनने 29 धावांत 3 तर अॅमेलिया केरने 14 धावांत 2, जोनास, ताहुहु आणि बेटस् यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: न्यूझीलंड 20 षटकात 9 बाद 128- (प्लिमेर 33, बेटस् 26, डिव्हाईन 12, हॅलीडे 18, गेझ नाबाद 20, डॉटीन 4-22, फ्लेचर 2-23, रामहरक 1-11, अॅलेनी 1-31), विंडीज 20 षटकात 8 बाद 120 (डॉटीन 33, फ्लेचर नाबाद 17, मॅथ्युज 15, जोसेफ 12, टेलर 13, जेम्स 14 अवांतर 8, कार्सन 3-29, केर 2-14, जोनास 1-21, ताहुहु 1-33, बेटस 1-6)