तिरंगी टी-20 मालिकेत न्यूझीलंड विजेता
द.आफ्रिकेचा 3 धावांनी पराभव, मॅट हेन्रीला दुहेरी मुकुट
वृत्तसंस्था / हरारे
येथे शनिवारी झालेल्या तिरंगी टी-20 मालिकेचे अजिंक्यपद न्यूझीलंडने पटकाविले. या मालिकेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडने बलाढ्या द. आफ्रिकेचा केवळ 3 धावांनी पराभव केला. या मालिकेत यजमान झिम्बाब्वेचे आव्हान प्राथमिक फेरीतच समाप्त झाले. या तिरंगी मालिकेत न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीला ‘मालिकावीर’ व ‘सामनावीर’ असा दुहेरी पुरस्कार मिळाला. हेन्रीने या मालिकेत 10 गडी बाद केले तर या अंतिम सामन्यात त्याने 19 धावांत 2 बळी मिळविले.
शनिवारच्या अंतिम सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 20 षटकात 5 बाद 180 धावा जमविल्या. त्यानंतर द. आफ्रिकेने 20 षटकात 6 बाद 177 धावा जमविल्याने त्यांना हा सामना 3 धावांनी गमवावा लागला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या सामन्यात न्यूझीलंडचे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी दर्जेदार झाली.
न्यूझीलंडच्या डावामध्ये सलामीच्या सिफर्टने 28 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 30, कॉन्वेने 31 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 47, रचिन रविंद्रने 27 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 47, मिचेलने 14 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 16, ब्रेसवेलने 12 चेंडूत 1 चौकारासह 15, कर्णधार सँटेनरने नाबाद 3 धावा केल्या. न्यूझीलंडला 19 अवांतर धावा मिळाल्या. त्यामध्ये 13 व्हाईडचा समावेश आहे. सिफर्ट आणि कॉन्वे यांनी 52 चेंडूत 75 धावांची भागिदारी केली. चॅपमन केवळ 3 धावांवर बाद झाला. न्यूझीलंडच्या डावात 4 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेतर्फे एन्गिडीने 24 धावांत 2 तर बर्जर, मापेका, मुत्तुसॅमी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 52 धावा जमविल्या. न्यूझीलंडचे अर्धशतक 33 चेंडूत तर शतक 60 चेंडूत तर दीड शतक 100 चेंडूत नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिकेच्या डावात सलामीच्या प्रेटोरियसने 35 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 51 धावांचे योगदान दिले. मात्र प्रेटोरियसचे अर्धशतक वाया गेले. हेन्ड्रीक्सने 31 चेंडूत 4 षटकारांसह 37 धावा जमविताना प्रेटोरियस समवेत सलामीच्या गड्यासाठी 58 चेंडूत 92 धावांची भागिदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर द. आफ्रिकेच्या फलंदाजांना न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चांगलेच झखडून ठेवले. कर्णधार व्हॅन डेर ड्युसेनने 17 चेंडूत 2 चौकारांसह 18, हर्मनने 8 चेंडूत 1 चौकारासह 11, ब्रेव्हीसने 16 चेंडूत 3 षटकार 1 चौकारासह 31, लिंडेने 10 चेंडूत 1 चौकारासह 10 तर बॉश्चने नाबाद 3 धावा जमविल्या. द. आफ्रिकेच्या डावात 9 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे मॅक हेन्रीने 19 धावांत 2 तर डफी, फोकेस, मिलेनी आणि ब्रेसवेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. द. आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 46 धावा जमविल्या. द. आफ्रिकेचे अर्धशतक 40 चेंडूत तर शतक 67 आणि दीड शतक 104 चेंडूत नोंदविले गेले. प्रेटोरियसने 33 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक झळकविले.
संक्षिप्त धावफलक: न्यूझीलंड 20 षटकात 5 बाद 180 (सिफर्ट 30, कॉन्वे 47, रचिन रविंद्र 47, मिचेल नाबाद 16, ब्रेसवेल 15, अवांतर 19, एन्गिडी 2-24, बर्जर, माफेका, मुत्तुसॅमी प्रत्येकी 1 बळी), द. आफ्रिका 20 षटकात 6 बाद 177 (प्रेटोरियस 51, हेन्ड्रीक्स 37, व्हॅन डेर ड्युसेन 18, हर्मन 11, ब्रेव्हीस 30, अवांतर 16, मॅट हेन्री 2-19, डफी, फोकेस, मिलेनी आणि ब्रेसवेल प्रत्येकी 1 बळी)