न्यूझीलंड पहिल्यांदाच विश्वचषकाचा मानकरी
दक्षिण आफ्रिका ठरली चोकर्स, अॅमेलिया केर ‘मालिकावीर’, ’सामनावीर’
वृत्तसंस्था/ दुबई
न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाने रविवारी येथे आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आयसीसीच्या टी-20 विश्वचषकावर आपले नाव पहिल्यांदाच कोरले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर 32 धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात फलंदाजीत 4 चौकारांसह 43 धावा तर गोलंदाजीत 24 धावात 3 गडी बाद करणाऱ्या न्यूझीलंडच्या अष्टपैलू अॅमेलिया केरला ‘मालिकावीर’ आणि ‘सामनावीर’ असा दुहेरी पुरस्कार मिळाला. दक्षिण आफ्रिकेचा संघ या स्पर्धेत पुरुष संघाप्रमाणे चोकर्स ठरला.
आयसीसी विश्वचषक महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 9 बाद 126 धावा जमविल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या डावाला वुलव्हर्ट आणि ब्रिट्स यांनी दमदार सुरुवात करुन देताना सलामीच्या गड्यासाठी 51 धावांची भागिदारी केली होती. पॉवर प्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेने 6 षटकात 47 धावा जमविल्या. पण दक्षिण आफ्रिकेची ही सलामीची जोडी फुटल्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आपल्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारली. वुलव्हर्टने 27 चेंडूत 5 चौकारांसह 33, ब्रिट्सने 18 चेंडूत 1 चौकारासह 17, बॉशने 1 चौकारासह 9, कॅपने 1 चौकारासह 8 ट्रायॉनने 1 चौकारासह 14, डर्कसनने 10 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 10 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेचे अर्धशतक 40 चेंडूत तर शतक 96 चेंडूत फलकावर लागले. 10 षटकाअखेर दक्षिण आफ्रिकेने 3 बाद 64 धावा जमविल्या होत्या. न्यूझीलंडतर्फे अॅमेलिया केर आणि मेयर यांनी प्रत्येकी 3 तर कार्सन, हॅलिडे आणि जेनसन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. सलामीची सुझी बेट्स, अॅमेलिया केर आणि हॅलिडे यांनी समायोचीत फलंदाजी केल्याने न्यूझीलंडला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. डावातील दुसऱ्या षटकात खाकाने प्लिमेरला लूसकरवी झेलबाद केले. तिने 2 चौकारांसह 9 धावा जमविल्या. बेट्स आणि अॅमेलिया केर यांनी दुसऱ्या गड्यासाठी 37 धावांची भागिदारी केली. मलाबाने बेट्सचा त्रिफळा उडविला. तिने 31 चेंडूत 3 चौकारांसह 32 धावा जमविल्या. कर्णधार सोफी डिव्हाईन डी. क्लर्कच्या गोलंदाजीवर पायचीत झाली. तिने 10 चेंडूत 6 धावा केल्या. न्यूझीलंडची यावेळी स्थिती 10.2 षटकात 3 बाद 70 अशी होती.
अॅमेलिया केर आणि हॅलिडे यांनी चौथ्या गड्यासाठी 57 धावांची भर घातली. हॅलिडेने 28 चेंडूत 3 चौकारांसह 38 धावा जमविल्या. ट्रायॉनने तिला बॉशकरवी झेलबाद केले. मलाबाने केरला झेलबाद केले. तिने 38 चेंडूत 4 चौकारांसह 43 धावा जमविल्या. मॅडी ग्रीन आणि गेझ यांनी शेवटच्या 2 षटकात फटकेबाजी करण्याच्या प्रयत्न केला आणि त्यांना थोडेफार यशही आले. ग्रीनने 6 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 12 तर गेझने नाबाद 3 धावा जमविल्या. न्यूझीलंडने 20 षटकात 5 बाद 158 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 1 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. पॉवर प्ले दरम्यानच्या 6 षटकात न्यूझीलंडने 43 धावा जमविताना 1 गडी गमविला. न्यूझीलंडचे अर्धशतक 43 चेंडूत, शतक 87 चेंडूत तर दीडशतक 121 चेंडूत फलकावर लागले. न्यूझीलंडने 10 षटकाअखेर 2 बाद 70 धावा जमविल्या होत्या. केर आणि हॅलिडे यांनी चौथ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी 37 चेंडूत नोंदविली. दक्षिण आफ्रिकेतर्फे मलाबाने 2 तर खाका, ट्रायॉन आणि डी. क्लर्क यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - न्यूझीलंड 20 षटकात 5 बाद 158 (बेट्स 32, प्लिमेर 9, अॅमेलिया केर 43, डिव्हाईन 6, हॅलिडे 38, ग्रीन नाबाद 12, गेझ नाबाद 3, अवांतर 13, मलाबा 2-31, खाका, ट्रायॉन आणि डी. क्लर्क प्रत्येकी 1 बळी). द. आफ्रिका 20 षटकात 9 बाद 126 (वुलव्हर्ट 33, ब्रिट्स 17, ट्रायॉन 14, डर्कसन 10, अवांतर 7, मेयर 3-21, केर 3-24, कार्सन 1-22, जोनास 1-28, हॅलिडे 1-4)