For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-दक्षिण आफ्रिका पहिला टी-20 सामना आज

06:58 AM Dec 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारत दक्षिण आफ्रिका पहिला टी 20 सामना आज
Advertisement

शुभमन गिल, हार्दिक पंड्याचे पुनरागमन

Advertisement

वृत्तसंस्था/ कटक

भारताच्या दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-20 सामना आज येथे खेळविण्यात येणार असून शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या यांचे पुनरागमन विद्यमान विश्वविजेत्या भारताला नवीन चमक आणि अत्यंत आवश्यक बळ देईल.

Advertisement

 

ही मालिका फेब्रुवारीमध्ये मायभूमीत होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने भारताच्या औपचारिक तयारीची सुऊवात आहे. यात ते दक्षिण आफ्रिकेविऊद्ध पाच आणि त्यानंतर न्यूझीलंडविऊद्ध आणखी पाच असे 10 टी-20 सामने खेळतील. 7 फेब्रुवारी रोजी वानखेडेवर होणाऱ्या अमेरिकेविऊद्धच्या लढतीने ते जेतेपदाच्या बचावाची सुऊवात करतील. भारत या टप्प्यात भूमिका सुधारणे, संघरचना सुव्यवस्थित करणे आणि घरच्या प्रेक्षकांसमोर अपेक्षांचे वजन वाहून नेणारा अंतिम संघ निश्चित करणे यावर भर देईल.

गेल्या वर्षी विश्वचषक जिंकल्यानंतर भारत एक जबरदस्त टी-20 संघ राहिला आहे. विश्वचषकात त्यांनी सलग आठ सामने जिंकून जेतेपद पटकावले. तेव्हापासून, त्यांनी आपला विजयांचा आकडा 26 पर्यंत वाढवला असून त्यात दुबईतील आशिया चषक जिंकताना त्यांनी सलग सात सामन्यांत नोंदविलेले विजय देखील समाविष्ट आहेत. यादरम्यान फक्त चार पराभव त्यांनी स्वीकारलेले आहेत. या काळात त्यांनी एकही टी-20 मालिका गमावलेली नाही आणि फक्त किरकोळ बदल आवश्यक असल्याने ते टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत केलेल्या संघाविऊद्ध प्रभावी कामगिरी घडविण्याची आशा करतील.

दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न करताना मानेच्या दुखापतीमुळे जवळजवळ एक महिना क्रिकेट खेळू न शकल्यानंतर गिलचे पुनरागमन घडत आहे. गेल्या आयपीएलपासून तो सतत क्रिकेट खेळलेला असल्याने आणि भारताला पुढे व्यस्त मोसमाचा सामना करावा लागणार असल्याने त्याच्यावरील भारावर व्यवस्थापन बारकाईने लक्ष ठेवेल. परंतु 33 टी-20 सामन्यांमध्ये 29.89 च्या सरासरीने 837 धावा जमविणाऱ्या गिलसाठी ही मालिका आयसीसी स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते.

गिलची अभिषेक शर्मासोबत जोडी जमणार असून त्यामुळे भारताला एक दमदार सलामीची जोडी प्राप्त होईल. अभिषेकसाठी ऑस्ट्रेलियाचा उत्कृष्ट दौरा ताजा असून तिथे त्याने 2-1 विजयात 163 धावा करून भारतीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले. शिवाय सय्यद मुश्ताक अली टी-20 मध्ये पंजाबच्या या डावखुऱ्या फलंदाजाने 50.66 च्या सरासरीने आणि 249 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 304 धावा केल्या आहेत. त्यात बंगालविऊद्ध 52 चेंडूंत केलेल्या 148 धावांचा समावेश होतो.

आशिया चषकादरम्यान झालेल्या दुखापतीनंतर हार्दिक पंड्याचे पुनरागमनही तितकेच महत्त्वाचे आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ बाहेर असलेल्या या अष्टपैलू खेळाडूने बडोद्याकडून 42 चेंडूंत 77 धावा काढून आणि नंतर पूर्ण चार षटके टाकून 52 धावांत 1 बळी मिळवून शैलीदार पुनरागमन केले आहे. तो संघ येण्याच्या एक दिवस आधी येथे आला,. बाराबती स्टेडियमवर त्याने एकट्याने सराव करताना 20 मिनिटे गोलंदाजी केली. त्याची उपस्थिती केवळ भारताची फलंदाजी मजबूत करत नाही तर गोलंदाजीलाही संतुलन प्राप्त करून देते.

मालिकेपूर्वीची एक महत्त्वाची चर्चा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या दीर्घकाळापासूनच्या खराब फॉर्मविषयी आहे. आयपीएल, 2025 मध्य त्याने मुंबई इंडियन्ससाठी 717 धावा केल्या. पण गेल्या वर्षी जुलैमध्ये टी-20 कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून त्याचा फॉर्म घसरून सरासरी 15.33 वर आली आहे. 15 डावांमध्ये त्याने फक्त 184 धावा केल्या असून. गेल्या 20 सामन्यांमध्ये त्याने एकही अर्धशतक झळकावलेले नाही. त्याचा स्ट्राइक रेट 127.77 इतका कमी झाला आहे. या हंगामात सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत तो अर्धशतक गाठू शकला नाही. पाच सामन्यांमध्ये त्याने 165 धावा केल्या आहेत. विश्वचषकापूर्वी कोणताही मोठा बदल होणे अशक्य दिसत असले, तरी पुढील 10 टी-20 सामने त्याच्या फॉर्म आणि कर्णधारपदाविषयीच्या चर्चेत भर घालतील.

संजू सॅमसन की, जितेश शर्माला खेळवायचे हा आणखी एक मोठा पेच आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान भारताने या जोडीला ज्या प्रकारे हाताळले त्यामुळे भुवया उंचावल्या होत्या. सॅमसनने फक्त एकदाच फलंदाजी केली आणि शेवटच्या तीन टी-20 सामन्यांसाठी जितेशला पाठिंबा देण्यापूर्वी त्याला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. भारताच्या विश्वचषक विजेतेपदापासून सॅमसन संघाचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने तीन शतके झळकावून सलामीवीर म्हणून आपली छाप टाकलेली आहे, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेतील दोन शतके आहेत. परंतु गिलच्या उपकर्णधारपदी पुनरागमनामुळे सॅमसनला टी-20 क्रिकेटमध्ये क्वचितच वाट्याला येणारी खालच्या फळीतील भूमिका मिळाली आहे. अलीकडच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सॅमसन दोन अर्धशतके, दोन वेळा 40 धावा आणि आंध्रविरुद्ध 56 चेंडूंत नाबाद 73 धावा करून उत्कृष्ट लयीत राहिला. दुसरीकडे, जितेशची बडोद्यातर्फे खेळताना माफक कामगिरी झालेली असून सहा सामन्यांमध्ये त्याची 41 ही सर्वांत मोठी खेळी राहिलेली आहे.

गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा वेगवान गोलंदाज एन्रिच नोर्टजेचे पुनरागमन दक्षिण आफ्रिकेला मजबुती देईल. अष्टपैलू खेळाडू म्हणून मार्को जॅनसेनची प्रगती त्यात भर घालेल. गुवाहाटी कसोटीत केलेल्या 93 धावा आणि रांचीमध्ये 39 चेंडूंत केलेल्या 70 धावा त्याची फलंदाजीतील क्षमता दाखवून गेल्या आहेत. अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज देखील संघात परतला आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेला फलंदाज टोनी डी झोर्झी आणि तऊण वेगवान गोलंदाज क्वेना माफाकाची उणीव भासेल. दोघेही दुखापतीमुळे पाच सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडले आहेत.

संघ : भारत-सूर्यकुमार यादव (कर्णधार). शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, जितेश शर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि वऊण चक्रवर्ती.

दक्षिण आफ्रिका : एडन मार्करम (कर्णधार), ओटिनिल बार्टमन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक, टोनी डी झोर्झी, डोनोव्हन फेरेरिया, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना माफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिच नॉर्टजे, ट्रिस्टन स्टब्स.

सामन्याची वेळ : सायं. 7 वा.

Advertisement
Tags :

.