न्यूझीलंडचा इंग्लंडवर मालिकाविजय
सामनावीर टिकनरचे 4 बळी, रवींद्र, मिचेलची अर्धशतके
वृत्तसंस्था/ हॅमिल्टन, न्यूझीलंड
पुनरागमन करणाऱ्या ब्लेअर टिकनरने केलेली भेदक गोलंदाजी आणि इंग्लंडच्या फलंदाजांनी केलेल्या निराजानक प्रदर्शनामुळे यजमान न्यूझीलंडने दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडचा 5 गड्यांनी दणदणीत पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 34 धावांत 4 बळी टिपणाऱ्या टिकनरला सामनावीराचा बहुमान मिळाला. 
न्यूझीलंडने क्षेत्ररक्षण निवडल्यानंतर इंग्लंडचा डाव केवळ 36 षटकांत 175 धावांत आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने 33.1 षटकांत 5 बाद 177 धावा जमवित विजय साकार केला. डॅरील मिचेलने नाबाद 56 तर रचिन रवींद्रने 54 धावा जमविल्या. मिचेल सँटनर 34 धावांवर नाबाद राहिला. डॅरील मिचेलने पहिल्या सामन्यातही नाबाद 78 धावांची खेळी करीत न्यूझीलंडला 4 गड्यांनी विजय मिळवून देताना चमकदार प्रदर्शन केले होते. त्या सामन्यात इंग्लंडने 223 धावा जमिवल्या होत्या.
जोफ्रा आर्चरचे पुनरागमन हे इंग्लंडसाठी एकमेव जमेची बाजू ठरली. त्याने 10 षटकांत 23 धावांत 3 बळी मिळविले. पाच षटकांच्या पहिल्या स्पेलमध्ये त्याने 8 धावा देत 1 बळी मिळविला होता. त्याने पहिल्याच षटकात विल यंगला शून्यावर पायचीत केले. इंग्लंडच्या डावात जेमी ओव्हर्टनने सर्वाधिक 42 धावा केल्या. तर कर्णधार हॅरी ब्रुकने 34, जो रूटने 25, बेथेलने 18, सॅम करनने 17 धावा केल्या. सलामीवीर जेमी स्मिथही 13 धावा काढून बाद झाला. डकेट बाद झाल्यानंतर ठरावीक अंतराने इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले. त्यांचा निम्मा संघ 81 धावांत तंबूत परतला होता आणि 36 व्या षटकांत टिकनरने आदिल रशिदला बाद करून त्यांचा डाव संपवला. नाथन स्मिथने 2, डफी, फोक्स, सँटनर, ब्रेसवेल यांनी एकेक बळी मिळविला.
रवींद्र व विल्यम्सन यांनी 10 षटकांत न्यूझीलंडला 32 धावांपर्यंत मजल मारून दिली., रवींद्रने नंतर मिचेलच्या साथीने संघाला विजयसमीप आणले. रवींद्र 54 धावांवर बाद झाल्यावर लॅथम व ब्रेसवेल झटपट बाद झाले. पण सँटनर व मिचेल यांनी फटकेबाजी करीत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. सँटनरने 17 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार ठोकत नाबाद 34 तर मिचेलने 50 चेंडूत नाबाद 56 धावा जमविताना 6 चौकार, 2 षटकार मारले. आर्चरने 3, ओव्हर्टन व रशिद यांनी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 36 षटकांत सर्व बाद 175 (ओव्हर्टन 42, ब्रुक 34, रूट 25, टिकनर 4-34, नाथन स्मिथ 2-27). न्यूझीलंड 33.1 षटकांत 5 बाद 177 (रचिन रवींद्र 58 चेंडूत 54, मिचेल 59 चेंडूत नाबाद 56, सँटनर 17 चेंडूत नाबाद 34, आर्चर 3-23, ओव्हर्टन व आदिल रशिद एकेक बळी).