बांगलादेशचा 100 धावांनी पराभव, सामनावीर हॅलिडे, डिव्हाईन यांची अर्धशतके, ताहुहू, केर यांचे प्रत्येकी 3 बळी,
वृत्तसंस्था / गुवाहाटी
‘सामनावीर’ ब्रुक हॅलिडे आणि कर्णधार सोफी डिव्हाईन यांच्या समयोचित अर्धशतकांच्या जोरावर शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या विजयाचे खाते उघडताना बांगलादेशचा 100 धावांनी पराभव केला. या विजयामुळे न्यूझीलंडचे स्पर्धेतील आव्हान जिवंत राहिले आहे. या स्पर्धेमध्ये न्यूझीलंड संघाला पहिल्या दोन सामन्यात सलग पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांना शुक्रवारच्या सामन्यात विजयाची नितांत गरज होती. दोन सामन्यातील पराभवानंतर न्यूझीलंडने बांगलादेशवर मात करत गुणतक्त्यात आपले खाते उघडले. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 227 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशचा डाव 39.5 षटकात 127 धावांत आटोपला.
न्यूझीलंडच्या डावामध्ये कर्णधार सोफी डिव्हाईनने 85 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 63 तर हॅलिडेने 104 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 69 धावा जमविल्या. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 112 धावांची शतकी भागिदारी केली. सलामीच्या बेट्सने 33 चेंडूत 6 चौकारांसह 29 धावा जमविल्या. अॅमेलिया केर केवळ एका धावेवर बाद झाली. मॅडी ग्रीनने 3 चौकारांसह 25, इसाबेला गेझने 1 चौकारासह 12 तर ताहुहूने 1 षटकार आणि 1 चौकारासह 4 चेंडूत नाबाद 12 धावा जमविल्या. डिव्हाईनने 82 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह इतर हॅलिडेने 80 चेंडूत 4 चौकारांसह अर्धशतक झळकविले. बांगलादेशतर्फे रबीया खानने 30 धावांत 3 तर मारुफा अख्तर, नाहीदा अख्तर, निशीता अख्तर, फईमा खातून यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या केवळ 3 फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. तर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी 21 वाईड चेंडू टाकल्याने बांगलादेशला 30 अवांतर धावा मिळाल्या. बांगलादेशच्या पहिल्या पाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यांचा निम्मा संघ 30 धावांत तंबूत परतला होता. फईमा खातून आणि नाहीदा अख्तर यांनी सातव्या गड्यासाठी 33 धावांची भागिदारी केली. नाहीदा अख्तर बाद झाल्यानंतर फईमा खातूनने रबीया खानसमवेत सातव्या गड्यासाठी 44 धावांची भर घातली. फईमा खातूनने 80 चेंडूत 2 चौकारांसह 34, रबीया खानने 2 चौकारांसह 25 तर नाहीदा अख्तरने 3 चौकारांसह 17 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे जेस केर, ताहुहू यांनी प्रत्येकी 3, मेअरने 20 धावांत 2, अॅमेलिया केर आणि कार्सनने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलकन्यूझीलंड 50 षटकात 9 बाद 227 (हॅलिडे 69, डिव्हाईन 63, बेट्स 29, ग्रीन 25, गेझ 12, ताहुहू नाबाद 12, रबीया खान 3-30), बांगलादेश 39.5 षटकात सर्वबाद 127 (फईमा खातून 34, रबीया खान 25, नाहीदा अख्तर 17, अवांतर 30, जेस केर व ताहुहू प्रत्येकी 3 बळी, मेअर 2-20, अॅमेलिया केर व कार्सन प्रत्येकी 1 बळी)