धावांच्या पावसात न्यूझीलंडचा विजय
पहिल्या टी 20 सामन्यात पाकिस्तान 46 धावांनी पराभूत : टीम साऊदीचेही 25 धावांत 4 बळी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटीत सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानचा संघ पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. शुक्रवारी झालेल्या पहिल्याच टी-20 सामन्यात न्यूझीलंडने पाकला 46 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना यजमान किवी संघाने 20 षटकांत 8 बाद 226 धावा केल्या. यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना पाकचा डाव 180 धावांवर सर्वबाद झाला. या विजयासह न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरा सामना दि. 14 रोजी हॅमिल्टन येथे होईल.
प्रारंभी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान किवी संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर कॉनवेला भोपळाही फोडता आला नाही. शाहिन आफ्रिदीने त्याला पहिल्याच षटकांत तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर फिन अॅलन व कर्णधार केन विल्यम्सन यांनी संघाचा डाव सावरला. डावातील तिसऱ्याच षटकात अॅलनने आफ्रिदीला 2 षटकार व 3 चौकार लगावत 24 धावा वसूल केल्या. आक्रमक खेळणारा अॅलन 34 धावा काढून बाद झाला.
विल्यम्सन, मिचेलची शानदार अर्धशतके
सलामीचे दोघे फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार विल्यम्सन व डॅरील मिचेल यांनी तिसऱ्या विकेटसाटी 78 धावांची भागीदारी साकारली. या जोडीने पाक गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना चौफेर फटकेबाजी केली. विल्यम्सनने 42 चेंडूत 9 चौकारासह 57 धावा केल्या. तर मिचेलने अवघ्या 27 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारासह 61 धावांचे योगदान दिले. अर्धशतक झाल्यानंतर विल्यम्सन बाद झाला. यानंतर मिचेलने मार्क चॅपमन (26) व ग्लेन फिलिप्स (19) व अॅडम मिल्ने (10) यांना सोबत घेत संघाला दोनशेचा टप्पा गाठून दिला. टीम साऊदी 6 धावांवर नाबाद राहिला. मिचेलच्या या आक्रमक खेळीमुळे किवीज संघाने 20 षटकांत 8 बाद 226 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदी व अब्बास आफ्रिदीने प्रत्येकी तीन गडी बाद केले.
आझमच्या अर्धशतकानंतरही पाक पराभूत
226 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर सइम अयुबने पाकिस्तानला वादळी सुरुवात करून दिली होती. त्याने केवळ 8 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 27 धावा ठोकल्या. दुसरा सलामीवीर मोहम्मद रिझवानने 14 चेंडूत 25 धावा केल्या. अयुब 27 धावांवर रनआऊट झाला तर रिझवानचा अडथळा साऊदीने दूर केला. पण यानंतर पाकिस्तानने सातत्याने विकेट गमावल्या. एकीकडे आझमने 35 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 57 धावांची खेळी खेळली, मात्र तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. फखर झमान 15, इफ्तिखार अहमद 24, आझम खान 10 धावा करून बाद झाले. शाहीन आफ्रिदी एकही धाव करू शकला नाही. तळातील फलंदाजांमध्ये अमीर जमाल 14 धावांवर नाबाद राहिला. तळाच्या फलंदाजांनी हजेरी लावण्याचे काम केल्याने पाकचा डाव 18 षटकांत 180 धावांवर आटोपला. न्यूझीलंडकडून साऊदीने सर्वाधिक 25 धावांत 4 बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 20 षटकांत 8 बाद 226 (फिन अॅलन 34, केन विल्यम्सन 57, मिचेल 61, चॅपमन 26, शाहिन आफ्रिदी व अब्बास आफ्रिदी प्रत्येकी तीन बळी).
पाकिस्तान 18 षटकांत सर्वबाद 180 (अयुब 27, रिझवान 25, बाबर आझम 57, इफ्तिकार अहमद 24, साऊदी 4 तर मिल्ने व सीयर्स प्रत्येकी दोन बळी).
नवख्या फिन अॅलनने शाहिन आफ्रिदीला धुतले
शाहीन शाह आफ्रिदीचा कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना होता. या सामन्यात शाहीनने 3 विकेट घेतल्या, पण त्याची चांगलीच धुलाई झाली. त्याने 4 षटकात तब्बल 46 धावा दिल्या. न्यूझीलंडचा सलामीवीर फिन अॅलनने शाहीनच्या एका षटकात 24 धावा फटकावल्या. डावाच्या तिसऱ्या आणि शाहीनच्या दुसऱ्या षटकात अॅलनने 3 चौकार आणि 2 षटकार ठोकले. आफ्रिदीच्या कारकिर्दीतील हे सर्वात महागडे षटक ठरले.
साऊदीचा अनोखा विक्रम, टी-20 मध्ये 150 बळींचा टप्पा पार
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने टी-20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचताना या फॉरमॅटमध्ये त्याने 150 विकेटचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याने ही कामगिरी केली. साऊदीने 25 धावांत 4 बळी घेत न्यूझीलंडच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये साऊदीचे 118 सामन्यात 151 बळी झाले आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानी बांगलादेशचा शकीब हसन असून त्याने 117 सामन्यात 140 बळी तर अफगाणचा रशीद खान 82 सामन्यात 130 बळी मिळवत तिसऱ्या स्थानावर आहे.