महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तीन दशकानंतर न्यूझीलंडचा भारतात विजय

06:57 AM Oct 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

36 वर्षांनी जिंकला पहिला कसोटी सामना : टीम इंडियावर 8 गडी राखून मात 

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह किवीज संघाने तब्बल 36 वर्षानंतर भारतात कसोटीमध्ये विजय संपादन केला आहे. यापूर्वी 1988 साली मुंबईत न्यूझीलंडने भारतावर विजय मिळवला होता. त्यामुळे हा विजय किवीज संघासाठी खास ठरला आहे. बेंगळूर कसोटी जिंकत न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता, उभय संघातील दुसरी कसोटी दि. 24 ऑक्टोबरपासून पुणे येथे खेळवली जाईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला आला, पण 46 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात रचिन रविंद्रचे शतक व कॉनवेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात 402 धावा केल्या व भारतावर 356 धावांची आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना टीम इंडियाने दमदार पुनरागमन केले. सरफराज खानचे दीडशतक व रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंतच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने एकूण 462 धावा केल्या. त्यामुळे भारताला न्यूझीलंडविरुद्ध केवळ 106 धावांची आघाडी घेता आली. विजयासाठीचे लक्ष्य न्यूझीलंडने 8 विकेट्स आणि 27.4 षटकांत पूर्ण करत ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली.

विल यंग-रविंद्रची धमाकेदार खेळी

टीम इंडियाच्या 107 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात किवी कर्णधार टॉम लॅथमने आपली विकेट गमावली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर लॅथम एलबीडब्ल्यू आऊट झाला. लॅथमने डीआरएस घेतला, पण तो वाया गेला. किवी कर्णधाराला आपले खातेही उघडता आले नाही. यानंतर बुमराहने दुसरा सलामीवीर डेव्हन कॉनवेलाही एलबीडब्ल्यू आऊट केले. कॉनवेने 3 चौकारांसह 17 धावा केल्या. कॉनवे बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या 2 बाद 35 अशी होती. येथून रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी आणखी धक्का बसू दिला नाही. रचिन रवींद्र 39 आणि विल यंग 48 धावांवर नाबाद राहिले. रवींद्रने आपल्या खेळीत 6 चौकार मारले. तर यंगने 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. भारताकडून जसप्रीत बुमराहने दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

भारत प.डाव 46 व दुसरा डाव 462

न्यूझीलंड प.डाव 402 व दुसरा डाव 27. 4 षटकांत 2 बाद 110 (टॉम लॅथम 0, कॉनवे 17, विल यंग नाबाद 48, रचिन रविंद्र नाबाद 39, बुमराह दोन बळी).

न्यूझीलंडने 36 वर्षांचा संपवला दुष्काळ

न्यूझीलंडने 36 वर्षांनंतर भारतीय भूमीवर कसोटी विजय मिळवला आहे. यापूर्वी नोव्हेंबर 1988 मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 136 धावांनी पराभूत केले होते. एकूणच, न्यूझीलंडचा हा भारतीय भूमीवरील तिसरा कसोटी विजय ठरला. न्यूझीलंडने भारतात पहिला कसोटी विजय 1969 साली नागपुरात मिळवला होता. विशेष म्हणजे, न्यूझीलंडला भारतीय भूमीवर आतापर्यंत एकही द्विपक्षीय कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.

न्यूझीलंडने भारतात मिळवलेले कसोटी विजय

1969 - नागपूर कसोटीत 167 धावांनी पराभव

1988 - मुंबई कसोटीत 136 धावांनी पराभव

2024 - बेंगळूर कसोटीत 8 गडी राखून पराभव

गुणतालिकेत भारतीय संघ टॉपला, पण विजयाची टक्केवारी घसरली

बेंगळूर कसोटीत भारताला आठ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत भारत अव्वल स्थानावर आहे, पण या पराभवाचा भारताला मोठा फटका बसला असून विजयाच्या टक्केवारीत घसरण झाली आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ 74.24 च्या विजयाच्या टक्केवारीसह अव्वल स्थानावर होता. मात्र या पराभवानंतर  विजयाची टक्केवारी 68.05 झाली आहे. टीम इंडियाने आतापर्यंत एकूण 12 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 8 जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारताविरुद्ध विजयानंतर न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानावर आला आहे. तर इंग्लंडची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर असून श्रीलंका तिसऱ्या स्थानी आहे.

फायनल गाठण्यासाठी पाच कसोटी जिंकाव्या लागणार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या सत्रात टीम इंडियाचे आता 7 सामने बाकी आहेत. यातील दोन सामने न्यूझीलंडविरुद्ध तर पाच सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे आहेत. अशा स्थितीत टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठायची असेल तर किमान 5 सामने जिंकावे लागतील. याशिवाय 4 सामने जिंकल्यास, भारताला इतर कोणत्या तरी संघाच्या विजयावर किंवा पराभवावर अवलंबून राहावे लागेल. याचाच अर्थ टीम इंडियासाठी आता फायनलपर्यंतचा मार्ग कठीण झाला आहे.

 

पहिल्या डावात आम्ही चांगली फलंदाजी केली नाही, त्यामुळे असा निकाल कुठेतरी अपेक्षित होता. पण आम्ही दुसऱ्या डावात ज्याप्रकारे फलंदाजी केली आणि सामन्यात पुनरागमन केले त्याबद्दल मी संघाचे आभार मानू इच्छितो. 350 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर या स्थितीत असणे खूप सकारात्मक होते. मालिकेत आता दोन कसोटी बाकी आहेत, यात आम्ही जोरदार पुनरागमन करु.

भारतीय कर्णधार रोहित शर्मा

 

आम्ही नाणेफेक गमावली हे चांगले झाले. आम्ही बराच वेळ योग्य ठिकाणी चेंडू टाकले, ज्याचा फायदा मिळाला. भारत दुसऱ्या डावात पुनरागमन करेल हे माहीत होतं. परंतु गोलंदाजांनी दुसऱ्या नव्या चेंडूवर चांगली गोलंदाजी केली, ज्यामुळे सामना आमच्या पारड्यात झुकला. याशिवाय, रचिन रविंद्रची कामगिरी मोलाची ठरली.

टॉम लॅथम, न्यूझीलंडचा कर्णधार

वॉशिंग्टन सुंदरचा भारतीय संघात समावेश

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्सनी पराभव झाला. यानंतर आता पहिल्या सामन्यातील पराभवानंतर बीसीसीआयने मोठा निर्णय घेत संघात बदल केला आहे. बीसीसीआयने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. स्टार अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचा दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. पुणे येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी तो संघात सामील होईल. दरम्यान, मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघाने आपली फिरकी गोलंदाजी बाजू अधिक मजबूत केली आहे. मालिकेतील दुसरा सामना पुण्यात तर तिसरा सामना मुंबईत होणार आहे. रिपोर्ट्सनुसार पुण्यातील सामना काळ्या मातीत खेळवला जाईल असे मानले जात आहे. जिथे फिरकी गोलंदाजांचे अधिक वर्चस्व अपेक्षित असते.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media#sports
Next Article