न्यूझीलंडकडून वनडे मालिकेत विंडीजचा व्हाईटवॉश
कायली जेमिसन ‘मालिकावीर’, मॅट हेन्री ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / हॅमिल्टन (न्यूझीलंड)
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान न्यूझीलंडने विंडीजचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. शनिवारी या मालिकेतील झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने विंडीजचा 4 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात 43 धावांत 4 गडी बाद करणाऱ्या मॅट हेन्रीला सामनावीर तर या मालिकेत 7 गडी बाद करणाऱ्या कायली जेमिसनला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.
शनिवारच्या दिवसरात्रीच्या शेवटच्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण न्यूझीलंडच्या शिस्तबद्ध आणि अचूक माऱ्यासमोर विंडीजचा डाव 36.2 षटकात 161 धावांत आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने 30.3 षटकात 6 बाद 162 धावा जमवित हा सामना 4 गड्यांनी जिंकला.
विंडीजच्या डावामध्ये रॉस्टन चेसने 51 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 38, सलामीच्या कॅम्पबेलने 24 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 26, ऑगेस्टीने 2 षटकार आणि 1 चौकारांसह 17, कर्णधार हॉपने 3 चौकारांसह 16, रुदरफोर्डने 3 चौकारांसह 19, स्प्रिंगरने 1 षटकारासह 12, दहाव्या क्रमांकावर फलंदाजी असलेल्या पियेरीने 34 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 22 धावा केल्या. विंडीजच्या डावात एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. त्यांच्या डावात 7 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे हेन्रीने 4 तर डफी आणि सँटेनर यांनी प्रत्येकी 2, जेमिसन आणि फोकेस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. विंडीजने पहिल्या 10 षटकात 60 धावा जमविताना 3 गडी गमविले. त्यांनी दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यानच्या 30 षटकांत 101 धावांत 7 गडी गमविले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना कॉन्वे आणि रचिन रविंद्र या जोडीला अधिक धावा जमविता आल्या नाहीत. डावातील सहाव्या षटकात विंडीजच्या सेल्सने सलामीच्या कॉन्वेला झेलबाद केले. त्याने 17 चेंडूत 2 चौकारांसह 11 धावा केल्या. त्यानंतर विंडीजच्या फोर्डने रचिन रविंद्रचा त्रिफळा उडविला. त्याने 3 चौकारांसह 14 धावा जमविल्या. फोर्डने न्यूझीलंडला आणखी एक धक्का देताना यंगला 3 धावांवर बाद केले. तर चेसने लॅथमला फोर्डकरवी झेलबाद केले. न्यूझीलंडची यावेळी स्थिती 4 बाद 70 अशी होती. लॅथमने 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. मार्क चॅपमन आणि ब्रसेव्हेल या जोडीने पाचव्या गड्यासाठी 75 धावांची भागिदारी केली. चॅपमनने 63 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 64 धावा झळकविल्या. चॅपमनने आपले अर्धशतक 58 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. सेल्सने त्याला झेलबाद केले. स्प्रिंगरने कर्णधार सँटेनरला 9 धावांवर बाद केले. ब्रेसवेल आणि फोकेस यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण करत आपल्या संघाला ही मालिका एकतर्फी जिंकून दिली. ब्रेसवेलने 31 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 40 तर फोकेसने नाबाद 2 धावा केल्या. न्यूझीलंडच्या डावात 2 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे फोर्ड आणि सेल्स यांनी प्रत्येकी 2 तर स्प्रिंगर आणि चेस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंडने पहिल्या 10 षटकात 32 धावा जमविताना दोन गडी गमविले. दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यानच्या 30 षटकात त्यांनी 130 धावा जमविताना 4 गडी गमविले.
संक्षिप्त धावफलक: विंडीज 36.2 षटकात सर्वबाद 161 (चेस 38, कॅम्पबेल 26, पियेरी नाबाद 22, रुदरफोर्ड 19, ऑगेस्टी 17, हॉफ 16, अवांतर 10, हेन्री 4-43, डफी व सँटेनर प्रत्येकी 2 बळी, जेमिसन, फोकेस प्रत्येकी 1 बळी), न्यूझीलंड 30.3 षटकात 6 बाद 162 (चॅपमन 64, ब्रेसवेल नाबाद 40, कॉन्वे 11, रचिन रविंद्र 14, लॅथम 10, सँटेनर 9, अवांतर 9, फोर्ड व सेल्स प्रत्येकी 2 बळी, स्प्रिंगर व चेस प्रत्येकी 1 बळी).