दुसऱ्या वनडेतही न्यूझीलंडकडून पाकिस्तानचा धुव्वा
84 धावांनी दणदणीत विजय : मालिकेत 2-0 ने आघाडी : सामनावीर मिचेल हे ची 99 धावांची खेळी
वृत्तसंस्था/ हॅमिल्टन
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान टी 20 मालिकेत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आणि आता एकदिवसीय मालिकाही त्यांनी गमावली आहे. मिचेल हेच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर किवीज संघाने 50 षटकांत 8 गडी गमावत 292 धावा केल्या. यानंतर बेन सीयर्सच्या घातक गोलंदाजीच्या (59 धावांत 5 बळी) जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानला 208 धावांत गुंडाळले आणि दुसरा वनडे सामना 84 धावांनी जिंकला. यासह, त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. आता, उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना दि. 5 रोजी होईल.
प्रारंभी, पाकने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. किवीज सलामीवीर मॉरियू 18 धावा काढून बाद झाला तर निक केलीला 31 धावा करता आल्या. हेन्री निकोल्सही फारशी प्रभावी कामगिरी करु शकला नाही. 22 धावा काढून तो माघारी परतला. याशिवाय, स्टार फलंदाज डॅरिल मिचेल व कर्णधार ब्रेसवेल स्वस्तात बाद झाले. मिचेलने 18 तर ब्रेसवेलने 17 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडसाठी मिचेल हे याने सर्वाधिक 99 धावांचे योगदान दिले. मिचेल शतक पूर्ण करण्यापासून 1 धाव दूर राहिला. मिचेलने 7 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 99 धावा केल्या. यामुळे किवी संघाला 8 गडी गमावत 292 धावापर्यंत मजल मारता आली.
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 293 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाक खेळाडूंनी सपशेल निराशा केली. पहिल्या 5 फलंदाजांना तर दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यानंतर नसीम शाह आणि फहीम अश्रफ या दोघांनी काही वेळ मैदानात खेळून काढला. त्यामुळे पाकिस्तानच्या चाहत्यांना काही वेळ विजयाची आशा होती. मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी या दोघांना आऊट केले. फहीमने सर्वाधिक 73 धावा केल्या. तर 10 व्या स्थानी बॅटिंगसाठी आलेल्या नसीम शाह याने उल्लेखनीय खेळी केली. नसीमने 44 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. तय्यबने 13 धावांचे योगदान दिले. ही जोडी बाद झाल्यानंतर पाकचा संघ 208 धावांत ऑलआऊट झाला. न्यूझीलंडकडून बेन सीयर्सने 5 व डफीने बळी घेत विजयात मोलाचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 50 षटकांत 8 बाद 292 (निक केली 31, मोहम्मद अब्बास 41, मिचेल हे नाबाद 99, मोहम्मद वासिम व सोफियान प्रत्येकी दोन बळी)
पाकिस्तान 41.2 षटकांत सर्वबाद 208 (फहीम अश्रफ 73, नसीम शाह 51, सुफियान 13, बेन सीयर्स 5 बळी, डफी 3 बळी)