न्यूझीलंडने उडवला लंकेचा धुव्वा
दुसऱ्या वनडेत 113 धावांनी विजय : सामनावीर रचिन रवींद्र, चॅपमन यांची अर्धशतके : किवी संघाची मालिकेत 2-0 ने विजयी
वृत्तसंस्था/ हॅमिल्टन
न्यूझीलंडने सीडन पार्क येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा 113 धावांनी धुव्वा उडवला. उभय संघात पावसाच्या व्यत्ययामुळे 37 ओव्हरचा सामना खेळवण्यात आला. न्यूझीलंडने श्रीलंकेला विजयासाठी 256 धावांचे आव्हान दिले होते, मात्र न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर लंकेचा डाव 142 धावात आटोपला. या विजयासह किवी संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने विजरी आघाडी घेतली आहे. उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना दि. 11 रोजी ऑकलंड येथे खेळवण्यात येईल.
प्रारंभी श्रीलंकेने टॉस जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. प्रथम फलंदाजी करताना किवी संघाची सुरुवात खराब झाली, सलामीवीर विल यंग 16 धावा काढून माघारी परतला. यानंतर रचिन रविंद्र व मार्क चॅपमन या दोघांनी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर किवी संघाला 250 पार मजल मारली. रचिन रविंद्रने 63 चेंडूत 9 चौकार व 1 षटकारासह 79 धावा केल्या तर चॅपमनने 62 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. ही जोडी लागोपाठ बाद झाल्यानंतर अनुभवी फलंदाज टॉम लॅथमही (1) स्वस्तात बाद झाला. यानंतर डॅरेल मिचेलने 38, ग्लेन फिलिप्स 22, मिचेल सँटनरने 20 धावा जोडल्या.
लंकेच्या थिक्षणाची हॅट्ट्रिक
लंकन फिरकीपटू महीश थिक्षणाच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचे तळाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. महीशने 35 व्या ओव्हरमधील शेवटच्या 2 चेंडूत 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर 37 व्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर विकेट घेत हॅट्ट्रिक साजरी केली. महीशने मिचेल सँटनर आणि नॅथन स्मिथ या दोघांना 35 व्या ओव्हरमधील शेवटच्या 2 बॉलवर आऊट केले, त्यानतंर मॅट हेन्रीला 37 व्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर आऊट करत महीशने पहिलीवहिली हॅटट्रिक मिळवली. थिक्षणाने 44 धावांत 4 तर वानिंदु हसरंगा याने दोघांना बाद केले.
लंकन संघ 142 धावांत ऑलआऊट
श्रीलंकेकडून 256 धावांचा पाठलाग करताना फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला, तर इतर फलंदाजांनी किवीज गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. लंकन संघाचा डाव 30.2 षटकांत 142 धावांत आटोपला. श्रीलंकेसाठी कामिंदू मेंडीसने सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. त्याने 5 चौकार आणि 3 षटकारासह 64 धावा फटकावल्या तर जनिथ लियानगेने 22, चामिंदु विक्रमसिंघेने 17 आणि अविष्का फर्नांडोने 10 धावा जोडल्या. न्यूझीलंडसाठी विलियम ओरुकेने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. जेकब डफीने दोघांना बाद केले.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 37 षटकांत 9 बाद 255 (रचिन रविंद्र 79, चॅपमन 62, डॅरिल मिचेल 38, ग्लेन फिलिप्स 22, सँटेनर 20, थिक्षणा 44 धावांत 4 बळी, हसरंगा 2 बळी).
श्रीलंका 30.2 षटकांत सर्वबाद 142 (कमिंदू मेंडिस 64, लियानगे 22, ओरुके 3 तर डफी 2 बळी).
महीश थिक्षणा लंकेचा सातवा हॅट्ट्रिकवीर
महीश श्रीलंकेकडून वनडेत हॅटट्रिक घेणारा लंकेचा एकूण सातवा गोलंदाज ठरला आहे. याआधी लंकेच्या चमिंडा वास, लसिथ मलिंगा, परवेज महारुफ, थिसारा परेरा, वानिंदू हसरंगा व मदुशंका यांनी हॅट्ट्रिक घेतली आहे. तसेच महीश वनडेत न्यूझीलंडविरुद्ध सलग 3 चेंडूत 3 विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज ठरला आहे. महीश न्यूझीलंडविरुद्ध वनडेत 2013 नंतर हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. याआधी बांगलादेशच्या रुबेल हौसेनने 2013 साली न्यूझीलंडविरुद्ध ढाक्यात हॅट्ट्रिक घेण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर लंकेच्या या स्टार फिरकीपटूने अशी कामगिरी केली आहे.