न्यूझीलंडची मालिकेत विजयी आघाडी
टी-20 मध्ये लंकेवर 45 धावांनी मात, मिचेल हे सामनावीर, डफीचे पुन्हा चार बळी
वृत्तसंस्था/ माऊंट माँगनुइ, न्यूझीलंड
न्यूझीलंडने येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात लंकेचा 45 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. नाबाद 41 धावा करणाऱ्या मिचेल हे याला सामनावीराचा बहुमान मिळाला.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने लंकेवर केवळ 8 धावांनी विजय मिळविला होता. येथील सामन्यात प्रथम फलंदाजी मिळाल्यावर न्यूझीलंडने 20 षटकांत 5 बाद 186 धावा फटकावल्या. त्यानंतर लंकेचा डाव 19.1 षटकांत 141 धावांत गुंडाळून यजमानांनी सामन्यासह मालिकाविजय साकार केला. पुन्हा एकदा जेकब डफी लंकेचा कर्दनकाळ ठरला. त्याने 15 धावांत 4 बळी मिळविताना सलामीवीर पथुम निसांकाला 37 धावांवर बाद पेले. नंतर कुसल परेराला 48 धावांवर बाद केले. दोघेही सेट झालेले फलंदाज होते. पण डफीने त्यांचा अडथळा दूर करीत न्यूझीलंडचा मार्ग मोकळा केला. पहिल्या सामन्यात निसांकाने 96 धावा करताना कुसल मेंडिससमवेत 120 धावांची सलामी दिली होती. पण डफीने चार चेंडूत 3 बळी टिपत सामना न्यूझीलंडच्या बाजूने फिरविला होता. या सामन्यातही त्याने चार बळी टिपले.
निसांकाला बाद केल्यानंतर डफीने 16 व्या षटकात एका अप्रतिम यॉर्करवर परेराचा त्रिफळा उडविला. त्याने 35 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार मारले. यावेळी लंकेची स्थिती 4 बाद 127 अशी होती आणि त्यांना विजयाची अजूनही संधी होती. डफीने नंतर 18 व्या षटकात वनिंदू हसरंगा (1), महीश थीक्षाना (0) यांना तीन चेंडूत बाद केल्यानंतर लंकेच्या तळाच्या फलंदाजांना फारसा प्रतिकार करता आला नाही. मॅट हेन्रीने 19 व्या षटकात सलग दोन चेंडूवर 2 बळी टिपले. शेवटच्या षटकात झॅक फोक्सने फर्नांडोला बाद करून 5 चेंडू बाकी ठेवत विजय साजरा केला. सँटनरनेही 2 व ब्रेसवेलने एक बळी मिळविला.
न्यूझीलंडच्या डावात रचिन रवींद्र एक धाव काढून बाद झाल्यानंतर टिम रॉबिन्सन व मार्क चॅपमन यांनी 69 धावांची भागीदारी करून डाव सावरला. रॉबिन्सनने 34 चेंडूत 41, चॅपमनने 29 चेंडूत 42 धावा केल्यानंतर फिलिप्सने 16 चेंडूत 23, डॅरील मिचेलने 18, मिचेल हे याने जोरदार फटकेबाजी करीत 19 चेंडूत नाबाद 41 धावा झोडपल्या. त्यात 4 चौकार, 2 षटकारांचा समावेश होता. नाबाद 5 धावा करणाऱ्या ब्रेसवेलसमवेत त्याने सहाव्या गड्यासाठी 15 चेंडूत 41 धावांची भर घातली. लंकेच्या हसरंगाने 2, नुवान तुषारा व पथिराना यांनी एकेक बळी मिळविले. या मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना 1 जानेवारी रोजी नेल्सन येथे होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 20 षटकांत 5 बाद 186 : रॉबिन्सन 34 चेंडूत 41, चॅपमन 29 चेंडूत 42, फिलिप्स 16 चेंडूत 23, मिचेल 15 चेंडूत 18, मिचेल हे 19 चेंडूत नाबाद 41, अवांतर 15, हसरंगा 2-28, तुषारा 1-25, पथिराना 1-37.
लंका 19.1 षटकांत सर्व बाद 141 : पथुम निसांका 28 चेंडूत 37, कुसल मेंडिस 12 चेंडूत 10, कुसल परेरा 35 चेंडूत 48, चरिथ असालंका 16 चेंडूत 20, अवांतर 10, जेकब डफी 4-15, मॅट हेन्री 2-31, सँटनर 2-22, ब्रेसवेल 1-30.