विंडीजला नमवून न्यूझीलंडची मालिकेत आघाडी
कॉन्वेचे अर्धशतक, सामनावीर ईश सोधी, डफीचे प्रत्येकी 3 बळी
वृत्तसंस्था/ नेल्सन
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडने विंडीजचा रविवारी खेळविण्यात आलेल्या लढतीत 9 धावांनी पराभव करत 2-1 अशी आघाडी मिळविली आहे. सामनावीर इश सोधीला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. त्याने या सामन्यात 34 धावांत 3 गडी बाद केले. या कामगिरीमुळे न्यूझीलंड संघाला मालिकेत आघाडी मिळविता आली. या मालिकेतील गेल्या गुरुवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 20 षटकात 9 बाद 177 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजचा डाव 19.5 षटकात 168 धावांत आटोपल्याने त्याना पराभवाला सामोरे जावे लागले.
न्यूझीलंडच्या डावामध्ये सलामीच्या कॉन्वेने 34 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 56, रॉबिन्सनने 21 चेंडूत 2 चौकारांसह 23, रचिन रवींद्रने 15 चेंडूत 4 चौकारांसह 26, मिचेलने 24 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 41, ब्रेसवेलने 1 चौकारासह 11 धावा जमविल्या. सँटनर 4 धावांवर तर नीशमने 2, जेमिसनने 4, मिचेल हेने 2 धावा जमविल्या. न्यूझीलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 47 धावा जमविताना 1 गडी गमाविला. न्यूझीलंडचे अर्धशतक 39 चेंडूत, शतक 60 चेंडूत, दीडशतक 100 चेंडूत फलकावर लागले. 10 षटकाअखेर न्यूझीलंडची स्थिती 1 बाद 96 अशी बऱ्यापैकी भक्कम होती. न्यूझीलंडच्या डावात 5 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे मॅथ्यू फोर्ड, होल्डर यांनी प्रत्येकी 2 तर शेफर्ड, स्प्रिंगर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावामध्ये सलामीच्या अॅथनेझने 23 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 31, ऑगस्टीने 16 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 24, शेफर्डने 34 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 50 धावा केल्या. विंडीजच्या डावात 8 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे डफीने 3 बळी, सोधीने 34 धावांत 3, सँटेनर 21 धावांत 1, ब्रेसवेलनेही 1 गडी बाद केला. विंडीजने 10 षटकाअखेर 6 बाद 75 धावा जमविल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक - न्यूझीलंड 20 षटकात 9 बाद 177 (कॉन्वे 56, रॉबिन्सन 26, मिचेल 41, ब्रेसवेल 11, अवांतर 5, होल्डर 2-31, फोर्ड 2-20, शेफर्ड, स्प्रिंगर प्रत्येकी 1 बळी), विंडीज 19.5 षटकात सर्वबाद 168 (अॅथनेझ 31, ऑगस्टी 24, शेफर्ड 49, स्प्रिंगर 39, डफी व सोधी प्रत्येकी 3 बळी, सँटनर, जेमिसन, ब्रेसवेल प्रत्येकी 1 बळी).