न्यूझीलंडची वनडे मालिकेत विजयी आघाडी
दुसऱ्या सामन्यात विंडीजचा पाच गड्यांनी पराभव : कॉन्वे, रचिन रवींद्र यांची अर्धशतके, शाय होप सामनावीर
वृत्तसंस्था/नेपियर
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान न्यूझीलंडने विंडीजवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने विंडीजचा 3 चेंडू बाकी ठेऊन 5 गड्यांनी पराभव केला. नाबाद शतक झळकाविणारा विंडीजचा कर्णधार शाय होप सामनावीर ठरला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. पावसामुळे अडथळा आल्याने पंचांनी हा सामना प्रत्येकी 34 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला. विंडीजने 34 षटकात 9 बाद 247 धावा जमवित न्यूझीलंडला विजयासाठी 248 धावांचे आव्हान दिले. न्यूझीलंडने 33.3 षटकात 5 बाद 248 धावा जमवित हा सामना 5 गड्यांनी जिंकला. विंडीजच्या डावामध्ये कर्णधार होपचे शतक वगळता इतर फलंदाजांकडून साफ निराशा झाली.
सलामीच्या ऑगेस्टीने 31 चेंडूत 3 चौकारांसह 22, ग्रीव्सने 27 चेंडूत 1 षटकारासह 22, शेफर्डने 14 चेंडूत 3 षटकारांसह 22, फोर्डने 11 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 21 धावा जमविल्या. सलामीचा कॅम्पबेल 3 धावांवर तर कार्टी 7 धावांवर तसेच चेस 2 धावांवर बाद झाले. शाय होपने शेवटर्यंत खेळपट्टीवर राहून 69 चेंडूत 4 षटकार आणि 13 चौकारांसह नाबाद 109 धवा झळकाविल्याने विंडीजला 247 धावांपर्यत मजला मारता आली. विंडीजला 18 अवांतर धावा मिळाल्या. विंडीजच्या डावात 11 षटकार आणि 21 चौकार नोंदवे गेले. न्यूझीलंडतर्फे नाथन स्मिथ सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 42 धावांत 4, जेमिसनने 44 धावांत 3 तर टिकनर आणि सँटनर यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला. विंडीजने 7 षटकांच्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये 20 धावा जमविताना एक गडी गमाविला. त्यानंतर 20 षटकांच्या दुसऱ्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी 149 धावा जमविताना 5 गडी गमाविले.
शाय होपचा अनोखा विक्रम
विंडीजचा कर्णधार शाय होपने क्रिकेट क्षेत्रामध्ये कसोटी दर्जा प्राप्त झालेल्या सर्व म्हणजे 12 देशांविरुद्ध क्रिकेटच्या विविध प्रकारात शतके नोंदविणाचा आगळा विक्रम केला आहे. न्यूझीलंडविरुद्ध येथे सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शाय होपने नाबाद शतक (109) नोंदवले. होपने या सामन्यात 69 चेंडूत 4 षटकार आणि 13 चौकारांसह नाबाद 109 धावा झळकाविल्या. या सामन्यात पावसाचा अडथळा आल्याने सदर सामना प्रत्येकी 34 षटकांचा खेळविण्याचा निर्णय पंचांनी घेतला होता. भारताचा माजी कसोटीवीर आणि माजी प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविडने यापूर्वी असा विक्रम करताना आयसीसीच्या सर्व म्हणजे 10 कसोटी दर्जा मिळालेल्या संघाविरुद्ध शतके नोंदविलेली होती. द्रविडने हा पराक्रम ज्यावेळी केला त्यावेळी आयसीसीकडून 10 देशांना कसोटी दर्जा मिळाला होता.
2017 साली राहुल द्रविड क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्यानंतर अफगाण आणि आयर्लंड या दोन देशांना आयसीसीकडून कसोटी दर्जा मिळाला होता. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या कसोटी कारकिर्दीत कसोटी दर्जा मिळालेल्या 9 देशांविरुद्ध शतके नोंदविण्याचा पराक्रम केला होता. न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत खेळताना होपचे हे दुसरे शतक आहे. शाय होपने अनेक नवे विक्रम नोंदविले असून त्याने माजी कर्णधार ब्रायन लाराच्या विक्रमाशी बरोबरी साधताना विंडीजतर्फे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके नोंदविणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. होपने 6 हजार धावांचा टप्पा गाठणारा तो विंडीजचा दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी माजी कर्णधार व्हिवियन रिचर्ड्सने 1989 साली 141 डावात 6 हजार धावांचा टप्पा गाठला होता. शाय होपने 147 वनडे सामन्यातील 142 डावात 50.80 धावांच्या सरासरीने 19 शतके आणि 30 अर्धशतकांसह 6097 धावा जमविल्या असून त्याने ब्रायन लाराच्या वनडे क्रिकेटमधील 19 शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. विंडीजतर्फे माजी फलंदाज ख्रिस गेलने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक म्हणजे 25 शतके नोंदविली आहेत.
संक्षिप्त धावफलक
विंडीज 34 षटकात 9 बाद 247 (होप नाबाद 109, ऑगस्टी 22, ग्रीव्स 22, शेफर्ड 22, फोर्ड 21, अवांतर 18, स्मिथ 4-42, जेमिसन 3-44, टिकनर व सँटनर प्रत्येकी 1 बळी), न्यूझीलंड 33.3 षटकात 5 बाद 248 (कॉन्वे 90, रचिन रवींद्र 56, यंग 11, लॅथम नाबाद 39, ब्रेसवेल 11, सँटनर नाबाद 34, अवांतर 7, फोर्ड, सील्स, ग्रीव्स, चेस, स्प्रिंगर प्रत्येकी 1 बळी).