For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टी 20 वर्ल्डकपसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर

06:24 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
टी 20 वर्ल्डकपसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर
Advertisement

केन विल्यम्सन कॅप्टन : वर्ल्डकपसाठी संघ जाहीर करणारा पहिला देश 

Advertisement

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन

वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या संघाच्या कॅप्टनपदाची जबाबदारी केन विल्यम्सनवर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संघ जाहीर करताना न्यूझीलंडने अनोखी पद्धत वापरली. न्यूझीलंडचा वर्ल्डकपसाठीचा संघ मटिल्डा आणि एंगस या दोन मुलांनी जाहीर केला. याचा व्हिडिओ न्यूझीलंड बोर्डाने सोशल मीडियावर शेअर केला. याआधी वनडे वर्ल्डकपच्या वेळी त्यांनी क्रिकेटपटूंच्या पत्नी, मुले आणि गर्लफ्रेंडसह संघाची घोषणा केली होती. याशिवाय, टी 20 वर्ल्डकपसाठी संघ जाहीर करणारा न्यूझीलंड हा पहिला देश ठरला आहे.

Advertisement

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सोमवारी 15 सदस्यीय संघाची घोषणा करताना अनुभवी केन विल्यम्सन, वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट व टीम साऊदी यांच्यावर विश्वास दाखवला आहे. विल्यम्सनचा हा सहावा, बोल्टचा पाचवा तर साऊदीचा सातवा वर्ल्डकप असणार आहे. न्यूझीलंडच्या संघातील बेन सीअर्स आणि रचिन रवींद्र असे दोन खेळाडू आहेत, ज्यांचा हा पहिला वर्ल्ड कप असेल. लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेन्री हे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहेत. याशिवाय, किवीज बोर्डाने संघात अनेक अष्टपैलू खेळाडूंचाही समावेश केला आहे. मायक्डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र आणि मिचेल सँटनर हे गोलंदाजीसोबत फलंदाजीही करु शकतात.

गेल्या काही काळात चांगल्या कामगिरीनंतरही टिम सिफर्ट, टॉम लॅथम आणि विल यंग यांना संधी देण्यात आलेली नाही. याशिवाय काएले जेमिन्सन आणि अॅडम मिल्ने दुखापतीमुळे टी 20 वर्ल्ड संघातून बाहेर आहेत. अनुभवी कॉलिन मुनरोही न्यूझीलंडच्या संघात आपली जागा बनवण्यात अपयशी ठरला आहे. दरम्यान, टी 20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या 15 खेळाडूंच्या संघावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन आणि मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी आनंद व्यक्त केला आहे. अर्थात, न्यूझीलंडला आतापर्यंत एकदाही टी 20 वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. यामुळे यंदाच्या सत्रात केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील किवीज संघ वर्ल्डकप जिंकतो का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वर्ल्डकपमध्ये क गटात असलेल्या किवीज संघाची सलामीची लढत 7 जून रोजी अफगाणविरुद्ध होणार आहे.

वर्ल्डकपसाठी न्यूझीलंडचा टी 20 संघ - केन विल्यम्सन (कर्णधार), फिन अॅलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी.

Advertisement

.