कोलकाता नाईट रायडर्स फायनलमध्ये
हैदराबादचा 8 गडी राखून पराभव : सामनावीर मिचेल स्टार्कचे 3 बळी : श्रेयस-वेंकटेश अय्यरची नाबाद अर्धशतके
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या क्वॉलिफायर सामन्यात केकेआरने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. हैदराबादने दिलेले 160 धावांचे माफक आव्हान केकेआरने आठ विकेट आणि 38 चेंडू राखून सहज पार केले. वेंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर यांनी नाबाद अर्धशतके झळकावत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. हैदराबादचा संघ आता 24 मे रोजी क्वालिफायर 2 सामना खेळणार आहे. राजस्थान आणि आरसीबी यांच्यातील विजेत्या संघासोबत हैदराबादचा सामना होईल.
हैदराबादने दिलेल्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरने वादळी सुरुवात केली. सुनील नारायण आणि गुरबाज यांनी 20 चेंडूमध्ये 44 धावांची भागिदारी केली. गुरबाजने 14 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये गुरबाजने दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले. टी नटराजनने गुरबाजला तंबूत धाडले. यानंतर कमिन्सने सुनिल नरेनला 21 धावांवर बाद केले.
वेंकटेश-श्रेयस अय्यरची शानदार अर्धशतके
सलामी फलंदाज माघारी गेल्यानंतर वेंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर यांनी शानदार फलंदाजी केली. त्यांना हैदराबादच्या फिल्डर्सनी साथ दिली. अय्यरचे दोन झेल सोडले. श्रेयस अय्यरने अवघ्या 24 चेंडूत नाबाद 58 धावांची खेळी केली. अय्यरने आपल्या वादळी खेळीमध्ये चार षटकार आणि पाच चौकार ठोकले. वेंकटेश अय्यरनेही 28 चेंडूमध्ये 51 धावांची खेळी केली. या दोघांनी चौफेर फटकेबाजी करत संघाला 13.4 षटकांतच विजय मिळवून दिला. या विजयासह त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला असून दि. 26 मे रोजी चेन्नईमध्ये ते चषकासाठी मैदानात उतरतील.
प्रारंभी, हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण केकेआरच्या गोलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. पॉवरप्लेमध्येच अवघ्या 39 धावांतच हैदराबादने आपले आघाडीचे चार फलंदाज गमावले होते. मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात धोकादायक ट्रेविस हेडला तंबूत पाठवले. हेडचा स्टार्कने अप्रतिम चेंडूवर त्रिफाळा उडवला. हेड बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माही फार काळ टिकू शकला नाही. अभिषेक फक्त तीन धावा काढून तंबूत परतला. नितीश रे•ाrही 10 चेंडूत 9 धावा काढून बाद झाला. यामध्ये एका चौकाराचा समावेश होता. रे•ाr आणि शाहबाज अहमद यांना स्टार्क याने एकापाठोपाठ एक तंबूत धाडले. शाहबाज अहमदला खातेही उघडता आले नाही.
राहुल त्रिपाठीची एकाकी झुंज
4 बाद 39 या बिकट स्थितीत राहुल त्रिपाठी व हेन्रिक क्लासेन यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी 60 धावांची भागीदारी साकारताना चौफेर फटकेबाजी केली. राहुल त्रिपाठीने 35 चेंडूत 7 चौकार व 1 षटकारासह 55 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असतानाच क्लासेनला वरुण चक्रवर्तीने बाद करत केकेआरला मोठे यश मिळवून दिले. क्लासेनने 21 चेंडूत 3 चौकार व 1 षटकारासह 32 धावा केल्या. क्लासेन बाद झाल्यानंतर थोड्या फरकानेच त्रिपाठी 14 व्या षटकांत धावबाद झाला. अब्दुल समद लयीत होता. त्याने दोन षटकार ठोकत प्रभावित केले. पण गरज नसताना मोठा फटका मारला अन् बाद झाला. समदने 12 चेंडूमध्ये 16 धावांची खेळी केली. समद बाद झाल्यानंतर सनवीर सिंहला भोपळाही फोडता आला नाही. भुवनेश्वर कुमारही फारकाळ मैदानावर टिकू शकला नाही. अखेरीस कर्णधार पॅट कमिन्सने फिनिशिंग टच दिला. त्याने 24 चेंडूत 30 धावांची शानदार खेळी केली. कमिन्स बाद झाल्यानंतर हैदराबादचा डाव 19.3 षटकांत 159 धावांवर संपुष्टात आला. केकेआरकडून मिचेल स्टार्कने 3 तर वरुण चक्रवर्तीने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
सनरायजर्स हैदराबाद 19.3 षटकांत सर्वबाद 159 (ट्रेव्हिस हेड 0, अभिषेक शर्मा 3, राहुल त्रिपाठी 35 चेंडूत 55, नितिश रे•ाr 9, हेनरिक क्लासेन 21 चेंडूत 32, अब्दुल समाद 16, पॅट कमिन्स 24 चेंडूत 30, मिचेल स्टार्क 34 धावांत 3 बळी, वरुण चक्रवर्ती 2 बळी).
केकेआर 13.4 षटकांत 2 बाद 164 (रेहमानउल्लाह गुरबाज 23, सुनील नरेन 21, वेंकटेश अय्यर 28 चेंडूत 5 चौकार व 4 षटकारासह नाबाद 51, श्रेयस अय्यर 24 चेंडूत 5 चौकार व 4 षटकारासह नाबाद 58, पॅट कमिन्स व नटराजन प्रत्येकी एक बळी).