विल्यम्सनच्या अर्धशतकानंतरही न्यूझीलंडची घसरगुंडी
इंग्लंडच्या पहिल्या डावात 499 धावा : दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा डाव गडगडला
वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
न्यूझीलंडविरुद्धच्या ख्राईस्टचर्च कसोटीत इंग्लंडची वाटचाल दमदार विजयाच्या दिशेने सुरु आहे. इंग्लिश संघ पहिल्या डावात 499 धावांत सर्वबाद झाला होता, तर न्यूझीलंडने 348 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात खेळताना यजमान न्यूझीलंडची खराब स्थिती असून तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्यांनी 49 षटकांत 6 गडी गमावत 155 धावा केल्या होत्या. किवी संघाकडे केवळ 4 धावांची आघाडी असून कसोटी वाचवण्यासाठी आता उर्वरित फलंदाजावर त्यांची मदार असेल. दिवसअखेरीस डॅरिल मिचेल 31 तर नॅथन स्मिथ 1 धावांवर खेळत आहेत. विशेष म्हणजे, दुखापतीतून सावरत कमबॅक करणाऱ्या केन विल्यम्सनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 9 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
प्रारंभी, इंग्लंडने दिवसाची सुरुवात 5 बाद 319 धावसंख्येवरुन पुढे केली. शतकवीर हॅरी ब्रुक व कर्णधार बेन स्टोक्स या दोघांनी सहाव्या गड्यासाठी 159 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. ब्रुकने दीडशतक साजरे करताना 197 चेंडूत 15 चौकार व 3 षटकारासह 171 धावा फटकावल्या. मॅट हेन्रीने त्याला बाद करत ही जोडी फोडली. बाद होण्यापूर्वी या दोघांनी एकेरी दुहेरी धावांवर भर देत संघाला पावणेचारशेचा टप्पा गाठून दिला. ब्रुक बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या ख्रिस वोक्सला साऊदीने बाद करत न्यूझीलंडला आठवा धक्का दिला.
स्टोक्सची अर्धशतकी खेळी
हॅरी ब्रुक, ख्रिस वोक्स बाद झाल्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स व ऍटकिन्सन या दोघांनी 63 धावांची भागीदारी केली. स्टोक्सने अर्धशतकी खेळी साकारताना 9 चौकारासह 80 धावांचे योगदान दिले. ऍटकिन्सनेही 36 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारासह 48 धावा फटकावल्या. याशिवाय, तळाचा फलंदाज ब्रेडॉन कारसेने नाबाद 33 धावांचे योगदान दिले. स्टोक्स बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव 103 षटकांत 499 धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 4 तर नॅथन स्मिथने 3 गडी बाद केले.
केन विल्यम्सनचे अर्धशतक तरीही न्यूझीलंडचा डाव गडगडला
इंग्लंडने पहिल्या डावात 499 धावा करत यजमान न्यूझीलंडवर 151 धावांची आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात खेळताना किवी संघाची खराब सुरुवात झाली. सलामीवीर टॉम लॅथम डावातील तिसऱ्याच षटकांत तंबूत परतला तर डेव्हॉन कॉनवेलाही विशेष काही करता आले नाही. 8 धावा काढून तो माघारी गेला. यानंतर केन विल्यम्सन व रचिन रविंद्र यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी छोटेखानी 41 धावांची भागीदारी साकारली. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असताना रविंद्रला कारसेने बाद केले. यानंतर आलेल्या टॉम ब्लंडेलला भोपळाही फोडता आला नाही. ग्लेन फिलिप्सही 19 धावांवर आऊट झाला. दुसरीकडे, विल्यम्सनने मात्र संयमी खेळी करताना 7 चौकारासह 61 धावांचे योगदान दिले. पण, दिवसअखेरीस तो ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर डॅरिल मिचेल व नॅथन स्मिथ यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने 6 गडी गमावत 155 धावा केल्या होत्या. किवी संघाकडे केवळ 4 धावांची आघाडी आहे. चौथ्या दिवसाचा पहिल्या सत्रात यजमान संघाचे फलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. इंग्लंडकडून कारसे व ख्रिस वोक्स यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव 348 व दुसरा डाव 49 षटकांत 6 बाद 155 (केन विल्यम्सन 61, रविंद्र 24, मिचेल खेळत आहे 31, फिलिप्स 19, स्मिथ खेळत आहे 1, ख्रिस वोक्स व ब्रेडॉन कारसे प्रत्येकी तीन बळी).
इंग्लंड पहिला डाव सर्वबाद 499.
विल्यम्सनचा आणखी एक कारनामा, कसोटीत 9000 धावा
पहिल्या डावात 93 धावांची शानदार खेळी करणारया केन विल्यम्सनने न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात आपली 26 वी धावा पूर्ण करताच कसोटीत 9000 धावा पूर्ण केल्या. यासह विल्यम्सन 9000 कसोटी धावा करणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला. याआधी एकाही किवी फलंदाजाला हा आकडा स्पर्श करता आला नव्हता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 9 हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा केन हा जगातील 19वा फलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या 103 व्या कसोटीत हा ऐतिहासिक टप्पा गाठला. विशेष म्हणजे, विल्यम्सनने 182 व्या डावात 9000 धावा पूर्ण केल्या. अशाप्रकारे तो कसोटीत जलद 9000 धावा पूर्ण करणारा पाचवा फलंदाज ठरला. केनच्या आधी स्टीव्ह स्मिथ, ब्रायन लारा, कुमार संगकारा आणि युनूस खान यांनी जलद 9000 धावा पूर्ण करण्याचा मोठा पराक्रम केला होता.