अजब कारणासाठी चर्चेत न्युझीलंडची संसद
भूत, आत्मा आणि भीतीदायक सावल्यांबद्दल कुणी बोलले तर त्याला सर्वसाधारणपणे अंधश्रद्धाळूच ठरविले जतते. परंतु एका देशाची संसद भूतांशी निगडित कहाण्यांवर आधारित टूर करविते. न्युझीलंडच्या संसदेत हा विचित्र प्रकार घडत असतो. न्युझीलंडची संसद स्वत:च्या भीतीदायक कहाण्यांसाठी सध्या चर्चेत आहे. दर आठवड्याला वेलिंग्टन येथील संसद भवनात ‘घोस्ट टूर’ आयोजित केली जाते. जेथे गाइड व्हिक्टोरियन युगातील वेशभूषेत, चेहऱ्यावर खोटे रक्कम लावून लोकांना संसदेशी संबंधित भूताच्या कहाण्या ऐकवत असतात. प्रत्येक कहाणीमागे काही ना काही कारण असते.
न्युझीलंडच्या संसदेत एक वाचनालय असून त्याविषयी एक कहाणी आहे. या वाचनालयाला दोनवेळा आग लागली, पूर आला आणि रानमांजरांनी येथे हल्ला केला होता. हे सर्व प्रकार भूताच्या छायेमुळे घडल्याची अफवा पसरली. यामुळे सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचारी येथे रात्री जाण्यास नकार देतात.
तर एक कहाणी खासदार विलियम लार्नक यांची आहे. 1898 मध्ये आर्थिक संकट आणि कौटुंबिक त्रासांपोटी लार्नक यांनी संसदेच्या एका कक्षात स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. लार्नक यांचा आत्मा आजही संसदेत भटकत असतो असा दावा अनेक जण करतात. काही काळानंतर त्यांच्या थडग्यातून त्यांची कवटी चोरण्यात आली होती आणि 1972 मध्ये ती एका कॉलेज विद्यार्थ्याच्या खोलीत आढळून आल्याने हे रहस्य आणखीच गडद झाले. कधीकधी दरवाजे आपोआप बंद होतात, जणू एखादी अदृश्य शक्ती तेथे असावी असा भास होत असल्याचे संसदेचे कर्मचारी सांगतात.
संसदेचे पहिले ग्रंथपाल ईवेन मॅककॉल यांची कहाणी देखील प्रसिद्ध आहे. अत्याधिक कामाच्या ताणामुळे त्यांचा मृत्यू झाला होता असे सांगण्यात येते. त्यांचा आत्मा आजही संसदेच्या वाचनालायत भटकत असतो असे काही जणांचे मानणे आहे. रात्री काम करणारे कर्मचारी आणि सुरक्षाकर्मचारी कधीकधी वाचनालायत अनोळखी स्वरुपाचा आवाज ऐकू येतो, पुस्तके आपोआप खाली पडतात आणि अचानक थंड हवेचा झोत जाणवत असल्याचा दावा करतात.
पुस्तकांच्या ढिगातून हात बाहेर पडतो, आरशात एक भूतवजा महिला दिसते आणि बंद दरवाजे आपोआप उघडतात अशा अनेक कहाण्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. न्युझीलंडच्या संसदेची गोथिक शैलीतील वाचनालयाची इमारत 1899 मध्ये थॉमस टर्नबुलकडून डिझाइन करण्यात आली होती. ही इमारत रहस्यमय वातावरण निर्माण करणारी आहे. येथे दोनवेळा आग, एक पूर आणि अनेक अजब घटनांचा इतिहास याला आणखी रहस्यमय स्वरुप प्राप्त करून देतो.