न्यूझीलंडला आज पाकवर विजय आवश्यक
वृत्तसंस्था/ कोलंबो
आधीच शर्यतीतून बाहेर पडलेला पाकिस्तान आज शनिवारी येथे होणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात न्यूझीलंडच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशांवर जोरदार खेळ करून पाणी फेरू शकतो.
इंग्लंडविऊद्धचा त्यांचा मागील सामना पावसामुळे वाया गेल्याने पाकिस्तानला गमावलेल्या संधींबद्दल चरफडत राहावे लागले. या आशियाई संघाने पावसामुळे कमी झालेल्या 31 षटकांच्या सामन्यात इंग्लंडला 9 बाद 133 धावांवर रोखले होते आणि 113 धावांच्या सुधारित लक्ष्याचा पाठलाग करताना 6.4 षटकांत बिनबाद 34 अशी धावसंख्या उभारली होती, परंतु त्यानंतर पाऊस पुन्हा सुरू झाला. पावसामुळे पाकिस्तानला संभाव्य विजय मिळू शकला नाही आणि चार सामन्यांत तीन पराभव आणि एका सामन्याचा निकाल न लागल्याने ते गुणतालिकेत तळाशी राहिले.
2000 मध्ये विजेता ठरलेला न्यूझीलंड तितक्याच सामन्यांत तीन गुणांसह अव्वल चार संघांच्या बाहेर आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविऊद्ध सलग दोन पराभव स्वीकारल्यानंतर त्यांनी बांगलादेशवर महत्त्वपूर्ण विजय मिळवून पुनरागमन केले. तथापि, श्रीलंकेविऊद्धच्या रद्द झालेल्या सामन्यात पावसामुळे त्यांची प्रगती पुन्हा थांबली. 23 आणि 26 ऑक्टोबर रोजी भारत आणि इंग्लंडविऊद्धच्या कठीण सामन्यांना तोंड द्यावे लागणार असल्याने न्यूझीलंड त्यांच्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने आज शनिवारी पूर्ण सामना खेळण्यास उत्सुक असेल.
पाकिस्तानने त्यांच्या गोलंदाजी विभागात आशा दाखवली आहे. कर्णधार फातिमा सानाने इंग्लंडविऊद्ध माऱ्याचे नेतृत्व चांगल्या प्रकारे केले. डावखुरी फिरकी गोलंदाज सादिया इक्बालनेही दोन बळी घेऊन पावसाने व्यत्यय आणण्यापूर्वी तिच्या संघाला नियंत्रण मिळवून दिले. किवीजसाठी कर्णधार सोफी डेव्हाईन फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करत आहे. तिने तीन डावांमध्ये 86.66 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. ब्रुक हॅलिडेच्या धाडसी खेळीसह तिच्या संयमी खेळीमुळे न्यूझीलंडला बांगलादेशविऊद्ध पुन्हा गाडी ऊळावर आणण्यास मदत झाली. तथापि, वरच्या फळीतील सातत्याचा अभाव हा अजूनही चिंतेचा विषय आहे. अनुभवी सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर आणि अमेलिया केर यांना चांगल्या सुऊवातीचे रूपांतर मोठ्या डावात करण्यास संघर्ष करावा लागला आहे. यामुळे डेव्हाईनवर डावाची उभारणी करण्याच्या बाबतीत अतिरिक्त दबाव पडू लागला आहे.
न्यूझीलंडची गोलंदाजी स्थिर राहिली आहे. डेव्हाईन (3/54) आणि ब्री इलिंग (2/39) यांनी त्यांच्या शेवटच्या सामन्यात प्रभावी कामगिरी केली. परंतु हवामानाच्या व्यत्ययामुळे दोन्ही संघांच्या फलंदाजांना मैदानावर जास्त वेळ घालवता आलेला नाही आणि परिस्थिती अनुकूल राहिल्यास ते त्याचा फायदा घेण्यास उत्सुक असतील. पाऊस हा एक प्रमुख घटक आहे, हलक्या सरी पुन्हा एकदा खेळात व्यत्यय आणतील असा अंदाज आहे. पावसाने हजेरी लावून खेळ बिघडविल्यास न्यूझीलंडच्या मोहिमेला मोठा धक्का बसेल, तर पाकिस्तान वरच्या स्थानावर स्वार होऊन क्रमवारीत बदल घडविण्याचा प्रयत्न करेल.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.