न्यूझीलंडची वनडे मालिकेत विजयी सलामी
विंडीजचा 7 धावांनी पराभव : डॅरियल मिचेल ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
सामनावीर डॅरियल मिचेलच्या शानदार शतकाच्या जोरावर रविवारी येथे यजमान न्यूझीलंडने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत विजयी सलामी देताना विंडीजचा केवळ 7 धावांनी पराभव केला. ख्राईस्टचर्चच्या खेळपट्टीवर फलंदाजांना धावा घेणे खूपच अवघड गेले. या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 50 षटकात 7 बाद 269 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 50 षटकात 6 बाद 262 धावांपर्यत मजल मारल्याने त्यांना हा सामना थोडक्यात गमवावा लागला.
न्यूझीलंडच्या डावामध्ये डॅरियल मिचेलने 118 चेंडूत 2 षटकार आणि 12 चौकारांसह 119 धावा झळकाविल्या. सलामीच्या कॉन्वेने 58 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 49, ब्रेसवेलने 52 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 35, फोकेसने 16 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 22 तर लॅथमने 30 चेंडूत 2 चौकारांसह 18 आणि कर्णधार सँटेनरने 11 धावा जमविल्या. रचिन रविंद्र केवळ 4 धावावर बाद झाला तर यंगला खातेही उघडता आले नाही. न्यूझीलंडने डावातील 7 व्या षटकात आपला पहिला गडी गमाविला. फोर्डने रचिन रविंद्रला हॉपकरवी झेलबाद केले. त्यानंतर फोर्डने आपल्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवर यंगला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. शाय हॉपने हे दोन्ही झेल टिपले. कॉन्वे व मिचेल यांनी तिसऱ्या गड्यासाठी 65 धावांची भागिदारी केली. ग्रीव्हेसने कॉन्वेला बाद केले. मिचेलने 61 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या 10 षटकात न्यूझीलंडने 39 धावा जमविताना 2 गडी गमाविले तर दुसऱ्या पॉवरप्लेमध्ये 30 षटकात न्यूझीलंडने 146 धावा जमविल्या आणि 2 फलंदाज गमाविले. शेवटच्या 10 षटकांमध्ये न्यूझीलंडने 84 धावा जमविल्या. मिचेलने 107 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह शतक पूर्ण केले. विंडिजचा यष्टीरक्षण शाय हॉपने न्यूझीलंडच्या डावात यष्टीमागे 4 झेल टिपले. न्यूझीलंडच्या डावामध्ये 4 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे सेल्सने 41 धावांत 3 तर फोर्डने 55 धावांत 2 आणि ग्रिव्हेस आणि चेस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. तिसऱ्या षटकात जेमीसनने सलामीच्या कॅम्पबेलला केवळ 4 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर अथांझे व कार्टी या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 18 षटकात 60 धावांची भागिदारी केली. अथांझेने 58 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 29 धावा जमविल्या. कार्टीने 67 चेंडूत 2 चौकारांसह 32 धावा केल्या. कर्णधार शाय हॉपने 45 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 37 धावा झळकाविल्या. रुदरफोर्डने 61 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 55 तर चेसने 1 षटकारासह 16 धावा केल्या. 39.2 षटकात विंडीजने 5 बाद 169 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यांना शेवटच्या 10 षटकात विजयासाठी 100 धावांची गरज होती. रुदरफोर्ड आणि ग्रीव्हेस यांनी 6 व्या गड्यासाठी 40 धावांची भर घातली. रुदरफोर्ड 46 व्या षटकात बाद झाला. ग्रीव्हेस आणि शेफर्ड या जोडीने सातव्या गड्यासाठी 53 धावांची भागिदारी केली. पण त्यांना विजयासाठी 8 धावा कमी पडल्या. विंडीजने 50 षटकात 6 बाद 262 धावांपर्यंत मजल मारली. ग्रीव्हेसने 24 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 38 तर शेफर्डने 19 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 26 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 25 अवांतर धावा मिळाल्या. न्यूझीलंडतर्फे जेमीसनने 52 धावांत 3 तर हेन्री, फोकेस व सँटेनर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. विंडीजने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 32 धावा जमविताना 1 गडी गमाविला. तर दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यानच्या 30 षटकात त्यांनी 140 धावा जमविताना 4 गडी गमाविले. विंडिजला शेवटच्या 10 षटकात 90 धावा जमविता आल्या. विंडिजच्या डावामध्ये 8 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक न्यूझीलंड 50 षटकात 7 बाद 269 (मिचेल 119, कॉन्वे 49, ब्रेसवेल 35, फोकेस नाबाद 22, लॅथम 18, सँटेनर 11, अवांतर 10, सेल्स 3-41, फोर्ड 2-55, ग्रीव्हेस व चेस प्रत्येकी 1 बळी), विंडीज 50 षटकात 6 बाद 262 (रुदरफोर्ड 55, ग्रीव्हेस नाबाद 38, शेफर्ड नाबाद 26, हॉप 37, कार्टी 32, अथांझे 29, अवांतर 25, जेमीसन 3-52, हेन्री, फोकेस व सँटेनर प्रत्येकी 1 बळी).