न्यूझीलंडची इंग्लंडवर 340 धावांची आघाडी
हेन्रीचे 4, ओरुरके, सॅन्टनरचे प्रत्येकी 3 बळी, यंग-विल्यम्सनची अर्धशतके
वृत्तसंस्था/ हॅमिल्टन
येथे सुरू असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत रविवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर यजमान न्यूझीलंडने आपली स्थिती अधिक मजबूत करताना इंग्लंडवर 340 धावांची भक्कम आघाडी मिळविली. न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने दिवसअखेर दुसऱ्या डावात 3 बाद 136 धावा जमविल्या.
या कसोटीत न्यूझीलंडने पहिल्या डावात 347 धावा केल्या. न्यूझीलंडने 9 बाद 315 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा शेवटचा गडी 32 धावांची भर घालत तंबूत परतला. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात कर्णधार लॅथम, सॅन्टनर यांनी दमदार अर्धशतके झळकविली. इंग्लंडतर्फे पॉट्सने 90 धावांत 4 तर अॅटकिन्सनने 66 धावांत 3 तसेच कार्सेने 78 धावांत 2 आणि स्टोक्सने 91 धावांत 1 गडी बाद केला. ओरुरके आणि साऊदी या शेवटच्या जोडीने 44 ध्ाावांची भागिदारी केली. या शेवटच्या जोडीने 77 मिनिटे फलंदाजी केली. सॅन्टनरने आपले चौथे अर्धशतक झळकविले.
न्यूझीलंडच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडची फलंदाजी कोलमडली. त्यांचा पहिला डाव 35.4 षटकात 143 धावांत आटोपला. चहापानावेळीच त्यांचा डाव संपुष्टात आला. इंग्लंडच्या पहिल्या डावात एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. कर्णधार स्टोक्सने 5 चौकारांसह 27, पोपने 5 चौकारांसह 24, रुटने 6 चौकारांसह 32, क्रॉलेने 5 चौकारांसह 21, डकेटने 1 चौकारांसह 11 आणि बेथेलने 2 चौकारांसह 12 धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्रीने 48 धावांत 4, ओरुरकेने 33 धावांत 3 आणि सॅन्टनरने 7 धावांत 3 गडी बाद केले.
न्यूझीलंडने इंग्लंडवर पहिल्या डावात 204 धावांची भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावाला चहापानानंतर सुरुवात केली. यंग आणि विलीयम्सन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 89 धावांची भागिदारी केली. यंगने 85 चेंडूत 9 चौकारांसह 60 तर विलियम्सन 58 चेंडूत 8 चौकारांसह 50 धावांवर खेळत आहे. कर्णधार लॅथम 3 चौकारांसह 19 धावांवर बाद झाला. ओरुरकेला खाते उघडता आले नाही. दिवसअखेर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 32 षटकात 3 बाद 136 धावा जमवित इंग्लंडवर 340 धावांची आघाडी मिळविली आहे. इंग्लंडतर्फे स्टोक्सने 2 तर अॅटकिन्सनने 1 गडी बाद केला. तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत इंग्लंडने 2-0 अशी आघाडी न्यूझीलंडवर यापूर्वीच मिळविली आहे. इंग्लंडने या मालिकेतील पहिली कसोटी 8 गड्यांनी जिंकली. त्यानंतर दुसरी कसोटी त्यांनी 323 धावांनी जिंकून मालिका सीलबंद केली आहे. न्यूझीलंडच्या साऊदीची ही शेवटची कसोटी असून त्यानंतर तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. साऊदीची ही 107 वी कसोटी आहे.
संक्षिप्त धावफलक: न्यूझीलंड प. डाव 97.1 षटकात सर्वबाद 347 (लॅथम 63, यंग 42, विलीयम्सन 44, ब्लंडेल 21, सॅन्टनर 76, साऊदी 23, अवांतर 28, अॅटकिन्सन 3-66, पॉट्स 4-90, कार्से 2-78, स्टोक्स 1-91), इंग्लंड प. डाव 35.4 षटकात सर्वबाद 143 (पोप 24, स्टोक्स 27, रुट 32, क्रॉले 21, बेथेल 12, डकेट 11, हेन्री 4-48, ओरुरके 3-33, सॅन्टनर 3-7), न्यूझीलंड दु. डाव 32 षटकात 3 बाद 136 (लॅथम 19, यंग 60, विलीयमसन खेळत आहे 50, ओरुरके 0, रचिन रविंद्र खेळत आहे, स्टोक्स 2-45, अॅटकिनसन 1-10)