पहिल्या कसोटीत न्यूझीलंड पराभवाच्या छायेत
बांगलादेशकडून विजयासाठी 332 धावांचे लक्ष्य : किवीज फलंदाजांकडून निराशा
वृत्तसंस्था/ सिल्हेट, बांगलादेश
येथे सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत पाहुणा न्यूझीलंड संघ दारुण पराभवाच्या छायेत आहे. चौथ्या दिवशी बांगलादेशचा दुसरा डाव 338 धावांत आटोपल्यानंतर न्यूझीलंडच्या विजयासाठी 332 धावांचे टार्गेट मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना दिवसअखेरीस किवीज संघाची 49 षटकांत 7 बाद 113 अशी स्थिती झाली आहे. त्यांना विजयासाठी 219 धावांची गरज असून त्यांचे तीन गडी खेळायचे बाकी आहेत. खेळपट्टीचा रंग पाहता यजमान बांगलादेश पहिल्या सत्रातच विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
तत्पूर्वी, यजमान बांगलादेशने 3 बाद 212 धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. अवघ्या दोन धावांची भर घातल्यानंतर शतकवीर नजमुल हुसेन 105 धावांवर बाद झाला. मुश्फिकुर रहीमने 7 चौकारासह 67 धावांचे योगदान दिले तर मेहिदी हसन मिराजने 5 चौकारासह 50 धावा केल्या. हे दोघे वगळता इतर बांगलादेशच्या फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांचा दुसरा डाव 100.4 षटकांत 338 धावांवर आटोपला व किवीज संघाला विजयासाठी 332 धावांचे लक्ष्य मिळाले. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने सर्वाधिक चार गडी बाद केले. तर इश सोधीने 2, टीम साऊदी, फिलिप्सने 1 गडी बाद केला.
विजयासाठीच्या 332 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवीज संघाची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर टॉम लॅथम पहिल्याच षटकांत शून्यावर बाद झाला. यानंतर डेव्हॉन कॉनवे, केन विल्यम्सन, हेन्री निकोल्स यांना प्रभावी कामगिरी करता आली नाही. कॉनवे 22 तर विल्यम्सन 11 धावा काढून बाद झाला. टॉम ब्लंडेल 6 तर ग्लेन फिलिप्स 12 धावा काढून तंबूत परतले. डॅरील मिचेलने मात्र 5 चौकारासह नाबाद 44 धावांची खेळी साकारत संघाचे शतक फलकावर लावले. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने 49 षटकांत 7 गडी गमावत 113 धावा केल्या होत्या. मिचेल 44 तर इश सोधी 7 धावांवर खेळत होते. विजयासाठी त्यांना अद्याप 219 धावांची गरज असून न्यूझीलंडची सारी मदार डॅरील मिचेलवर असणार आहे.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश प.डाव 310 व दुसरा डाव 100.4 षटकांत सर्वबाद 338 (नजमुल हुसेन 105, मुश्फिकुर रहीम 67, मेहिदी हसन मिराज 50, एजाज पटेल 40 धावांत 4 बळी). न्यूझीलंड प.डाव 317 व दु.डाव 49 षटकांत 7 बाद 113 (कॉनवे 22, केन विल्यम्सन 11, मिचेल खेळत आहे 44, इश सोधी खेळत आहे 7, तैजुल इस्लाम 40 धावांत 4 बळी).