तिंरगी मालिकेत न्यूझीलंडचे वर्चस्व
अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 गडी राखून मात : सामनावीर ओरुकेचे 4 बळी तर पाकचा सलमान आगा मालिकावीर
वृत्तसंस्था/ कराची
शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करत जेतेपद पटकावले. किवी संघाने 28 चेंडू शिल्लक असताना हा सामना जिंकला. या विजयामुळे 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंड संघाचे मनोबल निश्चितच वाढले आहे. डॅरिल मिशेल आणि टॉम लॅथम या दोघांनीही अर्धशतके झळकावून न्यूझीलंडला अंतिम सामना जिंकण्यास मदत केली. संपूर्ण मालिकेत एकही सामना न गमावता न्यूझीलंडने ट्रॉफीवर कब्जा केला आहे. विल्यम ओरुकेला सामनावीर तर पाकिस्तानच्या सलमान आगाला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
कराचीच्या राष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 242 धावा केल्या. कर्णधार मोहम्मद रिझवान व्यतिरिक्त सलमान आगाने पुन्हा एकदा पाकिस्तान संघाची लाज राखण्याचा प्रयत्न केला. रिझवान आणि सलमान यांनी अनुक्रमे 46 आणि 45 धावा केल्या. तैय्यब ताहिरनेही 38 धावांचे योगदान देत पाकिस्तानला 242 धावांपर्यंत पोहोचवले. फहीम अश्रफने 22 धावांचे योगदान दिले तर स्टार फलंदाज बाबर आझमला केवळ 29 धावा करता आल्या. पाकच्या इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे त्यांचा डाव 49.3 षटकांत 242 धावांत आटोपला. न्यूझीलंडकडून ओरुकेने 4 तर मिचेल सँटेनर व ब्रेसवेल यांनी प्रत्येकी दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.
अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे वर्चस्व
पाकिस्तानच्या 243 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर विल यंग केवळ 3 धावा करून बाद झाला. त्यानंतर, डेव्हॉन कॉनवे आणि केन विल्यम्सन यांनी 71 धावांची महत्त्वाची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. यानंतर विल्यमसन 34 धावांवर बाद झाला, तर कॉनवेही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना 48 धावांवर बाद झाला. यानंतर डॅरिल मिशेल व टॉम लॅथम यांनी संघाची धुरा सांभाळली. या दोघांनीही 87 धावांची संयमी भागीदारी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मिशेलने 6 चौकारासह 57 धावा फटकावल्या तर टॉम लॅथमने 56 धावांचे योगदान दिले. हे दोघे बाद झाल्यानंतर विजयाची औपचारिकता ग्लेन फिलिप्सने पूर्ण केले. त्यांना नाबाद 20 धावा करत संघाला 46 व्या षटकांतच विजय मिळवून दिला. पाककडून नसीम शाहने सर्वाधिक 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान 49.3 षटकांत सर्वबाद 242 (बाबर आझम 29, मोहम्मद रिझवान 46, सलमान आगा 45, ताहिर 38, फहीम अश्रफ 22, ओरुके 43 धावांत 4 बळी, ब्रेसवेल व सँटेनर प्रत्येकी 2 बळी)
न्यूझीलंड 45.2 षटकांत 5 बाद 243 (डेव्हॉन कॉनवे 48, केन विल्यम्सन 34, डॅरिल मिचेल 57, टॉम लॅथम 56, ग्लेन फिलिप्स नाबाद 20, नसीम शाह 2 बळी).
19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला प्रारंभ
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला येत्या बुधवारपासून सुरुवात होत आहे. पाकिस्तान व दुबई येथे या स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान, या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व अफगाणिस्तान या आठ देशांचा समावेश आहे. 19 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्यात सलामीचा सामना खेळवला जाणार आहे. यानंतर 20 रोजी भारत व बांगलादेश यांच्यात दुसरा सामना दुबई येथे खेळवला जाईल.