न्यूझीलंडचा पाकला दणका : 5 गडी राखून विजय
सामनावीर टीम सेफर्टची 45 धावांची खेळी : किवीजची मालिकेत 2-0 ने आघाडी
वृत्तसंस्था/ ड्युनेडिन
पावसाचा व्यत्यय आलेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 15 षटकांत 9 गडी गमावत 135 धावा केल्या. यानंतर यजमान किवी संघाने विजयासाठीचे लक्ष्य 13.1 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यातच पार केले. या विजयासह किवी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. 22 चेंडूत 45 धावांची खेळी करणाऱ्या न्यूझीलंडच्या टीम सेफर्टला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता, उभय संघातील तिसरा सामना दि. 20 मार्च रोजी होईल.
दुसरा टी 20 सामना पावसामुळे उशिरा सुरू करण्यात आला. सामन्यातील षटके कमी केल्यानंतर हा सामना 15 षटकांचा करण्यात आला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 15 षटकांत 9 गडी गमावून 135 धावांपर्यंत मजल मारली. पाकच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर हसन नवाजला भोपळाही फोडता आला नाही तर मोहम्मद हॅरिस 11 धावा काढून बाद झाला. कर्णधार सलमान आगाने सर्वाधिक 28 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारासह 46 धावांचे योगदान दिले. तर शादाब खानने 26, शाहिन आफ्रिदीने 22 धावा केल्या. इतर पाकच्या फलंदाजांनी निराशा केल्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. न्यूझीलंडकडून जेकब डफी, ईश सोधी, जेम्स नीशम व बेन सीअर्स यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
न्यूझीलंडचा अवघ्या 79 चेंडूत विजय
पाकिस्तानने दिलेल्या 136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतानान्यूझीलंडने केवळ 13 षटकांमध्ये 137 धावा करत 5 विकेट राखून विजय मिळवला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना चौफेर फटकेबाजी केली. टीम सेफर्टने पाकिस्तानची स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीला चांगलेच जेरीस आणले. त्याने आफ्रिदीला एकाच षटकात 4 षटकार ठोकले लगावले. टीम सेफर्टने केवळ 22 चेंडूत 45 धावा चोपल्या. त्याच्याशिवाय फिन ऍलनने देखील 16 चेंडूंत 38 धावांची तडाखेबंद खेळी साकारली. हे दोघे बाद झाल्यानंतर डॅरिल मिचेलने 14 धावांची छोटेखानी खेळी साकारली. तर मिचेल हेने नाबाद 21 धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ब्रेसवेल 5 धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानकडून हॅरिस रौफने 2 तर मोहम्मद अली, जहनाद खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान 15 षटकांत 9 बाद 135 (मोहम्मद हॅरिस 11, सलमान आगा 46, शादाब खान 26, शाहिन आफ्रिदी नाबाद 22, जेकब डफी, ईश सोधी, नीशम व सीअर्सन प्रत्येकी दोन बळी)
न्यूझीलंड 13.1 षटकांत 5 बाद 137 (टीम सेफर्ट 45, फिन अॅलन 38, डॅरिल मिचेल 14, मिचेल हे नाबाद 21, ब्रेसवेल नाबाद 5, हॅरिस रौफ 2 बळी, मोहम्मद अली, खुशदिल शाह व जहनाद खान प्रत्येकी एक बळी).
शाहिन आफ्रिदीला धुतले
न्यूझीलंडच्या विजयात ओपनर बॅट्समन टीम सेफर्टने महत्त्वाची भूमिका वठवली आहे. त्याने केवळ 22 चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारांची आतषबाजी करत 45 धावा केल्या. याशिवाय सेफर्टने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या एकाच षटकात 4 षटकार मारून त्याची हवाच काढून टाकली. शाहीनच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टीम सेफर्टने लांब षटकार लगावला. यानंतर टीमने दुसऱ्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने षटकार मारला. पण, तिसरा चेंडू डॉट गेला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर टिमने बॅकवर्ड पॉइंटकडे दोन धावा काढल्या. त्यानंतर टीमने ओव्हरच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार ठोकून आफ्रिदीची हवाच टाईट केली. यानंतर सोशल मीडियावर आफ्रिदीची खिल्ली उडवताना दिसत आहेत.
किवीज फिरकीपटू ईश सोधीचा असाही विक्रम
न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज ईश सोधीने पाकविरुद्ध दोन बळी मिळवत एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. या दोन बळीसह तो न्यूझीलंडकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत 10 व्या स्थानावर आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 264 विकेट त्याने घेतल्या आहेत.