न्यूझीलंडचा झिम्बाब्वेवर 9 गड्यांनी विजय
मालिकेत आघाडी, मॅट हेन्री ‘सामनावीर’, सँटनरचे 4 बळी : सामनावीर मॅट हेन्री : सामन्यात 9 बळी
वृत्तसंस्था / बुलावायो
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत येथे शुक्रवारी झालेल्या पहिल्या कसोटीत खेळाच्या तिसऱ्याच दिवशी न्यूझीलंडने यजमान झिम्बाब्वेचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात 9 गडी बाद करणाऱ्या न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या कसोटीत झिम्बाब्वेने पहिल्या डावात 149 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात 307 धावा जमवित झिम्बाब्वेवर 158 धावांची भक्कम आघाडी मिळविली. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात कॉन्वे आणि मिचेल यांनी शानदार अर्धशतके झळकविली. तर झिम्बाब्वेच्या पहिल्या डावात मॅट हेन्रीने 39 धावांत 6 गडी बाद केले.
झिम्बाब्वेने 2 बाद 31 या धावसंख्येवरुन शुक्रवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. पण न्यूझीलंडच्या अचूक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचा दुसरा डाव 67.1 षटकात 165 धावांत आटोपला. झिम्बाब्वेच्या दुसऱ्या डावात सिन विलियम्सने 66 चेंडूत 6 चौकारांसह 49, सिगाने 2 चौकारांसह 27, कर्णधार एर्विनने 3 चौकारांसह 22, सलामीच्या बेनेटने 4 चौकारांसह 18 तसेच करेनने 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात झिम्बाब्वेने आपले आणखी चार गडी 83 धावांमध्ये गमविले. उपाहारावेळी झिम्बाब्वेने 42 षटकात 6 बाद 114 धावांपर्यंत मजल मारली होती.
उपाहारानंतरच्या दुसऱ्या सत्रामध्ये झिम्बाब्वेचे शेवटचे चार फलंदाज 51 धावांची भर घालत तंबूत परतले. 67.1 षटकात झिम्बाब्वेचा दुसरा डाव 165 धावांत आटोपला. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्री आणि ओरुरके यांनी प्रत्येकी 3 तर कर्णधार सँटनरने 27 धावांत 4 गडी बाद केले. या सामन्यामध्ये मॅट हेन्रीने 90 धावांत 9 गडी बाद केल्याने त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. चहापानावेळी झिम्बाब्वेचा दुसरा डाव आटोपला. न्यूझीलंडला विजयासाठी केवळ 8 धावांची जरुरी होती. सलामीचा कॉन्वे 4 धावांवर बाद झाल्यानंतर यंग आणि हेन्री निकोल्स यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. न्यूझीलंडने 2.2 षटकात 1 बाद 8 धावा जमवित हा सामना 9 गड्यांनी जिंकला. जवळपास 9 वर्षानंतर झिम्बाब्वेचा न्यूझीलंडविरुद्धचा हा सर्वात मोठा पराभव आहे. सदर कसोटी मालिका ही आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत नाही. पण 2016 नंतर न्यूझीलंड-झिम्बाब्वे यांच्यात पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळविली जात आहे.
संक्षिप्त धावफलक: झिम्बाब्वे प. डाव 60.3 षटकात सर्वबाद 149, न्यूझीलंड प. डाव 96.1 षटकात सर्वबाद 307, झिम्बाब्वे दु. डाव 67.1 षटकात सर्वबाद 165 (विलियम्स 49, सिगा 27, एर्विन 22, करेन 11, मुझारबनी 19, बेनेट 18, सँटनर 4-27, हेन्री 3-51, ओरुरके 3-28), न्यूझीलंड दु. डाव 2.2 षटकात 1 बाद 8 (कॉन्वे 4, निकोल्स नाबाद 4, यंग नाबाद 0, नॅम्हुरी 1-8)