रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा लंकेवर विजय
दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवत मालिकेत बरोबरी : लॉकी फर्ग्युसनची हॅट्ट्रिक
वृत्तसंस्था/ डांबुला
येथील रंगिरी डांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेवर 5 धावांनी विजय मिळवला. या विजयासह किवी संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघ 108 धावांत ऑलआऊट झाला, यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना लंकन संघ 103 धावांत गारद झाला. लॉकी फर्ग्यूसनने न्यूझीलंडच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. लॉकीने 2 वेगवेगळ्या ओव्हरमध्ये सलग 3 बॉलमध्ये 3 विकेट्स घेतल्या.
पहिला सामना जिंकल्यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करत नुवान तुषाराने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडचा सलामीवीर टिम रॉबिन्सनला यॉर्करने क्लीन बोल्ड केले. मार्क चॉपमन व ग्लेन फिलिप्सही स्वस्तात बाद झाले. मधल्या फळीतील फलंदाजांनीही हजेरी लावल्याने किवी संघाची 10.3 षटकांत 6 बाद 52 अशी स्थिती झाली होती. मात्र, यानंतर मिचेल सँटनर आणि जोश क्लार्कसन यांनी सातव्या विकेटसाठी 32 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केल्यामुळे किवी संघाला शंभरी गाठता आली. हे दोघे बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा डाव 108 धावांत आटोपला. लंकेकडून वनिंदू हसरंगाने 4 तर पथिरानाने 3 गडी बाद केले.
फर्ग्युसनची हॅट्ट्रिक
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 109 धावांचे टार्गेट लंकन संघ सहज पूर्ण करेल असे वाटत होते पण किवीज गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचा डाव 19.5 षटकांत 103 धावांत संपला. लंकेकडून पथुम निसंका व कुशल मेंडिस यांनी डावाची सुरुवात केली. पण, तिसऱ्याच षटकात मेंडिसला सँटेनरने बाद करत लंकेला पहिला धक्का दिला. यानंतर कुशल परेरा व कमिंदू मेंडिसही झटपट बाद झाले. कर्णधार चरिथ असलंकाला भोपळाही फोडता आला नाही. सहाव्या षटकांतील शेवटच्या चेंडूवर फर्ग्युसनने परेराला बाद केले. यानंतर आठव्या षटकांत फर्ग्युसन पुन्हा गोलंदाजीला आला. त्याने या षटकाच्या पहिल्या व दुसऱ्या चेंडूवर कमिंदू मेंडिस व कर्णधार असलंकाला बाद करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. टी 20 क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक करणारा फर्ग्युसन हा पाचवा गोलंदाज ठरला आहे. यानंतर इतर लंकन फलंदाजांनीही निराशा केल्यामुळे त्यांना या सामन्यात 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. लंकेकडून पथुम निसंकाने सर्वाधिक 52 धावा केल्या. न्यूझीलंडकडून फर्ग्युसन व ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 19.3 षटकांत सर्वबाद 108 (विल यंग 30, सँटनर 19, क्लार्कसन 24, हसरंगा 4 तर पथिराना 3 बळी). श्रीलंका 19.5 षटकांत सर्वबाद 103 (निसंका 52, थिक्षणा 14, राजपक्षे 15, फर्ग्युसन व फिलिप्स प्रत्येकी 3 बळी).