न्यूझीलंडचा दक्षिण आफ्रिकेवर विजय
पहिल्या कसोटीत 281 धावांनी मात, जेमीसनचे 4, सँटनरचे 3 बळी, बेडिंगहॅमचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ माउंट मौन्गानुई, न्यूझीलंड
न्यूझीलंडने पहिल्या क्रिकेट कसोटीच्या चौथ्या दिवशी बुधवारी दक्षिण आफ्रिकेच्या कमकुवत संघाचा 281 धावांनी पराभव करून दोन सामन्यांच्या मालिकेत प्रारंभीच आघाडी घेतली. कर्णधार टिम साउदीने मंगळवारच्या 4 बाद 179 धावहसंख्येवरच न्यूझीलंडचा दुसरा डाव घोषित केला. एकूण 528 धावांची आघाडी घेतलेल्या न्यूझीलंडने मग दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात 247 धावांवर सर्व बाद केले.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 511 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या डावात 349 धावांची आघाडी मिळविताना त्यांचा पहिला डाव 162 धावांवर संपुष्टात आणला. तरीही साउदीने फॉलोऑन न देण्याचे ठरविल्यानंतर केन विल्यमसनने डाव घोषित करण्यापूर्वी सामन्यातील त्याचे दुसरे शतक पूर्ण केले. हे त्याच्या कारकिर्दीतील 31 वे शतक आहे.
पहिल्या चार षटकांतच सलामीवीर नील ब्रँड आणि एडवर्ड मूर यांना गमावल्याने बुधवारी सुऊवातीलाच दक्षिण आफ्रिका अडचणीत आली. झुबेर हमझा आणि रेनार्ड व्हॅन टाँडरने 100 मिनिटांपेक्षा जास्त वेळ फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला अधिक नुकसान होऊ न देता उपाहारापर्यंत पोहोचविले खरे. पण दोघेही ब्रेकनंतर बेपर्वाईने फटके मारण्याच्या भरात झटपट बाद झाले.
डेव्हिड बेडिंगहॅमने उपाहारानंतर कीगन पीटरसन (16) याच्यासोबत पाचव्या यष्टीसाठी 105 धावांची भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेच्या आशा काही प्रमाणात पल्लवित केल्या होत्या. बेडिंगहॅमने 96 चेंडूंत कारकिर्दीतील सर्वोत्तम 87 धावांची खेळी केली. या भागीदारीने मधल्या सत्रातील बहुतांश वेळ व्यापला आणि बेडिंगहॅम आणि पीटरसन एकत्र असताना कसोटी सामना पाचव्या दिवसात जाण्याची शक्यता दिसत होती. बेडिंगहॅमला न्यूझीलंडच्या आखडू टप्प्याच्या गोलंदाजीचा फायदा झाला. त्याने 13 चौकार आणि एक षटकार खेचला. पण आखूड टप्प्याचे चेंडू हाणण्याचे त्याने जास्तच प्रयत्न केले आणि त्याभरात चहापानानंतर लगेच तो काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर बाद झाला.
जेमिसनने वरील दोघांचाही अडथळा दूर केल्याने दक्षिण आफ्रिकेची 4 बाद 178 वरून 6 बाद 181 अशी घसरण झाली. बेडिंगहॅमने त्याच्या अपेक्षेपेक्षा लवकर आलेला चेंडू हाणण्याच्या प्रयत्नात शार्ट डीप मिडविकेटवर मिशेल सँटनरला झेल दिला. तर पीटरसनने उसळलेला चेंडू हुक करण्याच्या प्रयत्नात रचिन रवींद्रला फाइन लेगवर झेल दिला. मोठी आघाडी पदरी असल्याने न्यूझीलंडला दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख फलंदाजांना बाद करण्याच्या योजनांवर नीट काम करता आले आणि महागडे ठरले असले, तरी आखूड टप्प्याच्या चेंडूंचा मारा करण्याचे धोरण राबविता आले.
क्लाईड फॉर्च्युइनचे बाद होणे मात्र दुर्दैवी होते. त्याने फिरकीपटू ग्लेन फिलिप्सचा फटकावलेला एक चेंडू शॉर्ट लेगवर वाकलेल्या टॉम लॅथमच्या गुडघ्याला लागून यष्टीरक्षक टॉम ब्लंडेलच्या हातात गेला. तर ड्युअन ऑलिव्हियरचा झेल डॅरिल मिशेलने सँटनरच्या गोलंदाजीवर पहिल्या स्लिपमध्ये टिपला. सँटनरचे चेंडू दिवसाच्या सुऊवातीला बरेच वळले असले, तरी त्याला अधिक यश मिळाले नाही. त्शेपो मोरेकी सँटनरच्याच एका अचूक चेंडूवर घाईघाईने खेळण्याच्या प्रयत्नात पायचित होऊन बसला. अखेरीस खेळ संपण्यास 40 मिनिटे बाकी असताना डेन पॅटरसनने विल्यमसनला सँटनरच्या गोलंदाजीवर झेल दिला आणि दक्षिण आफ्रिकेचा डाव संपुष्टात आला.
पहिल्या दिवशीच विल्यमसन आणि रवींद्र यांनी 232 धावांची भागीदारी करताना शतके केल्यानंतर न्यूझीलंडचे वर्चस्व निश्चित झाले होते. विल्यमसन दुसऱ्या दिवशी 118 धावांवर बाद झाला होता, तर रवींद्रने त्याच्या पहिल्या कसोटी शतकाचे द्विशतकात रूपांतर करताना 240 धावा काढल्या होत्या. रवींद्रने त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात दोन बळीही मिळविले. दक्षिण आफ्रिकेने एसए टी-20 लीगसाठी मायदेशी राहिलेल्या बहुतेक प्रमुख खेळाडूंना हटवून कसोटीसाठी सहा नवीन खेळाडूंना निवडले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला सतावणारा अनुभवाचा अभाव जाणवला. विशेष म्हणजे ज्या फलंदाजांनी चांगली सुऊवात केली होती ते विश्रांतीनंतर लगेच बाद झाले.
धावफलक : न्यूझीलंड पहिला डाव सर्व बाद 511, दक्षिण आफ्रिका पहिला डाव सर्व बाद 162, न्यूझीलंड दुसरा डाव 4 बाद 179 (घोषित), दक्षिण आफ्रिका सर्व बाद 247 (रेनार्ड व्हॅन टाँडर 31, झुबेर हमजा 36, डेव्हिड बेडिंगहॅम 87, रुआड दी स्वार्ड्ट नाबाद 34, साउदी 1-46, हेन्री 1-33, जेमिसन 4-58, सँटनर 3-59, फिलीप्स 1-30)