न्यूझीलंडचा द. आफ्रिकेवर 6 गड्यांनी विजय
सामनावीर’ केन विल्यम्सनचे नाबाद शतक, कॉन्वेचे अर्धशतक, ब्रीत्झकेचे शतक वाया
वृत्तसंस्था / लाहोर
तिरंगी एकदिवशीय क्रिकेट स्पर्धेतील येथे सोमवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात ‘सामनावीर’ केन विल्यम्सनचे दमदार नाबाद शतक आणि देवॉन कॉन्वेच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने द. आफ्रिकेचा 8 चेंडू बाकी ठेवून 6 गड्यांनी पराभव केला.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून द. आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. द. आफ्रिकेने 50 षटकात 6 बाद 304 धावा जमवित न्यूझीलंडला विजयासाठी 305 धावांचे आव्हान दिले. न्यूझीलंडने 48.4 षटकात 4 बाद 308 धावा जमवित विजय नोंदविला. द. आफ्रिकेच्या मॅथ्यु ब्रीत्झ्केचे दीड शतक आणि मुल्डेरचे अर्धशतक वाया गेले.
द. आफ्रिकेच्या डावात सलामीच्या मॅथ्यू ब्रीत्झ्केने 148 चेंडूत 5 षटकार आणि 11 चौकारांसह 150 धावा झळकविल्या. कर्णधार बवूमाने 3 चौकारांसह 20 धावा केल्या. जेसन स्मिथने 51 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह 41 धावा जमविताना ब्रीत्झ्केसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 93 धावांची भागिदारी केली. व्हेरेनी केवळ 1 धावेवर बाद झाला. मुल्डेर आणि ब्रीत्झ्के यांनी द. आफ्रिकेला सुस्थितीत नेताना चौथ्या गड्यासाठी 131 धावांची शतकी भागिदारी केल्याने आपल्या संघाला 300 धावांचा टप्पा ओलांडण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. मुल्डेरने 60 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 64 धावा जमविल्या. ब्रीत्झ्के डावातील 46 व्या षटकात झेलबाद झाला. बॉशने नाबाद 7 तर मुथूसॅमीने 2 धावा केल्या. द. आफ्रिकेच्या डावात 8 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्री आणि ओरुरके यांनी प्रत्येकी 2 तर ब्रेसवेलने 1 गडी बाद केला. जेसन स्मिथ धावचित झाला. द. आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 10 षटकात 46 धावा जमविताना 1 गडी गमविला. त्यानंतर दुसऱ्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी 150 धावांची भर घालताना 2 गडी गमविले. शेवटच्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी 108 धावा जमविताना 3 गडी गमविले. ब्रीत्झ्केने आपले शतक 128 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने झळकविले. मुल्डेरने 54 चेंडूत 4 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. द. आफ्रिकेच्या 300 धावा 292 चेंडूत नोंदविल्या गेल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावाला यंग आणि कॉन्वे यांनी बऱ्यापैकी सुरुवात करुन देताना 59 चेंडूत 50 धावांची भागिदारी केली. बॉशने यंगला झेलबाद केले. त्याने 31 चेंडूत 2 चौकारांसह 19 धावा केल्या.
कॉन्वे आणि विलियमसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 187 धावांची भागिदारी करत आपल्या संघाच्या विजयाचा पाया रोवला. कॉन्वेचे शतक केवळ 3 धावांनी हुकले. त्याने 107 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 97 धावा जमविल्या. द. आफ्रिकेच्या डेलाने त्याला झेलबाद केले. मिचेल 10 धावांवर तंबूत परतला. लॅथमला खातेही उघडता आले नाही. लॅथम बाद झाला त्यावेळी न्यूझीलंडची स्थिती 38.3 षटकात 4 बाद 251 अशी होती. विलियमसन आणि फिलीप्स यांनी पाचव्या गड्यासाठी अभेद्य 57 धावांची भागिदारी केली. विलियमसनने 113 चेंडूत 2 षटकार आणि 13 चौकारांसह नाबाद 133 तर फिलीप्सने 32 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 28 धावा जमविल्या. न्यूझीलंडला 21 अवांतर धावा मिळाल्या. द. आफ्रिकेतर्फे मुथूसॅमीने 2 तर बॉश आणि डेला यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंडच्या डावात 5 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले.
न्यूझीलंडने पहिल्या पॉवरप्ले दरम्यान 50 धावा जमविताना 1 गडी गमविला. दुसऱ्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी 208 धावांची भर घालताना 3 गडी गमविले. न्यूझीलंडने शेवटच्या पॉवरप्लेमध्ये 50 धावा जमविल्या. न्यूझीलंडचे त्रिशतक 286 चेंडूत फलकावर लागले.
संक्षिप्त धावफलक : द. आफ्रिका 50 षटकात 6 बाद 304 (ब्रिझेकी 150, बवूमा 20, स्मिथ 41, मुल्डेर 64, अवांतर 18, हेन्री व ओरुरके प्रत्येकी 2 बळी, ब्रेसवेल 1-43), न्यूझीलंड 48.4 षटकात 4 बाद 308 (विलियमसन नाबाद 133, कॉन्वे 97, फिलीप्स नाबाद 28, यंग 19, मिचेल 10, अवांतर 21, मुतूसॅमी 2-50, बॉश आणि डेला प्रत्येकी 1 बळी),