न्यूझीलंडचा द. आफ्रिकेवर 21 धावांनी विजय
टी-20 तिरंगी मालिका : टीम रॉबिन्सन ‘सामनावीर’, मॅट हेन्री, जेकब डफीचे प्रत्येकी 3 बळी
वृत्तसंस्था/हरारे
येथे सुरू असलेल्या तिरंगी टी-20 मालिकेतील झालेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने द. आफ्रिकेचा 21 धावांनी पराभव केला. या सामन्यात 57 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 75 धावा झळकविणाऱ्या न्यूझीलंडच्या टीम रॉबिन्सनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 20 षटकात 5 बाद 173 धावा जमवित द. आफ्रिकेला विजयासाठी 174 धावांचे आव्हान दिले. पण न्यूझीलंडच्या अचूक गोलंदाजीसमोर द. आफ्रिकेचा डाव 18.2 षटकात 152 धावांत आटोपल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. न्यूझीलंडच्या डावामध्ये टीम रॉबिन्सनने नाबाद 75 धावांची खेळी करताना त्याला सिफर्ट तसेच जेकब्जकडून चांगली साथ लाभली. सिफर्ट आणि रॉबिन्सन यांनी सलामीच्या गड्यासाठी 21 चेंडूत 27 धावांची भागिदारी केली. सिफर्टने 16 चेंडूत 4 चौकारांसह 22 धावा जमविल्या. कॉनवे 2 चौकारांसह 9 धावा जमवित तंबूत परतला. मिचेलने केवळ 5 धावांचे योगदान दिले. मिचेल हे ने 2 धावा जमवित बाद झाला. नीशमला खातेही उघडता आले नाही. 9.3 षटकात न्यूझीलंडची स्थिती 5 बाद 70 अशी होती.
त्यानंतर रॉबिन्सन आणि जेकॉब्ज यांनी सहाव्या गड्यासाठी अभेद्य 103 धावांची भागिदारी 63 चेंडूत नोंदविली. जेकॉब्जने 30 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 44 धावा केल्या. न्यूझीलंडला 16 अवांतर धावा मिळाल्या. त्यामध्ये 13 वाईड चेंडूंचा समावेश आहे. न्यूझीलंडच्या डावात 6 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेतर्फे मफाकाने 38 धावांत 2 तर एन्गिडी, कोटेझ आणि मुत्तूसॅमी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 43 धावा जमविताना 2 गडी गमविले. न्यूझीलंडचे अर्धशतक 41 चेंडूत, शतक 82 चेंडूत तर दीड शतक 111 चेंडूत फलकावर लागले. रॉबिन्सन आणि जेकॉब्ज यांनी शतकी भागिदारी 62 चेंडूत नोंदविली. रॉबिन्सनने 42 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक झळकविले. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शेवटच्या पाच षटकात 63 धावा जमविल्याने त्यांना 173 धावांपर्यंत मजल मारता आली. रॉबिनसनने कोझीच्या चेंडूवर षटकार ठोकून आपले अर्धशतक पूर्ण केले. कोझीने आपल्या शेवटच्या षटकात 19 धावा दिल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिकेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. जॉर्ज लिन्डेने 20 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह 30, ब्रेव्हीसने 18 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारांसह 35 धावा जमविल्या. प्रेटोरियसने 17 चेंडूत 6 चौकारांसह 27 तर हेन्ड्रीक्सने 12 चेंडूत 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. प्रेटोरियस आणि हेन्ड्रीक्स यांनी पहिल्या गड्यासाठी 20 चेंडूत 34 धावांची भागिदारी केली तर ब्रेव्हीस आणि लिंडे यांनी सहाव्या गड्यासाठी 39 धावांची भर घातली. द. आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. द. आफ्रिकेच्या डावात 6 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 50 धावा जमविताना 2 गडी गमविले. द. आफ्रिकेचे अर्धशतक 32 चेंडूत, शतक 72 चेंडूत तर दीड शतक 110 चेंडूत नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्री आणि जेकब डफी यांनी प्रत्येकी 3 तर सोधीने 2, सॅंटनरने 1 बळी टिपला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 20 षटकात 5 बाद 173 (रॉबिन्सन नाबाद 75, जेकॉब्ज नाबाद 44, सिफर्ट 22, अवांतर 16, मफाका 2-38, एन्गिडी, कोझी आणि मुत्तूसॅमी प्रत्येकी 1 बळी), द. आफ्रिका 18.2 षटकात सर्वबाद 152 (ब्रेव्हीस 35, लिंडे 30, कोझी 17, प्रेटोरियस 27, हेन्ड्रीक्स 16, हेन्री 3-34, डफी 3-20, सोधी 2-34, सँटनर 1-35)