न्यूझीलंडचा भारतावर 76 धावांनी विजय
मालिकेत बरोबरी, सामनावीर सोफी डिव्हाईनची अष्टपैलू खेळी, राधा यादवची एकाकी झुंज
वृत्तसंस्था/अहमदाबाद
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील येथे रविवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या महिला संघाने भारताचा 76 धावांनी पराभव केला. या विजयामुळे न्यूझीलंडने या मालिकेत भारताशी 1-1 अशी बरोबरी साधली आहे. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 260 धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर भारताचा डाव 47.1 षटकात 183 धावांत आटोपला. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांनी यजमान संघावर वर्चस्व राखले आहे. भारतीय पुरुष संघाला कसोटी मालिकेत सलग 2 सामन्यात किविजने पराभूत केले आहे. तर महिलांच्या वनडे मालिकेत पहिला सामना जिंकल्यानंतर भारताशी न्यूझीलंडने रविवारचा सामना जिंकून बरोबरी साधली आहे. आता तिसरा आणि शेवटचा सामना निर्णायक ठरेल. या मालिकेतील भारतीय महिला संघाने पहिला सामना जिंकून न्यूझीलंडवर आघाडी मिळवली होती. या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 259 धावा जमविल्या.
डाव गडगडला
भारताच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा निम्मा संघ 77 धावांत तंबूत परतला. स्मृती मानधना या सामन्यातही अधिक धावा जमविण्यास अपयशी ठरली. बॅडपॅचमधून जाणाऱ्या स्मृतीला आपले खातेही उघडता आले नाही. शेफाली वर्माने 2 चौकारांसह 11, यास्तिका भाटीयाने 1 षटकारासह 12, कर्णधार हरमनप्रित कौरने 1 षटकार आणि 1 चौकारासह 24, रॉड्रीग्सने 2 चौकारांसह 17 धावा जमविल्या. भारताला पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 47 धावा जमविताना 3 गडी गमवावे लागले. न्यूझीलंडतर्फे कर्णधार डिव्हाईन आणि तेहुहु यांनी भेदक गोलंदाजी केली. त्यांना जेस केरची साथ मिळाली. तेजल हसबनीस 15 धावांवर बाद झाली. तर दिप्ती शर्माने 1 चौकारासह 15 धावा जमविल्या. अरुंधती रेड्डीने केवळ 2 धावांचे योगदान दिले. भारताची यावेळी स्थिती 27 षटकात 8 बाद 108 अशी केविलवाणी झाली होती. त्यानंतर राधा यादव आणि सायमा ठाकुर यांनी नवव्या गड्यासाठी विक्रमी 70 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केल्याने न्यूझीलंडचा विजय थोडा लांबला. यादवने 64 चेंडूत 5 चौकारांसह 48 तर ठाकुरने 54 चेंडूत 3 चौकारांसह 29 धावा जमविल्या. केरने ठाकुरला झेलबाद केल्यानंतर डिव्हाईनने राधा यादवला झेलबाद करुन आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. न्यूझीलंडने हा सामना 76 धावांनी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. न्यूझीलंडतर्फे तेहुहूने 42 धावांत 3, डिव्हाईनने 27 धावांत 3, जेस केर व कार्सन यांनी 2 बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 50 षटकात 9 बाद 259 (बेट्स 58, प्लिमेर 41, डिव्हाईन 79, ग्रीन 42, गेझ 11, जेस केर नाबाद 12, अवांतर 3, राधा यादव 4-69, दिप्ती शर्मा 2-30, सईमा ठाकुर 1-58, प्रिया मिश्रा 1-49). भारत 47.1 षटकात सर्व बाद 183 (राधा यादव 48, सईमा ठाकुर 29, हरमनप्रित कौर 24, भाटिया 12, शेफाली वर्मा 11, हसबनिस 15, दिप्ती शर्मा 15, अवांतर 10, तेहुहू 3-42, डिव्हाईन 3-27, जेस केर 2-49, कार्सन 2-32).