For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी आजपासून

06:48 AM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी आजपासून
Advertisement

न्यूझीलंडच्या संघातून दुखापतग्रस्त देव्हॉन कॉनवे बाहेर, रचिन रवींद्रचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन, न्यूझीलंड

बेसिन रिझर्व्ह येथे आज गुरुवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीसाठीच्या न्यूझीलंड संघातून डेव्हॉन कॉनवेला वगळण्यात आले असून रचिन रवींद्रचा समावेश करण्यात आलेला आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी या दोन्ही संघांमधील दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान यष्टिरक्षण करताना कॉनवेच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. सुरुवातीच्या स्कॅनमध्ये कोणतेही फ्रॅक्चर नसल्याचे सूचित केले असले, तरी वेलिंग्टनमधील अतिरिक्त चाचण्यांमध्ये कॉनवेच्या डाव्या अंगठ्याची हानी झाल्याचे आढळून आले आहे.

Advertisement

या आठवड्याच्या शेवटी कॉनवेच्या पुढील चाचण्या होतील. दरम्यान, विल यंग  हा कॉनवेच्या जागी टॉम लॅथमसह फलंदाजीची सुरुवात करेल. हेन्री निकोल्स, ज्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या दोन कसोटी सामन्यांपूर्वी न्यूझीलंड संघातून वगळण्यात आले होते, त्याला फलंदाजीस मजबुती देण्यासाठी परत बोलावण्यात आले आहे.

गुडघ्याच्या दुखापतीमुळे रचिन रवींद्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिस्रया ट्वेंटी-20 सामन्याला मुकला होता. पण गुरुवारपासून कसोटीत खेळण्यासाठी तो तंदुरुस्त झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने आपले पहिले द्विशतक झळकावले होते. पायाच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला मुकल्यानंतर डॅरिल मिशेलही उपलब्ध झाला आहे.

कर्णधार टीम साउदीने सांगितले आहे की, बेसिन रिझर्व्हवरील परिस्थितीचे मूल्यांकन केल्यानंतर न्यूझीलंड आपला अंतिम संघ ठरवेल. येथील खेळपट्टी सुऊवातीला हिरवीगार असली, तरी फलंदाजीसाठी चांगली असते. त्यामुळे चार वेगवान गोलंदाजांसह उतरायचे की, फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरला सामील करायचे हे न्यूझीलंड ठरवेल. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविऊद्ध हॅमिल्टन येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीसाठी चार वेगवान गोलंदाजांचा वापर करून सँटनरला बाहेर ठेवले होते.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने या कसोटीसाठी आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. कमिन्सने बुधवारी पुष्टी केली की, अंतिम संघ कोणताही आश्चर्याचा धक्का देणार नाही. ऑस्ट्रेलियाने गेल्या महिन्यात ब्रिस्बेन येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजकडून ज्याला पराभूत व्हावे लागले होते तोच संघ निवडला आहे. ऑस्ट्रेलियाविऊद्धची ही दोन कसोटी सामन्यांची मालिका म्हणजे न्यूझीलंडने पूर्ण ताकदीच्या ऑस्ट्रेलिया संघाचा सामना केलेल्या काही प्रसंगांपैकी एक असेल. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत क्वचितच आमनेसामने येतात आणि ऑस्ट्रेलियाने कधी कधी त्यांच्याविरुद्ध आपला सर्वोत्तम संघ मैदानात उतरविलेला नाही. जागतिक कसोटी स्पर्धा क्रमवारीत न्यूझीलंड सध्या पहिल्या आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे.

Advertisement
Tags :

.