न्यूझीलंडचे लंकेविरुद्ध लय कायम राखण्याचे लक्ष्य
वृत्तसंस्था/ कोलंबो
माजी विजेत्या न्यूझीलंडला अलीकडच्या विजयाच्या लयीवर स्वार होऊन आज मंगळवारी येथे होणाऱ्या आयसीसी महिला एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकातील लढतीत सहयजमान श्रीलंकेचा सामना करताना कोणत्याही चुका करणे परवडणारे नाही.
2000 मध्ये विजेत्या ठरलेल्या न्यूझीलंडला ट्रान्स-टास्मान प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेकडून सलग दोन पराभव सहन करावे लागले. तथापि, बांगलादेशविऊद्धच्या अत्यंत आवश्यक विजयासह त्यांनी त्यांच्या मोहिमेला पुन्हा जीवदान दिले. ते सध्या आघाडीच्या चार संघांच्या अगदी बाहेर आहेत आणि गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. त्यांनी तीन सामन्यांतून दोन गुण मिळवले आहेत आणि उणे 0.245 हा नेट रन रेट त्यांना सुधारायचा आहे.
कर्णधार सोफी डेव्हिन त्यांची फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करणारी खेळाडू आहे. तिची तीन डावांतील सरासरी 86.66 आहे. तिची संयमी खेळी आणि पाचव्या क्रमांकाची फलंदाज ब्रुक हॅलिडेच्या आक्रमक प्रयत्नांमुळे बांगलादेशविऊद्ध संघाला परत फॉर्ममध्ये येण्यास मदत झाली. तथापि, वरच्या फळीत दिसणारा सातत्याचा अभाव ही न्यूझीलंडसाठी एक मोठी चिंता आहे. अनुभवी सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर आणि अमेलिया केर यांना चांगल्या सुऊवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्याच्या बाबतीत संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे बरीच जबाबदारी डेव्हिनच्या खांद्यावर आहे.
न्यूझीलंडला त्यांची लय मिळवावी लागेल आणि श्रीलंकेच्या फिरकी माऱ्याला, विशेषत: चेंडू वळण्यास मदत होईल अशी अपेक्षा असलेल्या खेळपट्टीवर चांगल्या प्रकारे सामोरे जावे लागेल. येथील आर. प्रेमदासा स्टेडियमने या विश्वचषकात आतापर्यंत चार पूर्ण सामने पाहिले आहेत, ज्यामध्ये सरासरी पहिल्या डावात 205 धावा निघालेल्या आहेत. फिरकीपटूंनी मैदानावर वर्चस्व गाजवले असून 41 बळी घेतले आहेत, जे वेगवान गोलंदाजांपेक्षा 14 जास्त आहेत.
दरम्यान, श्रीलंकेला स्पर्धेत अद्याप विजय मिळालेला नाही. चामारी अटापट्टूच्या नेतृत्वाखालील संघाचा तीन सामन्यांत एक गुण झाला आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविऊद्ध पावसामुळे सामना रद्द झाल्याने त्यांना तो गुण मिळाला. ते फक्त पाकिस्तानपेक्षा वर सातव्या स्थानावर आहेत. अटापट्टू अजूनही श्रीलंकेची आधारस्तंभ आहे. ती जवळजवळ एकट्याने अपेक्षांचे ओझे वाहून नेत आहे. तथापि, कर्णधारावर जास्त अवलंबून राहण्याचे परिणाम स्पष्ट दिसत आहेत. मागील सामन्यात तिला दुखापतीमुळे स्ट्रेचरवर नेण्यात आले, परंतु श्रीलंकेला वाचवण्यासाठी ती पुन्हा फलंदाजीसाठी आली.
वारंवार दबावाखाली डळमळीत झालेली मधली फळी अखेर पुढे येऊन आपली जबाबदारी पेलेल अशी आशा संघ व्यवस्थापनाला असेल. मागील सामन्यांमध्ये त्यांनी अनेक झेल सोडले आणि क्षेत्ररक्षणातील चुका त्यांना महागात पडल्या. तथापि, फिरकी गोलंदाज ही त्यांची श्रीलंकेची मोठी ताकद राहिलेली आहे. खास करून डावखुरी फिरकी गोलंदाज इनोका रणवीर त्यांना सातत्याने आवश्यक यश मिळवून देत आणि धावसंख्येवर नियंत्रण ठेवत आली आहे.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.